अमरावती : जालन्यात (Jalna) मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटत असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, राजकीय वर्तुळातून देखील अनेक प्रतिक्रिया या घटनेवर येत आहेत. आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी देखील या घटनेवर भाष्य करत लाठीचार्ज ही अधिकाऱ्यांची बदमाशी असल्याचं म्हटलं आहे. तर अभ्यास करुन सरकारने धनगर मुस्लिम आणि मातंग समाजाला देखील आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावायला हवा असं बच्चू कडू म्हणाले आहेत. जालन्यात झालेल्या लाठीचार्जवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची माफी देखील मागितली.
बच्चू कडूंनी घेतली मनोज जरांगेंची भेट
आमदार बच्चू कडू यांनी जालना येथे जाऊन उपोषणकर्ते मनोज जरांगेंची देखील भेट देखील घेतली आहे. यावेळी त्यांनी म्हटलं आहे की, "आमच्याकडून जितके प्रयत्न करता येतील तितके प्रयत्न आम्ही करु. सरकारने आंदोलकांकडे आंदोलन म्हणून पाहावे. पण इथे येणाऱ्यांना सेल्फीचं पडलयं. त्यांच्या आरोग्याचं काहीच पडलं नाही. आज या लोकांनी जी ज्योत पेटवली आहे त्याचा सन्मान करणं हे महत्त्वाचे आहे. वेळ पडली तर मी देखील उपाशी राहण्यास मागे पुढे पाहणार नाही. त्यामुळे सरकारने अंत पाहू नये. नाहीतर पुन्हा एकदा सरकारचा अंत व्हायला वेळ लागणार नाही. तर महाराष्ट्रामध्ये मराठा कुणबी आहे ही काळ्या दगडावरची रेष आहे. त्यामुळे सरकाने वेगळा कायदा करण्याच्या भानगडीत पडू नका."
"माफी मागून राज्य शांत होत असेल तर फार चांगल होईल"
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागितल्या नंतर यावर आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना त्यांनी म्हटलं की, "जर माफी मागून राज्य शांत राहत असेल तर फार चांगलंय. लाठीचार्ज ही अधिकाऱ्यांची बदमाशी आहे." अधिकाऱ्यांनी लाठीचार्ज कसा केला? असा सवाल देखील यावेळी आमदार बच्चू कडू यांनी उपस्थित केला आहे. मराठा आरक्षणासाठी जालन्यामध्ये उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांना आमदार बच्चू कडू यांनी पाठिंबा दिला आहे.
जालन्यामध्ये सुरु असेलेल्या मनोज जरांगे यांच्या उपोषणाला अनेक राजकीय नेत्यांनी भेट दिली आहे. आमदार बच्चू कडू यांनी सोमवार (4 सप्टेंबर) रोजी रात्री उशीरा जालन्यामध्ये मनोज जरांगे यांची भेट घेतली. दरम्यान त्यांनी या आंदोलनाला पाठिंबा देखील दर्शवलाय.