Navneet Rana : खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी महाराष्ट्रात ठाकरे सरकारविरुद्ध (Uddhav Thackeray) चांगलंच रान पेटवलं होतं. खासकरुन हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) प्रकरणानंतर त्या जास्त चर्चेत आल्या. आता त्यांना केंद्रात मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. केंद्रात नवनीत राणा यांना लवकरच मोठी जबाबदारी दिली जाणार असल्याची चर्चा सुरु आहे. केंद्रात नवनीत राणा यांना लवकरच मोठी जबाबदारी दिल्या जाणार असल्याची चर्चेवर आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी भाष्य केलं आहे.


रवी राणा म्हणाले की, ज्या पद्धतीने खासदार नवनीत राणा यांची महाराष्ट्र, पंजाब आणि दक्षिणेत पकड आहे, त्यांच्याबद्दल एक चांगलं मत आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शाह यांच्या स्तरावर योग्य निर्णय घेतला जाईल. देशाच्या योगदानात कोण चांगलं काम करतय हे मोदींना चांगल्या प्रकारे कळते, त्यामुळे कुणाला देशाच्या मुख्य प्रवाहात आणावे याचा निर्णय ते घेतील अशी माहिती रवी राणा यांनी दिली. त्यामुळे लवकरच नवनीत राणा यांना केंद्रात मोठी जबाबदारी मिळणार हे निश्चित आहे, असं ते म्हणाले. 


'उद्धव ठाकरेंना बुडवण्याचं जास्तीत जास्त श्रेय हे संजय राऊतांना'


रवी राणा म्हणाले की, उद्धव ठाकरेंना बुडविण्याचं जास्तीत जास्त श्रेय हे संजय राऊताना जाते, संजय राऊत हे बिन पेंद्याच्या लोट्याप्रमाणे असून शरद पवारांचे पगारी असल्यासारखे वागत आहेत. उद्धव ठाकरेंचं राहिलेलं अस्तित्व सुद्धा संपवायची सुपारी संजय राऊत यांनी घेतल्याचं दिसून येते, असा आरोप रवी राणा यांनी केला आहे. राज्याचं काम कुठंही थांबलेलं नाही, येत्या 30 तारखेपर्यंत मंत्रिमंडळात काही नवीन चेहरे आपल्याला दिसतील असंही रवी राणा म्हणाले..


शिवसेना ही ठाकरेची का शिंदेंची यावर आमदार रवी राणा म्हणाले की, राज्यात 90 टक्के शिवसेना ही एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहे, दोन तृतीयांश बहुमत हे शिंदेंसोबत असल्याने धनुष्यबाण त्यांच्याकडेच जाणार. जेंव्हा उद्धव ठाकरे प्रत्यक्ष समोर येऊन बोलत नव्हते, तेव्हा संजय राऊत त्यांची मुलाखत घेत होते. उद्धव ठाकरे हे संजय राऊत यांचंच ऐकतात. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघेही आज ऍक्टिव्ह आहेत, राज्याच्या कानाकोपऱ्यात त्यांचे लक्ष असून राज्यातील पूर परिस्थिती ते उत्तम पद्धतीने हाताळत आहेत.


तसेच मंत्रिमंडळात संधी मिळेल का यावर रवी राणा म्हणाले की, मी कधीही मंत्रिपद मागितलं नाही तसा माझा आग्रह देखील नाही, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून विदर्भ आणि महाराष्ट्राचा विकास करणं हाच आमचा संकल्प आहे.