अमरावती : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं यंदा शताब्दी वर्ष असून त्यासंबंधित 5 ऑक्टोबर रोजी अमरावतीतील दसरा महोत्सव (RSS Dussehra Programme) कार्यक्रम होणार आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमाच्या उद्घाटक म्हणून दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टच्या संस्थापक अध्यक्षा डॉ. कमलताई गवई (Dr. Kamaltai Gawai) या उपस्थित राहणार आहेत. कमलताईंनी निमंत्रण स्वीकारलं असल्याची माहिती आहे. कमलताई या देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई (CJI Bhushan Gawai) यांच्या मातोश्री आहेत. त्यांच्या निमंत्रणावरुन वाद निर्माण झाला होता.
अमरावतीत 5 ऑक्टोबरला संघाचा विजयदशमी सोहळा श्रीमती नरसम्मा महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला आहे. संघाच्या वतीने प्रमुख वक्ता म्हणून प्रज्ञा प्रवाहाचे संयोजक आणि संघाच्या अखिल भारतीय कार्यकारिणीचे सदस्य जे. नंदकुमार उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. याच कार्यक्रमाचे निमंत्रण कमलताईंना देण्यात आलं आहे.
RSS Dussehra Programme : सोशल मीडियावर पत्र व्हायरल
कमलताई गवई या संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत अशा आशयाचं एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत होतं. आपण आंबेडकरी विचारांच्या असून तो विचार सोडणार नाही असं त्या पत्रात नमूद करण्यात आलं होतं. पण हे पत्र बनावट असल्याचा दावा केला जात आहे. अशात आता कमलताई गवई संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचं त्यांचे पुत्र राजेंद्र गवई यांनी अप्रत्यक्षपणे सांगितलं आहे.
Rajendra Gawai On RSS : मी आईसाहेबांच्या पाठीशी
या संबंधी बोलताना राजेंद्र गवई म्हणाले की, "रा सू गवई यांचे भाजप नेत्यांशी जवळचे संबंध होते. देवेंद्र फडणवीसांसोबतही त्यांचे चांगले संबंध होते. त्यांची विचारधारा वेगळी असली तरी राजकारणापलिकडे त्यांनी मैत्री जपली होती. त्यामुळे एखाद्या वेगळ्या विचारसरणीच्या कार्यक्रमाला गेले तर आपली विचारधारा बदलेल असं काही नाही. अशा कार्यक्रमाला जावं."
आम्ही कधीही सत्तेच्या मागे गेलो नाही. दादासाहेबांना या आधी मुख्यमंत्रिपदाचीही ऑफर होती, पण त्यांनी विचारधारा बदलली नाही. मलाही अनेकदा ऑफर देण्यात आल्या, तरीही आपण विचारधारा बदलली नाही. भूषण गवई आता मोठ्या पदावर गेले आहेत. त्यामुळे या गोष्टीवरून काही चर्चा होते. मी आईसाहेबांच्या पाठीशी आहे. त्यांनी कोणताही निर्णय घ्यावा, मी खंबीरपणे मागे असेन असं राजेंद्र गवई म्हणाले.
RSS Amravati Dasara Programme : रा सू गवई या आधी संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित
कमलाताईंच्या संभाव्य उपस्थितीवरून वाद निर्माण झाला असला, तरी इतिहास वेगळंच सांगतो. 1981 साली झालेल्या संघ शिक्षा वर्गाच्या समारोपाला रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि कमलाताईंचे पती रा. सू. गवई हजर होते. तेव्हाच्या दैनिकांमध्ये हे छायाचित्रही छापून आलं होतं. शिवाय संघाच्या व्यासपीठावर आतापर्यंत अनेकदा अन्य विचारसरणीतील प्रमुख पाहुणे येऊन गेले आहेत. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे याचं सगळ्यात मोठं उदाहरण.
या कार्यक्रमाला कमलताईंनी जावं अथवा नाही यावरून बरेच मतप्रवाह दिसून येत आहेत. मात्र स्व. रा. सू. गवई असोत किंवा त्यांच्या पश्चात श्रीमती कमलताई गवई असोत, गवई परिवाराने नेहमीच समाजिक सौहार्द जपलेलं असल्याच नेहमीच दिसून येतंय. सार्वजनिक जीवनात काम करताना सर्वधर्म समभाव हा एकच उद्देश त्यामागे असल्याचं त्यांचं मत आहे.
Dr. Kamaltai Gawai RSS Programme : कमलताईंच्या निमंत्रणावरून अनेक प्रश्न
या निमंत्रणाच्या निमित्ताने काही प्रश्नदेखील उपस्थित झाले आहेत. ते म्हणजे स्व. रा. सू. गवई यांच्या निधनानंतर इतक्या वर्षांनी आताच का म्हणून संघातर्फे कमलताई गवई यांना निमंत्रण देण्यात आले? देशात संविधान बदलाच्या चर्चा विरोधकांकडून नेहमीच केल्या जातात, त्या चर्चाना संघ नेहमीच फेटाळत आलं आहे. अशातच आंबेडकरी विचारधारेच्या पाईक असलेल्या गवई परिवारातील व्यक्तीला प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करून संघातर्फे विरोधकांना ठोस उत्तर देण्याचा प्रयत्न तर नाही ना? असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.
काहीही असो, सर्वधर्म समभाव जपत असताना संघाने आंबेडकरी विचारधारेच्या व्यक्तीला प्रमुख पाहुण्यांचा मान देऊन आपले वेगळेपण दाखवले आहे. आता 5 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या कार्यक्रमात कमलताई गवई या उपस्थित राहतात हे बघणे नक्कीच औत्सुक्याचे राहणार आहे.