Maharashtra Akola News : तिनं पोलिसांची वर्दी घालून देशसेवा करण्याचं आभाळभर स्वप्नं पाहिलं होतं. आपल्या स्वप्नाला गवसणी घालण्यासाठी ती दररोज अकोल्यातील वसंत देसाई स्टेडियमवर धावधाव धावायची. मात्र, काल संध्याकाळची तिची धाव अखेरचीच ठरली. तिनं ज्या मैदानाच्या बळावर पोलीस बनायचं स्वप्नं पाहिलं होतं, त्याच मैदानावर तिनं अन् तिच्या स्वप्नानं शेवटचा श्वास घेतला. ही दु:खद कहानी आहे, अकोला (Akola) जिल्ह्यातील धोतर्डी गावातील रोशनी वानखडे या 22 वर्षीय तरूणीची.
काय आहे घटना?
सध्या अनेक तरुण-तरुणी प्रचंड जोमानं पोलीस भरतीच्या (Police Bharti) तयारीला लागले आहेत. मात्र हिच पोलीस भरतीची तयारी करत असताना एक दुर्दैवी अन् दुःखद घटना अकोल्यात घडली आहे. पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या एका 22 वर्षीय तरुणीचा धावताना ग्राउंडवर जागीच कोसळून मृत्यू झाला आहे. ही घटना काल अकोला शहरातील वसंत देसाई स्टेडियमवर घडली आहे.
रोशनी अनिल वानखडे असं मरण पावलेल्या या 22 वर्षीय तरुणीचं नाव अहे. ती मूळची अकोला तालुक्यातील धोतर्डी येथील रहिवासी आहे. गेल्या काही दिवसांपासून रोशनी तिच्या बहिणीकडे शहरातील रणपिसेनगर भागात राहत होती. तिच्या वडिलांचं निधन झालं असून कुटुंबात आई, दोन भाऊ आणि बहिण आहे. दरम्यान, मागील काही महिन्यांपासून रोशनी पोलीस भरतीचा अभ्यास करत असून शहरांतील वसंत देसाई स्टेडियमवरील मैदानावर शारीरिक कसरत आणि धावण्याचा सराव करत होती. मात्र, काल सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास धावताना 'ती' अचानक कोसळली आणि तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान, नेहमीप्रमाणे रनिंग सुरु असताना तिला चक्कर येऊ लागली आणि रोशनी जागीच खाली पडली. यावेळी तिच्या सोबत असलेल्या मैत्रिणी तिला शुद्धीत आणण्याचा प्रयत्न केला. मात्र तिच्यात हालचाली झाल्या नाही. लागलीच तिला रुग्णालयात हलवण्यात आलं. परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.
...अन तिचं स्वप्नं हवेतच विरलं
रोशनीच्या मृत्यूमुळे मैदानावर धावाधाव करणाऱ्या अनेकांना धक्का बसला आहे. आठ वर्षांपुर्वीच तिच्या वडिलांचं निधन झालं असून पोलीस होऊन कुटुंबाला हातभार लावेल, असं तिचं स्वप्न होतं. मात्र रोशनीच्या अचानक जाण्यामुळे संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. तरीही तिच्या मृत्युचं नेमकं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, रोशनीला कुठल्याही प्रकारचा आजार नव्हता.
दोन गुणांनी हूकलं होतं पोलीस होणं
मागील वर्षी रायगडला पोलीस भरतीमध्ये रोशनीने प्रयत्न केला होता. मात्र, इथे तिला दोन गुणांनी अपयश आलं होतं. यावर्षीच्या भरतीत काहीही करून यश मिळवायचंच यासाठी ती आता जोमाने सराव करीत होती.