Amravati News : राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) उद्या (1 सप्टेंबर) मेळघाटात (Melghat) 'माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी' या उपक्रमाचा शुभारंभ करणार आहेत. कृषीमंत्र्यांचा आज रात्री मेळघाटातील साद्राबाडी इथल्या शेतकऱ्याच्या घरी मुक्काम असेल. तर उद्या दिवसभर प्रत्यक्ष शेतात जाऊन शेतकऱ्यांशी चर्चा करणार आहेत. शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी पदाधिकारी, अधिकारी यांनी संपूर्ण एक दिवस शेतकऱ्यांसोबत राहून संवाद साधणे, प्रत्येक अडचणी समजून घेणे यासाठी कृषी विभागातर्फे 'माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी' हा उपक्रम 1 सप्टेंबरपासून 30 नोव्हेंबरपर्यंत राज्यात राबवण्यात येत आहे. त्याचा राज्यस्तरीय शुभारंभ राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत मेळघाटातील धारणी तालुक्यातील साद्राबाडी इथे उद्या गुरुवारी सकाळी 9 वाजता होईल.


शेतकऱ्याच्या मातीच्या घरात कृषीमंत्र्यांचा आजचा मुक्काम
कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे मेळघाटातील दत्तात्रय पटेल या शेतकऱ्याच्या मातीच्या घरी मुक्काम करतील. या शेतकऱ्याकडे पावणे पाच एकर शेती असून दत्तात्रय पटेल यांना तीन अपत्ये आहेत. त्यापैकी मुलगा आणि मुलीचं लग्न झालं असून एका मुलगा अद्याप अविवाहित आहे. ते पत्नी आणि दोन मुलांसह इथे राहतात. सध्या दत्तात्रय पटेल यांच्या शेतात एक एकर धान तर तीन एकरवर सोयाबीनची लागवड करण्यात आली आहे. 


कृषीमंत्री उद्या काय काय करणार?
कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे आज रात्री 11 वाजता मेळघाटातील साद्राबाडी येथे शेतकऱ्याच्या घरीच मुक्काम करतील आणि उद्या सकाळी चहा पाणी झाले की, सकाळी 9 वाजता दत्तात्रय पटेल यांच्यासोबत शेतात जातील. तिथे सोयाबीन फवारणी होईल आणि त्यांच्याशी चर्चा करतील. त्यांनतर बाजूलाच असलेल्या राजेश डावलकर यांच्या शेतात कापूस डवरणी/फवारणी होईल. नंतर बाबूलाल जावरकर यांच्या शेतात विद्युत पंप दिले त्याची पाहणी आणि सोयाबीन फवारणी होईल. तिथून ते किशोरीलाल धांडे यांच्या शेतात जाऊन त्यांच्या शेतात असलेल्या संत्रा बागेची पाहणी आणि संत्र्याची छाटणी, खत देणे, फवारणी होऊ शकते. त्यांनतर नंदलाल बेठेकर यांना विहीर दिली त्याची पाहणी करतील. तिथून अशोक पटेल यांच्या शेतात ठिंबक संच पाहणी करणार आणि रामगोपाल भिलावेकर यांच्या शेतात तुषार संच पाहणी. आणि मग बाटु धांडे यांच्या शेतात रोटावेटरची पाहणी आणि नथु गाडगे यांच्या शेतात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची ते पाहणी करतील आणि मग पुरुष बचत गट यांची अवजार बँक पाहणी कृषीमंत्री अब्दुल सत्तार करणार आहेत.