अमरावती : मेळघाटमधील एका युवतीचा मृतदेह 19 ऑगस्ट रोजी एका विहिरीत सापडला होता. एका विशिष्ट समाजाच्या युवकाने त्या युवतीला पळवून नेलं होतं आणि परत घरी आणून सोडलं पण तिचा मृतदेह विहिरीत कसा सापडला. ही युवती पण आंतरधर्मीय विवाहाला बळी पडली असा आरोप भाजप खासदार डॉ अनिल बोंडे यांनी केल्यावर 48 तासात चिखलदरा पोलीसांनी कारवाई करत तीन आरोपींना अटक केली आहे. त्या युवतीचा खून झाल्याचा पोलीस तपासात उघड झालं असून याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना आज अटक केली.


या प्रकरणी पोलीसांनी काय सांगितलं?


पोलीसांनी काढलेल्या प्रेसनोटमध्ये म्हटलं की, 17 ऑगस्ट रोजी पीडित मुलगी घरातून निघून गेली होती. 19 ऑगस्ट रोजी तिचा मृतदेह विहिरीत आढळून आला. या प्रकरणी चिखलदरा पोलीसांनी मर्ग दाखल केला आणि तपासात असे निष्पन्न झाले की, जाकीर अहमद उर्फ जाकू अहमद निसार (वय 24) परतवाडा, अमोल उईके (वय 29) कोमटी, मुकेश बेठेकर (वय 19) कोमटी या तिघांनी पीडित मुलीला शेतात बोलावून घेतले आणि तू माझ्याशी का बोलत नाही? या कारणाने त्यांच्यात वाद झाला या वादातून तिचा गळा दाबून खून केला. पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने मृतक पीडितेचे प्रेत तिच्या शेतातील विहिरीत फेकल्याचं तपासात दिसून आले. त्या आधारे या तिन्ही आरोपींना आज चिखलदरा पोलीसांनी अटक केली आहे.


डॉ. अनिल बोंडे यांचे आरोप काय होते?


एका विशिष्ट समाजाच्या युवकाने पीडित तरुणीला पळवून नेलं, मग पुण्याला घेऊन गेला. चार-पाच दिवसांनी परत घरी आणून सोडलं. मग नंतर 17 ऑगस्ट रोजी दोन युवक तोंडाला रुमाल बांधून आले आणि त्या मुलीला घरून पळवून नेले आणि तिसऱ्या दिवशी 19 ऑगस्टला त्या मुलीचं मृतदेह विहिरीत आढळला. या तरुणीच्या वडिलांनी 27 ऑगस्ट रोजी चिखलदरा पोलिसात तक्रार दिली पण अजूनही पोलिसांनी काहीच कारवाई केली नाही. तिचा खून केला तरीही अजून पोलिसांनी 27 ऑगस्टपासून 10 सप्टेंबरपर्यंत चौकशीसाठीसुद्धा त्या युवकाला ताब्यात घेतले नाही असा आरोप भाजप खासदार डॉ अनिल बोंडे यांनी केला होता.


खासदार डॉ. अनिल बोंडे यांची काय मागणी?


20 जुलै रोजी जाकीर अहमद या युवकांनी त्या मुलीला पुण्याला पळवून नेलं होतं.. गावातील दोन युवकांनी तिला सोडवून आणले होते. त्याचा पण तपास करावा अशी मागणी खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी केली आहे. तसंच अमरावती शहर आणि ग्रामीण भागातील पोलीसांनी मिसिंग झालेल्या मुलींचा बारकाईने तपास करावा अशी विनंती सुद्धा त्यांनी केली आहे.