अमरावती: काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांनी भाजपमध्ये येण्याची ऑफर देण्यात येत असल्याचा मोठा गौप्यस्फोट केला आहे. या खळबळजनक व्यक्तव्यानंतर राज्याच्या राजकारणात चर्चेला उधाण आले आहे. नुकतेच काँग्रेस नेते मिलिंद देवरांनी (Milind Deora) काँग्रेसची (Congress) साथ सोडून शिंदेंच्या शिवसेनेत (Shinde Group) प्रवेश केला आहे. त्यामुळे काँग्रेसला मोठं खिंडार पडले आहे. अशात सुशीलकुमार शिंदे यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे अनेक तर्क वितर्क लावण्यात येत आहे. असे असले तरी काँग्रेस नेत्या आमदार यशोमती ठाकूर (Yashomati Thakur ) यांनी प्राणिती शिंदे आणि  सुशीलकुमार शिंदे हे कायम काँग्रेससोबत असतील असा विश्वास व्यक्त केला आहे.


आई वडिलांना कोणी सोडत असतात का ? - यशोमती ठाकूर


प्रणिती शिंदे आणि काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांना भाजपकडून ऑफर आल्या असल्याची शक्यता नाकारता येत नाही. मुळात भाजपवाल्यांकडे स्वत:चे ओरिजनल लोक राहिलेत किती? आमच्या पक्षातील लोक भाजपमध्ये घेण्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र मला विश्वास आहे प्रणिती शिंदे आणि काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे हे कायम काँग्रेस सोबत राहतील. शिंदे कुटुंबीय कट्टर काँग्रेसचे असून ते सर्वधर्म समभाव आणि व्यापक विचारधारेचे आहेत. त्यामुळे ते नेहमी काँग्रेससोबत राहतील. असा काँग्रेसनेत्या आमदार यशोमती ठाकूर यांनी बोलताना व्यक्त केला. पक्ष सोडण्यामागे दोन मुख्य कारण असतात. एक म्हणजे भीती, नाहीतर सत्तेची ताकद असते. हे दोनच कारण असू शकतात, नाहीतर आई वडिलांना कोणी सोडत असतात का ? असे देखील यशोमती ठाकूर म्हणाल्या. 


नेमकं काय म्हणाले सुशीलकुमार शिंदे? 


अक्कलकोट तालुक्यातील बोरोटी येथे झालेल्या हुरडा पार्टी दरम्यान कार्यकर्त्यांशी संवाद साधतांना सुशीलकुमार शिंदे म्हणाले की, 'माझा दोन वेळा पराभव झाला असला, तरीही प्रणिती ताईला किंवा मला भाजपकडून आमच्या पक्षात या असे सांगितले जात आहे. मात्र, काँग्रेस आमच्या रक्तात आहे. आम्ही कधीही काँग्रेस सोडून जाणार नाही असे स्पष्टीकरण देखील यावेळी सुशीलकुमार शिंदे यांनी दिले. तसेच, आता मी 83 वर्षाचा आहे. त्यामुळे आता मी दुसऱ्याचं बरोबर आहे असं कसं म्हणणार. तसेच प्रणिती पक्षीय बदलाच्या भानगडीत पडणार नाही. राजकारणामध्ये असे (पराभव) होतं राहतात. पंडित जवाहरलाल नेहरू या माणसासोबत असं झालं. मात्र, परभवाबाबतीत पंडित नेहरू म्हणाले होते की, 'लहान मुलाला सुरुवातीला आधार देऊन चालवावे लागते. नंतर तो स्वतः चालतो. चालताना पडतो पुन्हा उठतो, पुन्हा पडतो पुन्हा उठतो. मग तो जेव्हा चालायला लागतो तेव्हा तो पुन्हा कधी पडत नाही'. त्यामुळे तुम्ही काहीही काळजी करू नका, आज वाईट दिवस आहेत, मात्र ते दिवस निघून जातील, असे सुशीलकुमार शिंदे म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या: