Amravati News : अमरावती प्रकरणात (Amravati Love Jihad twist ) आता नवा ट्विस्ट आला असून कुटुंबीयांच्या त्रासाला कंटाळूनच संबंधित मुलगी घर सोडून गेली होती अशी माहिती आता समोर आली आहे. बुधवारी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी हे प्रकरण लव्ह जिहादचं असल्याचा आरोप करत पोलिसांवरही आरोप केले होते. त्यावरुन काल मोठा गदारोळ झाला होता. आता या प्रकरणातील मुलीला पोलिसांनी शोधून काढलं असून ती मुलगी घरच्यांच्या त्रासाला कंटाळून पळून गेली होती असं स्पष्ट झालं आहे.
अमरावतीमधून पळून गेलेल्या तरुणीने सातारा पोलिसांना तसा जबाब दिला असून ती तरुणी आज रात्रीपर्यंत अमरावतीमध्ये पोहोचणार असल्याची माहिती आहे. ती अमरावतीमध्ये आल्यानंतर तिचा सविस्तर जबाब घेण्यात येईल असं अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंह (Amravati Police Commissioner Arati Singh) यांनी सांगितलं आहे.
घरच्यांकडून त्रास होत असल्याच्या रागातून ती मुलगी घरातून एकटीच पळून गेली होती अशी माहिती अमरावती पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी सांगितलं.
संबंधित मुलगी घरातून पळून गेल्यानंतर हे प्रकरण लव्ह जिहादचं असल्याची तक्रार तिच्या घरच्यांनी केली होती. त्यावरुन अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी यावरुन हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांसह काल थेट राजापेठ पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांना धारेवर धरलं होतं.
ती मुलगी पुण्याहून गोव्याकडे रेल्वेने प्रवास करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर अमरावती पोलिसांनी लोहमार्ग पोलीस (Railway Police) आणि सातारा जिल्हा पोलिस प्रमुख अजय कुमार बंसल यांच्यासोबत चर्चा केली.
लव्ह जिहाद प्रकरणातील युवती बेपत्ता असल्याबाबतची तक्रार संबंधित मुलीच्या नातेवाईकांनी अमरावती पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार त्या मुलीचा शोध सुरू होता. गोपनीय माहितीनुसार ती पुणे ते गोवा अशा प्रवासात असल्याचं समजलं होतं. त्यानुसार त्यांनी लोहमार्ग पोलीस आणि सातारा जिल्हा पोलिस प्रमुख अजय कुमार बंसल यांच्यासोबत चर्चा केली होती. रात्री दहा वाजण्याच्या दरम्यान गोव्याला जाणासाठी ती मुलगी रेल्वे स्थानकावर येत असल्याची माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी रेल्वे प्रशासनाला संपूर्ण रेल्वे तपासण्यास दोन मिनिट थांबणाऱ्या गाडीला किमान 5 ते 10 मिनिटं थांबवण्याबाबत परवानगी मिळावी अशी विनंती केली. त्यानुसार रेल्वे प्रशासनाने पोलिसांना परवानगी दिल्यानंतर सर्च ऑपरेशन राबवत मुलीली ताब्यात घेण्यात आले.