मुंबई: काय ते हॉटेल... काय ते डोंगर अन् काय ती झाली.... या डॉयलॉगमुळे आणि शिंदेंच्या बंडानंतर फेमस झालेल्या आसाममधील गुवाहाटीला राज्याच्या राजकारणात चांगलंच महत्त्व येऊ लागल्याचं चित्र आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापाठोपाठ आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनाही (Ajit Pawar NCP) आता गुवाहाटीची कामाख्या देवी (Guwahati Kamakhya Devi Mandir) पावल्याचं समोर आलंय. अजितदादा उपमुख्यमंत्री व्हावेत असा नवस बोललेल्या कल्याणराव काळेंनी आता त्यांचा नवस गुवाहाटीला जाऊन फेडला आहे.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केले आणि तब्बल 40 आमदारांना घेऊन त्यांनी आसाम येथील गुवाहाटी गाठली होती. ते गुवाहाटीतील कामाख्या देवीचे दर्शन घेऊन ते परत आले आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. एकनाथ शिंदे याना ज्या पद्धतीने कामाख्या देवीचा आशीर्वाद मिळाला त्यानंतर शिंदे यांनी पुन्हा एकदा कामाख्या देवीचे दर्शन (Eknath Shinde Kamakhya Devi Mandir News) घेऊन आपला नवस पूर्ण केल्याच्या चर्चाही जोरदार रंगल्या होत्या. यानंतर महाराष्ट्रातील राजकारणात गुवाहाटी येथील  कामाख्या मंदिर जास्तच चर्चेत आले होते. 
     
एकनाथ शिंदे यांच्या बंडाला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवार यांनी भूकंप घडवत राष्ट्रवादी आमदारांसह बंडखोरी केली आणि राज्यात उपमुख्यमंत्री म्हणून सत्तेत सामील झाले. अजितदादा उपमुख्यमंत्री व्हावेत म्हणून त्यांचे कट्टर समर्थक आणि सोलापुरातील सहकार शिरोमणी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे (Solapur Kalyanrao Kale News) यांनी याच कामाख्या देवीला नवस बोलला होता. अजितदादांनी शपथ घेतल्यावर काळे यांनी अजितदादा यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला आणि लगेच गुवाहाटीला रवाना झाले. 


कल्याणराव काळे यांनी गुवाहाटीतील कामाख्या देवीच्या मंदिरात जाऊन पूजा करत आपला नवस पूर्णही केला . अजितदादा यांचा अशा कोणत्या गोष्टीवर जरी विश्वास नसला तरी त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या सहकाऱ्यांचा मात्र यावर विश्वास होता आणि म्हणूनच दादा उपमुख्यमंत्री झाले ते कामाख्या देवीच्या आशीर्वादानेच या श्रद्धेपोटी कल्याणराव काळे, नागेश फाटे आणि त्यांच्या समर्थकांनी तातडीने गुवाहाटी गाठत कामाख्या देवीचा नवस पूर्ण केला. 


या प्रकारामुळे आता आसाम येथील गुवाहाटीला महाराष्ट्रातील नेत्यांच्या चकरा वाढू लागल्या तर नवल वाटायचे कारण नाही. तसे झाले तर एकतर ही मंडळी कामाख्या देवीला नवस तरी बोलायला चालले असतील किंवा अजून राजकारणात एखादा भूकंप झाल्यास नवस फेडायला गेले असे समजायला हरकत नाही.


ही बातमी वाचा: