अमरावती: खासदार नवनीत  राणा यांना धमकी देणाऱ्या व्यक्तीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. अमरावतीच्या नेरपिंगळाई भागातून त्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं असून श्याम तायवाडे असं त्याचं नाव आहे. या व्यक्तीने खासदार नवनीत राणा यांना सोमवारी धमकी देत शिवीगाळ केली होती. 


खासदार नवनीत राणा यांना गेल्या चार दिवसांपासून धमकीचे फोन येत असल्याची माहिती आहे. सोमवारी सायंकाळी 4 वाजता श्याम तायवाडे या व्यक्तीने त्यांना कॉल करून अश्लील शिवीगाळ केली होती. आता त्याला राजापेठ पोलीसांनी ताब्यात घेतलं आहे. श्याम विठ्ठलराव तायवाडे (वय 35) असं या तरुणाचं नाव असून तो अमरावतीतील नेरपिंगळाई या ठिकाणी राहतोय. हा युवक मजुरी करणारा असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 


ताब्यात घेण्यात आलेला तरूण हा त्याच्या वडिलांच्या नावाने सिमकार्ड वापरत होता. आता त्याने खासदार नवनीत राणा यांना धमकी का दिली याचा तपास पोलिस करत आहेत. 


काय धमकी दिली होती? 


श्याम तायवाडे या तरूणाने खासदार नवनीत राणा यांना कॉल करून धमकी दिली. त्यामध्ये त्याने तिवसामधून बोलत असल्याचं सांगितलं. तू गर्दीच्या ठिकाणी जातेस, त्या ठिकाणी तुझ्यावर कधी धारधार चाकूने वार करणार ते तुला माहितीही पडणार नाही असं त्याने म्हटलं. तसेच या तरूणाने खासदार नवनीत राणा यांच्याबद्दल अश्लील उद्गार काढत शिवीगाळ केली. 


अशा माथेफिरू भामट्याला त्वरित जेरबंद करून त्याच्यावर कठोर कारवाई करावी आणि त्या व्यक्तीचा ताबडतोब शोध घेऊन त्याच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे अशी तक्रार खासदार नवनीत राणा यांच्याकडून त्यांच्या स्वीय सहाय्यकांनी राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये दिली होती. पोलिसांनी या प्रकरणाचा तातडीने तपास सुरू केला आणि आरोपीला जेरबंद केलं. आता या तरूणाने खासदार नवनीत राणा यांना धमकी का दिली याचा तपास पोलिस करत आहेत. 


खासदार नवनीत राणा या राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर चर्चेत आल्या होत्या. त्यावेळचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानासमोर त्यांनी हनुमान चालिसा म्हणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा नोंद करून त्यांना 14 दिवस तुरुंगात रहावे लागले होते. त्यानंतरही त्यांनी शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या विरोधात चांगलीच आक्रमक भूमिका घेतली. 


खोट्या जात प्रमाणपत्राचा वाद


खासदार नवनीत राणा यांनी 2019 सालच्या लोकसभा निवडणुकीत खोटे जात प्रमाणपत्र दाखवून निवडणूक लढवल्याचा आरोप शिवसेनेच्या वतीनं करण्यात आला होता. जात प्रमाणपत्रासाठी शाळा सोडल्याचा बनावट दाखला दिल्याचा आरोप नवनीत राणा यांच्यावर लावण्यात आला आहे. नवनीत राणा यांच्या वडिलांनी फसवणूक करुन प्रमाणपत्र मिळवल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे. नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांविरोधात मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.


ही बातमी वाचा: