Amravati News : कधी कधी नियती निष्ठुर होऊन माणसाला एकटं पाडते. त्या चिमुकलीलाही नियतीने असंच एकटं पाडलं होतं. ती माणूस असून सुद्धा. पण शेवटी तिच्यासारखीच काही माणसं तिच्या आयुष्यात आली, तिच्या जीवनात माणूसपणाची नवी पहाट उगवली. पंधरा दिवसांच्या चिमुकलीला पालकांनी किन्नरांकडे सोडून दिले होते. तेव्हापासून किन्नरच (transgender community) त्या चिमुकलीचे पालक म्हणून तिची जबाबदारी सांभाळून त्या आयुष्याला नवीन दिशा देत आहे.


काही महिन्यांपूर्वी अमरावती (Amravati) जिल्ह्यातील एका दाम्पत्याने 15 दिवसाच्या चिमुकलीला अमरावतीच्या तृतीयपंथीयांकडे सोडून दिलं होतं. तेव्हापासून अमरावतीचे किन्नर त्या चिमुकलीची देखभाल करत आहेत. त्या चिमुकलीचे नाव परी आहे. सध्या अमरावतीत त्यांचं राष्ट्रीय संमेलन सुरु असून याच संमेलनाचं उद्घाटन अमरावतीचे पोलीस उपायुक्त विक्रम साळी यांच्या हस्ते झाले. तेव्हा त्यांची नजर या चिमुकलीकडे गेली. तिची संपूर्ण माहिती किन्नरांनी दिली तेव्हा विक्रम साळी यांनी त्या तिच्या संपूर्ण शिक्षणाचं खर्च उचलला आहे. किन्नरांमध्ये शिक्षणाचं प्रमाण नसल्याने त्यांनी ह्या चिमुकलीला दर्जेदार उच्च शिक्षण मिळावं म्हणून त्यांनी हे पाऊल उचललं असल्याचे सांगितलं. सध्या संमेलनात प्रत्येक किन्नर या चिमुकलीची देखभाल करतााना दिसत असून तिला प्रेम देत आहेत.


परीच्या पालकत्वाची भूमिका परवीन हिने स्वीकारली आहे. आयुष्यात परी आल्यामुळे जगण्याची नवी दिशा मिळाली आहे. तिचे हसणे-बागडणे हे घरात असल्याने चार भिंतीच्या खोलीला घराचे स्वरुप आले आहे. परीमुळे मला मातृत्व मिळाले असून हे सौभाग्य मला मिळाल्यामुळे मी स्वतःला भाग्यवंत समजते असे भावनिक अनुभव परवीन यांनी सांगितला. परी कशी मुलाला सांभाळते ते अनुभव परवीन यांना आला आहे आणि घरात लहान बाळ असलं की घरात कशी रौनक असते हे जाणवलं. परिसरातील सगळे जण चिमुकलीसोबत खेळतात तिला फिरवतात. आता एकच इच्छा आहे की, ही चांगलं शिक्षण घ्यावं आणि आपल्या पायावर उभी राहावं हीच सगळ्यांची इच्छा असल्याचेही परवीन म्हणाली.


सर्वांनाच परीचे कौतुक


जन्म देणाऱ्या पालकांनी नाकारले तरी समाजात जगण्यासाठी संघर्ष करणाऱ्या किन्नरांनी त्या चिमुकल्या परीला स्वीकारले. एकटी पडलेल्या चिमुकलीला मायेची उब दिली. तसेच तिला एक आई आणि पालकांनी एकटं सोडलं तरी तिच्यावर प्रेम करणाऱ्या तीला शेकडो आई मिळाल्या आहेत. ती आमच्या आयुष्यात जगण्याची नवी उमेद घेऊन आली असल्याचा अनुभव यावेळी तिचा सांभाळ करणाऱ्यांनी सांगितला. तर माणूसपणाची कहाणी माहिती पडल्यावर किन्नरांच्या या माणुसकीचे कौतुक सर्वच स्तरावर होत आहे. सगळ्या किन्नरांनी चिमुकल्या परीचा लाड करुन, तिचं संगोपन करुन तिला घडवण्याचा निश्चय केला आहे. ज्याप्रकारे परीच्या आयुष्यात किन्नरांमुळे नवीन उमेद मिळाली आहे. तशीच सामाजिकदृष्ट्या बहिष्कृत असलेल्या आणि आपल्या अस्तित्वासाठी लढणाऱ्या किन्नरांच्या आयुष्यात नव उमेदीची पहाट उगवेल, अशा प्रश्न किन्नरबांधवांनी उपस्थित केला आहे.


VIDEO : Amravati :अमरावतीमध्ये अखिल भारतीय मंगलमुखी किन्नर संमेलन, संपूर्ण देशभरातून किन्नर दाखल : ABP Majha



ही बातमी देखील वाचा...


नागपूरकरांनी अनुभवली थंडगार रात्र; पहिल्यांदाच पारा 8 अंशांवर