अकोला: राष्ट्रवादीच्या शरद पवार (Sharad Pawar) गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी अजितदादा गटाचे 15 आमदार शरद पवारांच्या संपर्कात असल्याचा दावा केला होता. या दाव्याचा समाचार घेतांना अजित पवार (Ajit Pawar)  गटाने जयंत पाटील यांच्यावर पलटवार केला आहे. कुणाचे किती आमदार कुणाच्या गटात जाणार याचं उत्तर 25-26 तारखेपर्यंत महाराष्ट्राला समजेल असं अजित पवार गटाचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) म्हणाले. ते अकोला येथे बोलत होते. त्यांच्यातलाच एक मोठा नेता कुणाच्या संपर्कात आहे याचं उत्तर लवकरच मिळेल असंही आमदार अमोल मिटकरी म्हणालेय. 


जयंत पाटील यांना उत्तर देताना अमोल मिटकरी म्हणाले की, "कुणाचे किती आमदार कुणाच्या गटात जाणार याचं उत्तर 25-26 तारखेपर्यंत महाराष्ट्राला समजेल. शरद पवार गटातला एक मोठा नेता कुणाच्या संपर्कात आहेत याचं उत्तर लवकरच मिळेल. सांगली जिल्ह्यातील आमदार मानसिंगराव नाईक आधीपासूनच शरद पवारांसोबत आहेत. त्यामूळे ते आमच्या गटातून गेलेत या चर्चांमध्ये तथ्य नाही. कोण कोणत्या गटात याचं लवकरच उत्तर मिळेल. महाराष्ट्रासमोर दूध का दूध, पाणी का पाणी होईल."


पाच राज्यातील निवडणुकीवर बोलताना अमोल मिटकरी म्हणाले की, दोन्ही गटांनी पाच राज्यांत निवडणूक न लढवण्याचा निर्णय एकाचवेळी होणं हा केवळ योगायोग आहे. शेवटी आमच्यात बोलणं होत असतंच. दोन्ही गटांतील नेत्यांत संवादाचे सूर आहेत, विसंवाद नको. परतीचे दोर त्यांनी कापले असले तरी शरद पवार गटाने अजितदादांच्या नेतृत्वात एकत्र यावे यासाठी आमचे आजही प्रयत्न आहे. 


रोहीत पवार यांच्या संघर्षयात्रेवर काय म्हणाले मिटकरी? 


आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या नियोजित संघर्षयात्रेवर बोलताना अमोल मिटकरी म्हणाले की, रोहीत पवारांना आमच्या शुभेच्छा आहेत.  त्यांना कुणाविरूद्ध संघर्ष करायचा हे त्यांनी ठरवून घ्यावं. जर ते आपल्याच लोकांविरुद्ध संघर्ष करणार असतील तर जनताच त्यांच्याविरुद्ध संघर्ष करेल. दादांच्याविरोधात ते बोलतात. आम्हाला ते एकेरी भाषेत बोलतात, गद्दार म्हणतात, ते त्यांनी करू नये. त्यांनी संघर्ष यात्रेत अजितदादा किंवा आमच्या इतर वरिष्ठ नेत्यांबद्दल बोलले तर आम्हालाही दुसरी यात्रा काढावी लागेल. रोहीत पवार हे कधीच अजितदादा होऊ शकत नाहीत. त्यांनी अजितदादांविरोधात बोलून स्वत:ची छबी खराब करू नये. 


लोकसभेचे आणि विधानसभेचे जागावाटप कसे होणार, तीन पक्षांचा जागावाटपाचा फॉर्म्युला काय असेल असा प्रश्न विचारल्यानंतर अमोल मिटकरी म्हणाले की, मी यावर काही बोलणार नाही. तीनही पक्षाचे वरिष्ठ नेते यावर एकत्रित बसून चर्चा करतील. 


ही बातमी वाचा: