Ravi Rana : आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी अमरावतीचे पोलीस आयुक्त आरती सिंग (Amravati Police Commissioner Arati Singh) आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंह या ठाकरे सरकारसाठी वसूली करत होत्या. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत अवैधपणे केलेली वसुली पाठवली असल्याचा धक्कादायक आरोप अमरावतीचे आमदार रवी राणा यांनी केला आहे. आरती सिंह यांच्याविरोधातील ऑडिओ क्लिप सीआयडीला योग्य वेळी देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. आरती सिंग यांनी दर महिन्याला अमरावतीमधून सात कोटी रुपयांची वसुली केली असून त्यातील काही पैसा उद्धव ठाकरे यांना पोहोचवला असल्याचा आरोप राणा यांनी केला. 


आमदार रवी राणा यांनी म्हटले की,  महाविकास आघाडी सरकारच्या सत्ता काळात अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंग यांना एकसूत्री कार्यक्रम देण्यात आला होता. यानुसार, राणा दाम्पत्यावर जेवढे गुन्हे दाखल करता येतील तेवढे गुन्हे दाखल करण्याचे आणि कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले होते. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खूश करण्यासाठी आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. महापालिका आयुक्तांवर शिवप्रेमींनी शाईफेक केली होती. त्यावेळी मी अमरावतीत उपस्थित नसतानाही माझ्यावर 307 आणि 353 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. शिवाजी महाराजांचा पुतळा काढण्यात आला. तेव्हा माझ्या घरी पोलीस पाठवून नजरकैदेत ठेवण्यात आल्याचे राणा यांनी म्हटले. आमच्या कार्यकर्त्यांनाही तडीपार करण्याचे आदेश देण्यात आले होते. 


आरती सिंह यांचे वसूली पथक


पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्यावर गंभीर आरोप करताना आमदार रवी राणा यांनी म्हटले की, पोलीस आयुक्त सिंह यांनी वसुली पथक नेमले होते. या वसुलीमुळेच अमरावतीत गुन्हे वाढले.  शहरात दंगल झाली. उमेश कोल्हे यांची हत्या झाली. अमरावतीत गुन्ह्यांची संख्या वाढली असल्याचा आरोप राणा यांनी केला. 


सीआयडीला पुरावे देणार


आमच्या विरोधात दाखल केलेले खोटे गुन्हे आणि आरती सिंग यांनी केलेली अवैध वसुली यासंदर्भात तपास सीआयडीकडे देण्यात आला असल्याचे राणा यांनी सांगितले. आमच्याकडे त्या संदर्भात पुरावे असून ऑडिओ क्लिपिंग असल्याचा दावा आमदार राणा यांनी केला. हे सगळे पुरावे योग्य वेळी सीआयडीला देणार असल्याचे राणा यांनी म्हटले. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: