Nagpur Covid Update : दैनंदिन दोनशेवर कोरोना बाधितांची नोंद, जिल्ह्यात दररोज फक्त 1500 आरटीपीसीआर चाचण्या
चाचण्यांच्या तुलनेत कोरोना बाधितांचा टक्का जुलैमहिन्यात कमालीचा वाढला असतानाही प्रशासन अद्याप वेट अॅन्ड वॉचच्या भूमिकेत दिसून येत आहेत.
नागपूरः दररोज दोनशे पेक्षा जास्त कोरोना बाधितांची नोंद होत असताना आरोग्य विभागाच्यातीने कोरोना चाचण्या वाढविण्याबद्दल कुठलेच पाऊल उचलण्यात येत नसल्याचे चित्र आहे. रविवारी प्राप्त अहवालानुसार 214 नव्या बाधितांची नोंद झाली. यात शहरातील 142 आणि ग्रामीणमधील 72 बाधितांचा समावेश आहे. मात्र तरी रविवारी जिल्ह्यात फक्त 1517 RTPCR चाचण्या करण्यात आल्या. बाधित संख्या वाढत असताना मनपाच्यावतीने शहरात फक्त 1242 चाचण्या करण्यात आल्या हे विशेष.
रविवारी प्राप्त अहवालानुसार ग्रामीणमध्ये 275 आणि शहरात 1242 आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या. तसेच 321 रॅपीड अॅन्टीजेन चाचण्या करण्यात आल्या. चाचण्यांच्या तुलनेत बाधितांचा टक्का जुलैमहिन्यात कमालीचा वाढला असतानाही प्रशासन अद्याप वेट अॅन्ड वॉचच्या भूमिकेत दिसून येत आहे. त्यामुळे यंदा कोरोनाची तीव्र लाट आली तर त्याची किंमत नागरिकांना मोजावी लागेल हे निश्चितच.
रुग्णालयात 65 कोरोना बाधितांवर उपचार सुरु
सध्या प्राप्त माहितीनुसार 65 बाधितांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर 1414 नागरिक गृहविलगीकरणात आहेत. रुग्णालयात भरती बाधितांपैकी 11 रुग्ण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात, 3 बाधित मेयोमध्ये, 8 बाधित किंग्सवे हॉस्पिटलमध्ये, 3 बाधित रेल्वे हॉस्पिटलमध्ये, 3 बाधित क्रिटीकेअर रुग्णालयात, 6 बाधित वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये, 2 बाधित Aureus हॉस्पिटलमध्ये, 7 बाधित एम्समध्ये, 2 बाधित सनफ्लावर हॉस्पिटलमध्ये, 3 बाधित दंदे हॉस्पिटलमध्ये, 9 बाधित विवेका हॉस्पिटलमध्ये, क्रिम्स हॉस्पिटलमध्ये 1, कल्पवृक्ष हॉस्पिटलमध्ये 1, डॉ. गायकवाड हॉस्पिटलमध्ये 1, क्यूअर इट हॉस्पिटलमध्ये 1, सेंट्रल क्रिटीकल हॉस्पिटलमध्ये 1 आणि 2 बाधितांवर मेडीट्रिना हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.
बुस्टर डोस घ्या, प्रशासनाचे आवाहन
कोव्हिशिल्ड किंवा कोव्हॅक्सिन यापैकी कोणत्याही लसीचे दोन्ही डोस घेउन 6 महिन्याचा कालावधी पूर्ण झालेल्या 18 वर्षावरील वयोगटातील नागरिकांना बुस्टर डोस घेता येणार आहे. यासाठी शहरात प्रत्येक झोनमध्ये विविध ठिकाणी लसीकरण केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेता प्रत्येक पात्र व्यक्तीचे लसीकरण आवश्यक आहे. स्वत:च्या आरोग्यासह इतरांच्या सुरक्षेच्या दृष्टीनेही लसीकरण महत्वाचे आहे. त्यामुळे लसीकरणाचे दोन्ही डोस घेतलेल्या आणि दुसऱ्या डोसपासून सहा महिने पूर्ण झालेल्या प्रत्येक पात्र व्यक्तीने लसीकरणासाठी पुढे यावे, असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.