Amol Mitkari : विधिमंडळात झालेल्या राड्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आज चांगलेच चर्चेत आलेत. मात्र, आमदार अमोल मिटकरी यांना आपल्या गावातच जोरदार राजकीय हादरा बसला आहे. अकोट तालूक्यातील कुटासा या त्यांच्या गावाच्या सोसायटीच्या निवडणुकीत त्यांच्या पॅनलचा दारूण पराभव झाला आहे. सोसायटीच्या सर्व 13 जागांवर मिटकरींच्या पॅनलचा दारूण पराभव झाला आहे. प्रदेश युवक काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते कपिल ढोके आणि भाजपानेते विजयसिंह सोळंके यांच्या नेतृत्वाखालील 'कास्तकार पॅनल'नं सोसायटीवर झेंडा फडकवला आहे.
अमोल मिटकरींच्या 'ग्रामस्वराज पॅनल'चा या निवडणुकीत पुर्ण धुव्वा उडाला आहे. काँग्रेस-भाजपच्या संयुक्त पॅनलच्या विजयानं आमदार मिटकरींना अस्मान दाखवलं आहे. आज झालेल्या या निवडणुकीत 763 पैकी 597 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. याआधी मिटकरींच्या उमेदवाराचा कुटासा जिल्हा परिषद गटात प्रहारच्या उमेदवाराकडून पराभव झाला होता.
..अन गावातील विरोधकांनी आमदार अमोल मिटकरींना दाखवले अस्मान :
अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातल्या कुटासामध्ये आज सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक आज पार पडली आहे. या सेवा सहकारी सोसायटी पंचवार्षिक निवडणूकीत कपिल ढोके यांचं 'कास्तकार' पॅनलने आमदार अमोल मिटकरी यांच्या 'ग्राम स्वराज्य' पॅनलचा पराभव करीत दणदणीत विजय मिळवला आहे. कास्तकार पॅनलचे सर्व 13 उमेदवार विजयी झाले आहेत. प्रदेश युवक काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते कपिल ढोके यांच्या नेतृत्वाखालील संपूर्ण पॅनल विजयी झाले आहे. गावातील भाजपचे नेते आणि जिल्हा परिषदेचे माजी सभापती विजयसिंह सोळंके यांच्यासोबत त्यांनी आघाडी करीत ही निवडणुक लढविली. यात राष्ट्रवादीचे विधान परिषद आमदार अमोल मिटकरी यांचं संपूर्ण पॅनलचे उमेदवार पराभूत झाले आहेत. आज कुटासा सेवा सहकारी सोसायटीमध्ये 13 जागांसाठी मतदान झालं. या निवडणुकीत एकूण 763 मतदार होते. यातील एकूण 597 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.
असे आहेत कपिल ढोके यांच्या पॅनलचे विजयी उमेदवार? :
आहाद अ. इसाक, सारंगधर इंगळे, प्रभाकर गावंडे, सुभाष गवई, ज्ञानदेव, झामरे, सुधाकर लाखे, विठ्ठल झामरे, वैभव झामरे, सुनंदा उगले, सागर ढोके, गणेश साबळे गणेश, शकुंतला निकम, अनंत कापस हे सर्व उमेदवार विजयी झाले आहेत.
असे आहेत आमदार अमोल मिटकरी यांच्या पॅनलचे पराभूत उमेदवार :
कैलास गायकवाड़, राजू झटाले, दशरथ झामरे, माणिकराव झामरे, सुनिल झामरे, रामभाऊ पातोंड, संतोष सदाफळे, गजानन गावंडे, मंगेश कापसे, रंजना गावंडे, अन्नपुर्णा थोरात, शिवाजी लाखे आणि गजानन लताड़.
जिल्हा परिषदेनंतर गावात सलग दुसरा पराभव :
कुटासा हे आमदार अमोल मिटकरी यांचं मुळ गाव आहे. दोन वर्षांपुर्वी आमदार झाल्यानंतर आमदार अमोल मिटकरी यांनी गावातील ग्रामपंचायत निवडणुक लढविली यात. यात त्यांनी 11 पैकी 9 जागा जिंकत ग्रामपंचायत ताब्यात घेतली. मात्र, जानेवारी 2022 मध्ये झालेल्या कुटासा जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीत मिटकरींच्या उमेदवाराचा पराभव करीत बच्चू कडू यांच्या प्रहारच्या उमेदवार स्फुर्ती गावंडेंनी पराभव केला होता. ही निवडणुक राज्यभर गाजली होती. आता जिल्हा परिषदेनंतर आमदार मिटकरींना सोसायटीत सलग दुसर्यांदा पराभवाचं तोंड पहावं लागलं आहे.