मुंबई : माजी केंद्रीय मंत्री आणि मुंबईमधील काँग्रेसचा (Congress) चेहरा राहिलेल्या माजी खासदार मिलिंद देवरा यांनी आगामी लोकसभेसाठी दक्षिण मुंबईवर दावा ठाकरे गटाकडून आल्यानंतर अखेर पक्षाला सोडचिट्टी देत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांच्यासह मुंबईमधील 10 माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला. याबरोबर अनेक पदाधिकाऱ्यांनी सुद्धा शिंदे गटात प्रवेश केला. गेल्या काही दिवसांपासून मिलिंद देवरा काँग्रेसवर नाराज असल्याची चर्चा होती.
महाविकास आघाडीमध्ये लोकसभेसाठी जागावाटप चर्चा सुरू झाल्यानंतर दक्षिण मुंबईवरील दावा ठाकरे गटाकडून प्रबळ करण्यात आला होता. त्यामुळे मिलिंद देवरा यांची घालमेल चांगलीच वाढली होती. या सर्व पार्श्वभूमीवर त्यांनी सातत्याने या जागेवरून ठाकरे गटावर निशाणा साधला होता. त्यामुळे ते पक्षाला सोडचिट्टी देणार अशी चर्चा रंगली होती. अखेर त्यांनी आज (14 जानेवारी) शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला. मिलिंद देवरा यांनी यावेळी बोलताना काँग्रेसवर हल्लाबोल केला. त्याचबरोबर ठाकरेंवरही निशाणा साधला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सुद्धा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केलेल्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले.
मी गेल्या दीड वर्षात एकही सुट्टी घेतलेली नाही
हा फक्त ट्रेलर असून पिक्चर अभी बाकी आहे असे म्हणत त्यांनी आणखी पक्षप्रवेश होणार असल्याचे संकेत दिले. ते म्हणाले की मिलिंद देवरा यांच्या रूपाने एक अभ्यास संयमी नेता आपल्याला मिळाला आहे. त्यांनी यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की, मी सकाळी उठून रस्ते धुण्याचे काम करतो. त्यामुळे मुंबई आयुक्त चहल सुद्धा हातात झाडू घेतो आणि आमदार सुद्धा घेतात. मी गेल्या दीड वर्षात एकही सुट्टी घेतलेली नाही. गावी जाऊन सुद्धा काम करत असतो. मी शेतात जाऊन काम करतो तसेच जनता दरबारी घेत असतो.
मी हेलिकॉप्टरमधून फोटो काढत नाही
ते पुढे म्हणाले की, माझ्याकडे वेळ कमी असल्याने मी हेलिकॉप्टरमधून जातो आणि गाडीतून प्रवास करून खर्च होणारा वेळ वाचवतो. मी हेलिकॉप्टरमधून फोटो काढत नाही असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या फोटोग्राफीवरून खोचक शब्दात टोला लगावला. ते पुढे म्हणाले की, काही लोक कल्याण लोकसभेचा आढावा घेण्यासाठी गेले होते. यावेळी बोलताना म्हणाले की निवडणुकीत यांना साफ करा. मात्र, लोकं लोकांची कामे करणाऱ्याला साप कसे करतील? घरात बसणाऱ्याला साफ करतील, अशा शब्दात त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर तोफ डागली.
कोणताही निर्णय घेताना यशस्वी पुरुषाच्या मागे महिलेची ताकद असते. आपण निर्णय घेताना ज्या भावना होत्या, त्याच दीड वर्षांपूर्वी माझ्या मनात सुद्धा होत्या. मी ज्यावेळेस निर्णय घेतला तेव्हा श्रीकांत शिंदेंच्या आईला विश्वासात घेतलं होतं. काही ऑपरेशन अशी असतात, सुई पण टोचली नाही पाहिजे. कुठेही टाका लागता कामा नये. मी मिलिंद देवरा यांचे शिवसेनेत मनापासून स्वागत करतो. ते सर्व पत्नीक आलेत, त्यामुळे वहिनींचे देखील स्वागत करतो, असेही ते यावेळी म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या