अमरावती : शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी कृषी विभागाचे (Agriculture Department) पदाधिकारी, अधिकारी यांनी संपूर्ण एक दिवस शेतकऱ्यांसोबत राहून संवाद साधणे, प्रत्येक अडचणी समजून घेणे यासाठी कृषी विभागातर्फे “माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी” (Majha Ek Divas Majhya Balirajasathi) हा उपक्रम 1 सप्टेंबरपासून 30 नोव्हेंबरपर्यंत राज्यात राबविण्यात येत आहे. त्याचा राज्यस्तरीय शुभारंभ राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या प्रमुख उपस्थितीत मेळघाटातील (Melghat) धारणी तालुक्यातील साद्राबाडी येथे गुरुवारी सकाळी 9 वाजता होईल..


‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ उपक्रमात कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांचे बुधवार 31 ऑगस्ट रोजी रात्री 11 वाजता साद्राबाडी येथे आगमन होईल. यावेळी कृषीमंत्री हे साद्राबाडी येथील शेतकरी दत्तात्रय चुनीलाल पटेल यांच्या निवासस्थानी मुक्काम करणार आहेत. त्यानंतर साद्राबाडी येथे 1 सप्टेंबरला सकाळी 9 वाजता 'माझ्या एक दिवस माझ्या बळीराजासाठी' उपक्रमात कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) हे पटेल यांच्या शेतावर उपस्थित राहून शेतीविषयक समस्या, अडचणी, प्रश्न जाणून घेतील. त्यानंतर सायंकाळी 5 वाजता धारणी येथील पंचायत समिती समोरील परिसरात 10 हजार शेतकरी उत्पादक केंद्र स्थापन करण्याच्या योजनेचा, तसेच ताप्तीपुत्र जैविक शेती मिशन शेतकरी उत्पादक कंपनी कार्यालयाचे शुभारंभ होईल. 




शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी, समस्यांमुळे निर्माण होणारा ताणतणाव, नैराश्य, शेतकरी आत्महत्या याची कारणमीमांसा करुन सुलभ आणि प्रभावी कृषी धोरण तयार करण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे.


‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ (Majha Ek Divas Majhya Balirajasathi) या उपक्रमात प्रधान सचिव, कृषी आयुक्त, कृषी विद्यापीठाचे कुलगुरु, शास्त्रज्ञ, विभागीय आयुक्त, विभागीय कृषी सहसंचालक, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, प्रकल्प संचालक आत्मा, कृषी विकास अधिकारी, कृषी उपसंचालक आणि इतर उपविभागीय व तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी भेट देण्याच्या सूचना आहेत. त्यात कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी महिन्यातून तीन दिवस तसेच महसूल, ग्रामविकास आणि इतर विभागाच्या अधिकाऱ्यांनी महिन्यातून एक दिवस भेट द्यावी अशी सूचना करण्यात आली आहे.


महत्त्वाच्या बातम्या :