Bachchu Kadu अमरावती : देशभरात लोकसभा निवडणुकांचे (Lok Sabha Elections) वारे वाहू लागले आहेत. लोकसभा निवडणुका जाहीर होण्यास काही महिन्यांचा अवधी शिल्लक असतांना राजकीय पक्षांनी, आघाड्यांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. अशातच प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्वेसर्वा बच्चू कडू आणि भाजपमध्ये पुन्हा एकदा कलगीतुरे रंगल्याचे समोर आले आहे. रविवारी अमरावती (Amravati) येथे आयोजित महायुतीच्या लोकसभा निहाय बैठकीला आपण मुद्दाम जाणार नसल्याचे आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी स्पष्ट करत भाजपला इशारा दिला.
भाजपने वापरुन घेण्याची भाषा करु नये. भाजपला लोकसभा निवडणूक जितकी महत्त्वाची आहे, तेवढीच आम्हाला विधानसभा महत्त्वाची आहे. त्यांनी लोकसभेचा विचार करावा. परंतु, आमच्या डोक्यात विधानसभा आहे. त्यामुळे विधानसभेचं चित्र स्पष्ट होत नाही तोवर आमची भूमिका तटस्थ राहील. काही काळ आम्ही वाट पाहू, मात्र त्यातून काही निर्णय झाला नाही तर, मग आम्ही गेम करू, असा इशाराच बच्चू कडूंनी भाजपला दिला आहे.
बैठकीला जाणार नाही - बच्चू कडू
गेल्या काही दिवसांपासून प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्वेसर्वा बच्चू कडू हे नाराज असल्याचे चित्र आहे. दरम्यान त्यांनी भाजपवर वेळोवेळी टीका करत आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप सोबतच्या मित्रपक्षांमध्ये काहीसे बिनसले आल्याच्या चर्चा रंगत आहे. अशातच बच्चू कडू यांनी पुन्हा आपली नाराजी व्यक्त करत भाजपला थेट इशारा दिला आहे. भारतीय जनता पार्टी सध्या राज्यातील सर्व लोकसभा मतदारसंघात मतदारसंघनिहाय बैठका घेत आहे. त्या पार्श्वभूमीवर रविवारी 14 जानेवारीला अमरावतीत देखील बैठक बोलावण्यात आली. या बैठकीला भाजपाने सर्वच मित्रपक्षांच्या नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना बोलावलं आहे. परंतु, बच्चू कडू यांनी आपण या बैठकीला जाणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर
महाराष्ट्रामध्ये आमच्या 200 ते 300 ग्रामपंचायत, नगरपंचायत आहे. त्याला निधी मिळाला नाही, त्यामुळे कार्यकर्त्यांचा नाराजीचा सूर आहे. कुठल्याही पक्षात कार्यकर्ता महत्वाचा आहे. त्याशिवाय कोणत्याही पक्षाचे काम होऊ शकत नाही. आम्हाला संपूर्ण राज्यभरातल्या जिल्हाप्रमुखांचे फोन येत आहेत. आम्ही नेहमीच युतीसाठी प्रयत्न केला आहे. त्यामुळे आता विधानसभेबाबत भाजपा काय निर्णय घेणार, हे आधी स्पष्ट केले पाहिजे.
5 फेब्रुवारीला महाराष्ट्रातील प्रमुख कार्यकर्त्यांची आम्ही बैठक घेणार आहोत. त्यामध्ये आम्ही निर्णय जाहीर करू. त्याआधी भाजपाने आमच्यासोबत जे युतीपक्ष म्हणून आम्ही सोबत आहोत, त्यावर चर्चा करावी आणि त्यांनी आम्हाला स्पष्ट सांगावं, तर आम्ही बैठकीला जाऊ नाही तर जाणार नसल्याचे आमदार बच्चू कडू म्हणाले.