Navneet Rana : मागील काही महिन्यांपासून अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि त्यांचे पती रवी राणा (Ravi Rana) सातत्याने चर्चेत आहेत. राणा दाम्पत्य आता पुन्हा एकदा गणेश विर्सजनाच्या व्हिडिओवरून चर्चेत आले आहेत. बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन (Ganesh Immersion ) करताना या राणा दाम्पत्याने मूर्ती थेट पाण्यातच फेकल्याने सोशल मीडियावर त्यांच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे. हीच कृती इतरांनी केली असती तर राणा दाम्पत्य आणि भाजपने त्यावर रान उठवले असते. आता मात्र, गप्प बसले असल्याचे सोशल मीडिया युजर्सने म्हटले आहे. शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनीदेखील राणा दाम्पत्यावर टीकेचे बाण सोडले आहेत. 


नवनीत राणा आणि रवी राणा यांनी मागील काही महिन्यात हिंदुत्व राजकारणाच्या मुद्यावर पूरक अशी भूमिका घेतली होती. काही दिवसाआधीच लव जिहादच्या मुद्यावर नवनीत राणा यांनी पोलीस ठाण्यात गोंधळ घातला होता. तर, महाविकास आघाडीचे सरकार असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी जाऊन हनुमान चालिसा म्हणार असल्याचे राणा दाम्पत्याने जाहीर केले होते. या मुद्यावरून मुंबईत शिवसैनिक आक्रमक झाले होते. तर, विरोधकांनी शिवसेनेच्या हिंदुत्वावर प्रश्न निर्माण केले होते. मात्र, आता गणेश विसर्जनाच्या मुद्यावरून राणा दाम्पत्य अडचणीत आले आहे. बाप्पाला निरोप देताना राणा दाम्पत्याने आपली गणेश मूर्ती पाण्यात उंचावरून फेकून दिली असल्याचे व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत दिसत आहे. ज्या पाण्यात मूर्ती फेकली ते पाणीदेखील गढूळ असल्याचा दावा करण्यात येत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर राणा दाम्पत्याविरोधात सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. काही युजर्सने हिंदुत्वाच्या ठेकेदारांची कृती पाहा असं म्हणत संताप व्यक्त केला. तर, काहींनी हेच का तुमचे हिंदुत्व असा सवाल केला.  हिंदू देवतेचा, धर्माचा अपमान केल्याबाद्दल गुन्हा दाखल करण्याची मागणी काहींनी केली आहे. 


शिवसेनेकडून टीकेचे बाण 


शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी खासदार नवनीत राणा यांच्यावर टीका केली आहे. नवनीत राणा यांनी धर्माच्या नावावर सुरू केलेला आक्रास्ताळेपणा बंद करावा अशी मागणी अंधारे यांनी केली. हिंदुत्वासाठी सातत्याने त्या गोंधळ घालतात. मात्र, त्यांना हनुमान चालिसा म्हणता येत नाही, ना हनुमानाला हनुमान का म्हणतात हे माहीत आहे असा टोलाही अंधारे यांनी लगावला. बाप्पाचे विसर्जन कसे करतात, याची त्यांना माहिती नाही. फक्त लाइमलाईटमध्ये राहण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू असतो. राणा यांना केवळ फोकसमध्ये राहायचं आहे, अशी टीकाही सुषमा अंधारे यांनी केली. 


'लव जिहाद'वरून गोंधळ  


नवनीत राणा यांनी काही दिवसांपूर्वीच अमरावतीमधील एका मुलीचे 'लव जिहाद'मुळे अपहरण झाल्याचा आरोप नवनीत राणा यांनी पोलीस ठाण्यात गोंधळ घातला होता. यावेळी पोलीस अधिकाऱ्यांना केलेल्या अरेरावीमुळे राणा यांच्यावर टीका झाली होती. बेपत्ता झालेल्या मुलीला पोलिसांनी सातारामधून ताब्यात घेतले. यावेळी आपण घरातल्या त्रासाला कंटाळून घर सोडले असल्याचे मुलीने पोलिसांना सांगितले. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: