अकोला : अकोटचे भाजप आमदार प्रकाश भारसाकळे ओळखले जातात त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी. 1990 पासून सतत सात टर्म आमदार असलेल्या प्रकाश भारसाकळेंना अद्यापही मंत्रीपदाची लॉटरी लागली नाही.‌ याच मंत्रिपदावरून त्यांना प्रश्न विचारला असता त्यांनी आपल्याच पक्षाच्या मंत्र्यांना घरचा आहेर दिला. जे लोक मंत्री होते त्यांनी काय दिवे लावलेत असा सवाल त्यांनी विचारला. आमदार प्रकाश भारसाकळे यांच्या या वक्तव्याची आता चर्चा सुरू आहे. 


आमदार प्रकाश भारसाकळे यांच्या प्रचारासाठी अकोटमध्ये आलेल्या नितीन गडकरींनी 2014 मध्ये त्यांना मंत्री करणार असल्याचं आश्वासन जाहीर सभेतून दिलं होतं. मात्र त्यानंतर दोनदा अकोटमधून निवडून आल्यानंतरही भारसाकळेंना मंत्रिपदाने हुलकावणी दिलीय. यावर बोलताना त्यांनी मंत्री असणाऱ्यांनी काय दिवे लावलेत?, असं म्हणत गडकरी यांच्यासह आपल्याच मंत्र्यांच्या कामावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. मात्र आपण काय बोलून बसलो हे कळल्यानंतर आमदार भारसाकळे यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केलाय. 


काय म्हणाले आमदार प्रकाश भारसाकळे? 


आमदार प्रकाश भारसाकळे म्हणाले की, मी हौशी माणूस नाही. ते मंत्री होते, त्यांनी काय दिवे लावलेत हे तुम्हाला माहित आहे. गडकरी हा फार मोठ्या मनाचा माणूस. त्यांनी म्हटलं होतं की मला मंत्री करणार. परंतु मी मंत्री झालो नाही.  मी पक्षाकडे कधीच काही मागत नसतो. मी मंत्री नसलो तरी आमदार तर आहे ना?  मी आता निवडून आलो की मंत्री‌ होईन. मला जे मिळते त्यात मी खूश असतो.


कोण आहेत प्रकाश भारसाकळे? (Who Is Prakash Bharsakale) 


- 1990 पासून तब्बल सात वेळा दोन वेगवेगळ्या मतदारसंघातून आमदार म्हणून विधानसभेवर प्रतिनिधित्व. 
- 1990, 1995, 1999, 2004 आणि 2005 मधील पोटनिवडणुकीत अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार. 
- 2005 मध्ये नारायण राणे यांच्यासोबत शिवसेना सोडत काँग्रेसमध्ये प्रवेश. 
- 2009 मध्ये दर्यापूर मतदारसंघ राखीव झाल्यानंतर अकोला जिल्ह्यातील अकोटकडे मोर्चा वळवला. 
- 2009 मध्ये अकोटमधून काँग्रेसने उमेदवारी नाकारल्यानंतर अपक्ष म्हणून 35,000 मतं घेतली. 
- 2014 मध्ये भाजपात प्रवेश. भाजपच्या उमेदवारीवर अकोट मतदारसंघातून विजयी. 
- 2019 मध्ये अकोटमधून दुसऱ्यांदा भाजपच्या तिकिटावर विजयी.


ही बातमी वाचा: