Dhargad Yatra Akola : शिवभक्तांचे आराध्य दैवत श्री क्षेत्र धारगड यात्रा (Dhargad Yatra) साजरी करण्यास प्रशासनानं हिरवा झेंडी दाखवला आहे. कोरोनामुळं दोन वर्षानंतर प्रथमच धारगड यात्रा असणार आहे. धारगड यात्रेला दूरवरुन शिवभक्त 'हर हर बोला महादेव' चा गजर करत निसर्ग सौंदर्याचा आनंद घेत तिसर्‍या श्रावण सोमवारी हजारोंच्या संख्येने दाखल होणार आहे. निसर्ग सौंदर्य आणि अध्यात्माचा सुरेख संगम असलेल्या या महोत्सवाला अखेर दोन वर्षानंतर प्रारंभ होणार आहे. पुढचा रविवार म्हणजेचं 14 ऑगस्ट अन् तिसरा श्रावण सोमवार, 15 ऑगस्टला ही धारगड यात्रा राहणार आहे. 


श्रीक्षेत्र धारगड येथे शिवालय असून सातपुड्याच्या पर्वत रांगामध्ये मेळघाटात वसलेले आहे. तीन हजार फूट उंचीवर हजारो वर्षांपासून उभ्या असलेल्या अतिशय प्राचीन अशा नरनाळा किल्ल्याच्या जवळ आहे. येथे चार गुहा असून, या गुहेमध्ये दोन स्वयंभू शिवलिंग व नंदी आहेत. महादेवाचे हे शिवलिंग केव्हा व कसे निर्माण झाले, याचा कुठलाही ठोस पुरावा इतिहासात आढळत नाही. याबाबत आख्यायिका मात्र ऐकायला मिळतात. दरम्यान, श्री क्षेत्र धारगडमध्ये असलेला निसर्गनिर्मित धबधबा भक्तावर जणू जलाभिषेक करतोय. निसर्गाने केलेली भक्तांची पूजा प्रत्यक्ष अनुभवण्यासारखीच आहे. या यात्रेमध्ये सहभागी झाल्यानंतरच तिचा चांगलाचं गोडवा अनुभवायला येतो. भक्तीचा हा महापूर श्रावणच्या तिसऱ्या सोमवारी पाहण्यासारखा असतो. कोरोना काळात दोन वर्षापासून बंद असलेली श्री क्षेत्र धारगड यात्रेला आता प्रारंभ होणार आहे.




  
पायदळ यात्रेचा असा असणार मार्ग 


भक्तांसाठी शिवपुर, कासोद, अमोना ते क्षेत्र धारगड़ महादेव मंदिर असा पायदळ मार्ग असणार आहे. रविवारी 14 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजल्यापासून शिवपूर येथून पायदळ मार्गाला सुरुवात होईल. अन् दुसऱ्या दिवशी म्हणजेच सोमवारी रात्री बारा वाजता धारगड यात्रा बंद होणार आहे.




असा असणार वाहनांचा मार्ग


धारगडला जाण्यासाठी वाहनाचा मार्ग हा अकोटवरुनच आहे. अकोटातील रस्ते रविवारीच भक्तांनी फुलून जातात. धारगड हे पूर्वी दुर्गम भागात होते. पण, आता बसेस सोबत खासगी वाहनेसुद्धा धारगडपर्यंत जात आहे. श्री क्षेत्र धारगड हे अकोटवरून पाऊल वाटेने 25 किमीवर असून, वाहनाच्या रस्त्याने 40 ते 45 किमी येते. पोपटखेड, खटकली टी पॉईंट गुलरघाट टी पॉईंट धारगड क्षेत्र असा आहे. धारगड क्षेत्र येथे वाहनांसाठी 50 रुपये तर टू व्हीलरसाठी 20 रुपये पार्किंग दर असणार आहे. धारगड टी पॉईंटपासून मंदिरापर्यंतचा मार्ग हा पायदळ मार्ग असणार आहे.




काय आहे सातपुड्याच्या कुशीतील धारगड यात्रा 


सातपुडा पर्वतरांगांमध्ये वसलेल्या धारगड गुफाजवळ दरवर्षी श्रावणातील तिसऱ्या सोमवारी महादेवाची यात्रा भरते. त्यामुळं रविवारपासूनच शिवभक्त धारगडच्या वाटेला लागतात. पायदळ जाणारे शिवभक्त आकोटवरून शिवपुर, कासोद मार्गे आमोना, धारगड पाऊलवाटेने रात्रीच्या वेळी अंधारात जयभोलेचा गजर करीत मार्गक्रमण करीत असतात. त्यामुळं सातपुड्याच्या कडांमध्ये 'हर बोला महादेव'चा आवाज गुंजत असतो. धारगड इथे पोहोचल्यानंतर गडावरून नेहमी पाण्याची धार खाली कोसळत राहते. या धारेखाली भक्त स्रान करतात त्यानंतर गुहेमधील मोठ्या महादेवावर जलाभिषेक करतात. त्यातील काही शिवभक्त लहान महादेवावर जातात. नंतर तेथून शार्दूलबुवाची टेकडी चढून दुपारपर्यंत एकेरी रस्त्याने नरनाळा किल्ल्यावर पोहोचतात. किल्ल्यावरून शहानूर येथे खाली उतरतात. तर काही कुटूंब खटकाली मार्ग सोमवारी थेट आपल्या वाहनाने धारगडला जाऊन दर्शन घेऊन परत येतात. धारगड गुफेत असलेले भुयार नरनाळा किल्यावर निघते असे सांगण्यात येते. पंरतु सुरक्षेच्या दृष्टीने भुयारी मार्ग कधीचाच बंद करण्यात आला आहे. आज हा परिसर व्याघ्र प्रकल्पात गेल्यामुळे राखीव वनक्षेत्र बनला आहे. त्यामुळं यात्रा महोत्सव वगळता वर्षभर या ठिकाणी प्रवेश बंदी असते.