अकोला : अकोल्यातील रिपाई आठवले गटाचा महानगराध्यक्ष गजानन कांबळेवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील रामदासपेठ पोलीस स्टेशनमध्ये आज हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेल्वे स्टेशन परिसरातल्या एका पॉश हॉटेलमध्ये अनेकदा पीडित तरूणीवर अत्याचार केल्याचा आरोप तक्रारीत केला आहे. पीडित तरूणी पक्षाच्याच एका महिला पदाधिकाऱ्याची मुलगी आहे. दरम्यान गजानन कांबळे फरार आहे. 


गजानन कांबळे हा रामदास आठवलेंच्या निकट वर्तुळातील आहे. सध्या त्याची आठवले गटाकडून विधान परिषदेवर वर्णी लावण्यासाठी लॉबिंग सुरू आहे. कांबळेवर या आधी खून, मारहाणीसह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, कांबळेनं काल दिल्लीतील तालकटोरा स्टेडियमवर झालेल्या 'हर घर तिरंगा' कार्यक्रमात केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंसह उपस्थिती लावल्याचे फोटो समोर आले आहेत. सध्या गजानन कांबळे हे फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. 


नेमकं काय आहे प्रकरण? 
अकोल्यातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचा अकोला महानगराध्यक्ष गजानन काशिनाथ कांबळेवर एका 30 वर्षीय तरूणीने लग्नाचे आमिष दाखवत शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप केला आहे. लग्नाचं आमिष दाखवून अनेकदा विविध हॉटेलवर नेत बळजबरी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचं तिनं पोलीस तक्रारीत म्हटलं आहे. हा प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती. तसेच मारहाणही केल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणी महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार रामदास पेठ पोलीस ठाण्यात गजानन कांबळे याच्यावर 376 (2)(N), 323, 504 आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, गजानन कांबळे आणि तक्रारकर्ती महिला यांच्यात गेल्या चार वर्षापासून ओळख असून पुढं त्यांचं प्रेमात रूपांतर झालं होतं. या संदर्भात अधिक तपास रामदास पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजीवनी पुंडगे करीत आहेत.
 
गजानन कांबळेवर या आधीही गंभीर गुन्हे 
गजानन कांबळेवर या आधी खून, खंडणी, मारहाणीसह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. पाच वर्षांपूर्वी झालेल्या सुनिल धोपेकर हत्याकांडात गजानन कांबळे मुख्य आरोपी होता. अकोला शहरातील वाशिम बायपास परिसरात कांबळेचं मोठं प्रस्थ आहे. या भागातल्या गुन्हेगारी जगतातही गजानन कांबळेचा दबदबा आहे.  


गजानन कांबळे रामदास आठवलेंचा निकटवर्तीय 
गजानन कांबळे हा रिपाइं आठवले गटाचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंचा निकटवर्तीय आहे. गेल्या दहा वर्षांपासून तो आठवलेंच्या पक्षाचा अकोला महानगराध्यक्ष आहे. खुनासारखे गंभीर गुन्हे दाखल झाल्यानंतरही आठवलेंना त्याला पदावरून दूर केलं नाही. 2017 मध्ये गजानन कांबळेच्या पत्नीला आठवले गटाकडून महापालिकेचं तिकीट मिळालं होतं. मात्र, त्या यात पराभूत झाल्या होत्या. महिनाभरापूर्वीच रामदास आठवलेंनी गजानन कांबळेच्या मुलाच्या लग्नाला उपस्थिती लावली होती. दरम्यान, कांबळेनं काल दिल्लीतील तालकटोरा स्टेडियमवर झालेल्या 'हर घर तिरंगा' कार्यक्रमात केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंसह उपस्थिती लावल्याचे फोटो समोर 'एबीपी माझा'च्या हाती आले आहेत.