अमरावती : अमरावती जिल्ह्यात बापानेच चिमुरड्या पोरांना दारू पाजल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.अमरावती जिल्ह्याच्या तिवसा तालुक्यातील कौंडण्यपूर परिसरात ही घटना घडली आहे. कुऱ्हा पोलीस स्थानकात त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वी अमरावती जिल्ह्याच्या तिवसा तालुक्यातील कौंडण्यपूर परिसरात एका व्यक्तीने लहान मुलांना दारू पाजल्याची घटना समोर आली होती. यासोबतच या घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल झाला. त्यानंतर या प्रकरणाचा तपास पोलीसांनी केला असता, व्हिडीओमध्ये असणारी व्यक्ती गजानन डाहाके असून तो वर्धा जिल्ह्यातील देऊरवाडा येथील रहिवासी असल्याचे आढळून आले. कौंडण्यपूर - अंजनसिंगी मार्गावर असलेल्या एका बारमधून दारू विकत घेऊन आपल्या मुली आणि मुलाला दिली होती. कुऱ्हा पोलिसांनी जुवेनाईल जस्टिस ॲक्टनुसार गुन्हा नोंदवत गजानन डाहाके यांची चौकशी सुरू आहे.
या संपूर्ण प्रकरणाची राज्याच्या महिला व बालविकास विभागानेही गांभीर्याने दखल घेतली असून आज या प्रकरणाची या विभागाकडून अमरावती येथे चौकशी करण्यात आली आहे. यावेळी बापाला आणि लहान मुलांना कुऱ्हा पोलीस घेऊन आली होती. या लहान बालकांना ताब्यात घेऊन संरक्षणासाठी गरज पडल्यास त्यांना बाल सुधारगृहात पाठवण्याची शक्यता आहे.
काय आहे प्रकरण?
20 जुलै रोजी अमरावती जिल्ह्याच्या तिवसा तहसील अंतर्गत कौंडन्यपूर परिसरात असलेल्या एका बारमध्ये एक व्यक्ती दारू पिण्यासाठी पोहोचला. यावेळी तिच्यासोबत लहान मुलेही होती. बारमधून दारू विकत घेतल्यानंतर या व्यक्तीने आपल्या मुलांना स्वतःच्या हाताने दारू पाजली आणि लहान मुलांना दारू पाजल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. अशा स्थितीत या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांनी लहान मुलांना दारू पाजणाऱ्या बापाला चौकशीसाठी बोलाविले पण त्याला तेव्हा ताकीद देऊन सोडून देण्यात आले. पण व्हिडीओ व्हायरल होत असल्याने पोलिसांची पुन्हा चौकशी सुरू केली आहे अटक मात्र अद्यापही झाली नाही.