Amol Mitkari on Sanjay Raut : "कोणी बापाचा पक्ष चोरलाय तर कोणी काकाचा पक्ष चोरलाय", असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले होते. संजय राऊतांच्या या टीकेला अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. "संजय राऊतांचे 3 इंद्रिये निकामी झाले आहेत. मेंदू, जीभ आणि डोळे हे ते इंद्रिय आहेत", अशी जहरी टीका अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी केली आहे. महायुतीचा जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा अकोला येथे पार पडला. यावेळी ते बोलत होते. यावेळी भाजपचे विधानपरिषदेचे आमदार प्रवीण (Pravin Darekar)दरेकर उपस्थित होते. 


अमोल मिटकरी म्हणाले, "राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 44 आमदार 4 खासदार आणि अख्खा पक्ष अजित पवार यांच्याकडे आहे. त्यामुळे संजय राऊतांनी डोळ्याला झालेल्या मोतीबिंदूचे ऑपरेशन करावे. अजित पवार संजय राऊतांना उत्तर देणार नाहीत. आम्ही कार्यकर्ते त्यासाठी सक्षम आहोत." 


'अजित पवारच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष' - अमोल मिटकरी 


महायुतीच्या जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना अमोल मिटकरी यांनी अजित पवारांचा 'राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष' असा उल्लेख केला आहे. पुलोदचे सरकार स्थापन झाले तेव्हा जनसंघाचे लोकही सोबत होते. असा प्रयोग अजित पवार यांनी केला तर कोणाला वाईट वाटण्याचे कारण नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर जेव्हा जेव्हा संकट आले तेव्हा तेव्हा अजित पवार ढाल बनून पुढे गेले. जे पोटात आहे ते त्यांच्या ओठात आहेत, असेही मिटकरी म्हणाले.


2024 मधील निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन मेळावा


महायुताने 2024 मध्ये होणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन आजचा मेळावा आयोजित केला आहे. आम्ही एकत्र आहोत. हे सांगण्यासाठी हा महामेळावा आहे. महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आल्यानंतर अनेकांना प्रश्न पडला. एकमेकांच्या विरोधात असणारे एकत्रित कसे आले? आमच्या पक्षाचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबई याबाबत भूमिका मांडली, असेही मिटकरी यांनी स्पष्ट केले. 


'मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे केवळ दोनदाच मंत्रालयात आले' 


मिटकरी म्हणाले, महाविकास आघाडीचे सरकार असताना मंत्रालयात सातत्याने काम करणारे केवळ अजित पवारच होते. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे केवळ दोनदाच मंत्रालयात आले होते. कोरोनाच्या काळात जीवाची पर्वा न करता अजित पवार मंत्रालयात काम करत होते. देशात तरुणांना आकर्षित करत असेल आणि आपले राज्य विकासाच्या मार्गाने नेईल, असे कोणते नेतृत्व असेल तर ते पीएम मोदींचे नेतृत्व आहे, असे अजित पवार म्हणाले होते. आमचा नेता जे सांगेन तेच धोरण आणि आमचा नेता जो बांधेन तेच तोरण हीच आमची भूमिका आहे, असे अमोल मिटकरी यांनी स्पष्ट केले. 


इतर महत्वाच्या बातम्या


Eknath Shinde on Uddhav Thackeray : लोक लोकांची कामे करणाऱ्याला कसे साफ करतील? घरात बसणाऱ्याला साफ करतील; एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना टोला