Agriculture News : शेतकरी (Farmers) आपल्या शेतात सातत्यानं नवनवीन प्रयोग करत आहे. या माध्यातून चांगल उत्पन्न घेत आहेत. असाच एक वेगळा प्रयोग अकोला (Akola) जिल्ह्यातील बार्शी टाकळी तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी केला आहे. हा प्रयोग आहे 'चिया' शेतीचा (chia Crop). बार्शी टाकळी तालुक्यातील मोरळ, भेंडी गाजी, बैरखेड पिंजर येथील शेतकऱ्यांनी ही शेती केली आहे. चार शेतकरी मित्रांनी युट्युबवरून ( (YouTube) धडे घेत एकमेकांच्या सहकार्यानं ही 'चिया' शेती केली आहे. चिया या पिकाचा विविध पेयांमध्ये वापर केला जातो. तसेच वजन कमी करण्यासाठी आहार तज्ज्ञांकडून देखील या बियांचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो. 




रब्बी हंगामासाठी चिया सक्षम पर्याय


अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातल्या शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी एका पिकाचा सक्षम पर्याय मिळाला आहे. हा पर्याय आहे चिया शेतीचा... अमेरिकेतील मेक्सिको प्रांतात प्रामुख्यानं या पिकाची शेती केली जाते. चिया या पिकाच्या बिया वापरल्या जातात फालूदा आणि इतर पेयांमध्ये... अन या शेतीची पायवाट गवसलीय ती 'युट्यूब'वरुन... बार्शीटाकळी तालूक्यातील वेगवेगळ्या गावातील चार शेतकरी मित्रांनी एकत्र येत ही नवी शेती केली आहे. यावर्षी पहिलंच वर्ष असल्याने चौघांनीही प्रत्येकी दोन एकरांवर हा प्रयोग केला आहे. ओमप्रकाश वानखडे ( पिंजर, जि. अकोला),  गजानन मार्गे (मोरळ) अशी शेतकऱ्यांची नावे आहेत. 


या चारही शेतकऱ्यांनी चिया शेती होत असलेल्या मध्यप्रदेशातील निमच येथे भेट दिली. नोव्हेंबर 2022 मध्ये चौघांनीही या पिकाची लागवड केली आहे. चार महिन्याचं हे पिक आता काढणीच्या अवस्थेत आहे. या चारही शेतकऱ्यांनी या पिकासोबतच इतरही पिकं घेतली आहे. गजानन मार्गेंनी आपल्या शेतात चियासह खरबूज, मिरची, कापूस, गहु, हरभरा, तीळ अशा पिकांची लागवड केली आहे. चिया पिकाला मध्यप्रदेशातील निमच, राजस्थान आणि नवी दिल्ली या मोठ्या बाजारपेठा आहेत. चिया शेती ही अतिशय किफायतशीर आहे. या पिकाला एकरी लागवड आणि संगोपनाचा खर्च हा पाच हजारांपर्यंत आहे. एकरी पाच ते सात क्विंटलचं उत्पन्न यातून मिळत आहे. क्विंटलमागे 15 ते 20 हजार रुपये भाव लक्षात घेता यातून एकरामागे किमान लाखभरापर्यंत नफा अपेक्षित आहे


'यू-ट्यूब'ने चार शेतकरी मित्रांना दाखवली शेतीची नवी 'पायवाट'


अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातल्या मोरळ, भेंडी गाजी, बैरखेड अन् पिंजर या वेगवेगळ्या गावातील चार शेतकरी. गजानन लक्ष्मणराव मार्गे, रवी मानतकर पाटिल, ओमप्रकाश वानखड़े पाटिल, उदय पाटील ठाकरे असं या चारही शेतकऱ्यांची नावे असून चौघेही चांगले मित्र आहेत. हे चौघेही मूळ शेतकरी असून पारंपारिक पद्धतीने पिके घेतात. मात्र त्यातून बदलत्या वातावरणामुळे हवं तसं उत्पन्न मिळत नाही. तसेच अनेकदा अतिवृष्टीचा फटका बसतो. त्यामुळे शेतीचं मोठं नुकसान होतं. त्यात जंगल परिसर असल्याने वन्य प्राण्यांचा हैदोस पाहायला मिळत आहे. म्हणून या संकटावर मात करण्यासाठी पारंपारिक शेतीला फाटा देत नवीन पिकांकडे वळण्याचा विचार केला. अन् या चौघांमधील उदय ठाकरे या शेतकऱ्याने 'चिया' शेती संदर्भात यूट्यूब तसेच गुगलवरुन माहिती गोळा केली. त्याची कल्पना इतर गजानन, रवी आणि ओमप्रकाश यांना दिली. या संदर्भात अधिक माहितीसाठी मध्यप्रदेशातील चिया लागवड भागात भेटी दिल्या अन् सर्व शेती पद्धत समजून घेतल्या.


चिया शेतीचे फायदे काय? 


किडीचा प्रादुर्भाव होत नसल्याने फवारणीचा खर्च नाही. 
लागवड आणि संगोपनाचा एकरी खर्च अतिशय कमी 
जंगली प्राणी हे पीक खात नसल्यानं जंगली प्राण्यांच्या त्रासापासून शेतकऱ्यांची मुक्तता 
खर्च कमी, उत्पादन जास्त आणि त्यामुळे नफा जास्त असं या शेतीचं सूत्र आहे


गजानन मार्गेंनी रोवली 'चिया शेती'ची मुहूर्तमेढ :


गजानन मार्गे हे मोरळ गावातील रहिवासी आहेत. त्यांच्याकडे 44 एकर शेती आहे. सुरुवातीला या शेतीत त्यांनी पारंपारिक पिके घेतले, ज्यामध्ये सोयाबीन, कापूस आणि तूर ही पिके होती. परंतु निसर्गाच्या लहरीपणामुळे पाहिजे तेवढं उत्पन्न यातून मिळत नव्हतं. या शेतीला फाटा देत त्यांनी घेतलेला निर्णय म्हणजेच 'चिया' शेती. सुरुवातीला त्यांनी आपल्या दोन एकर शेतामध्ये चिया'ची लागवड करण्याचा विचार केला. अन् 2 एकरासाठी अडीच किलो बी-बियाणे मागावले. नोव्हेंबर 2022 म्हणजेच रब्बी हंगामात चिया'ची लागवड केली. आज चिया बियाणे भरणीवर आहेत. येत्या वीस दिवसात हे पीक पूर्णत: तयार होणार असल्याचेही गजानन मार्गे सांगतात. दरम्यान दोन एकरात प्रत्येकी चार ते पाच क्विंटल पेक्षा अधिक उत्पन्न होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. इतकंच नव्हे तर चिया बियाण्याला मागणीही चांगली असून 15 ते 20 हजार रुपयांपर्यंत प्रतिक्विंटल दर मिळू शकतात असेही ते म्हणतात.


'चिया शेती' म्हणजे 'कम शक्कर में कडक मिठी' :


मार्गे म्हणाले की चिया बियाणे शेतीला खर्च अगदी कमीच येतोय. 2 एकर शेतीसाठी बी-बियाण्यांसाठी लागणारा खर्च हा 2 हजार 500 रुपये. पेरणी खर्च दोन हजार रुपये, खुरपणी खर्च दोन हजार रुपये असा एकत्रित खर्च जवळपास पाच ते सहा हजार रुपयांच्या घरात येतो. खर्च वजा जाता निव्वळ 70 हजार ते 1 लाखांपर्यंत निव्वळ नफा मिळतो. दरम्यान या चिया शेतीवर कीडीचा प्रादुर्भाव होत नसून वन्यप्राणी देखील या शेतात फिरकत नाहीत. याशिवाय खते, औषधी फवारणीची गरज भासत नाही. तीन ते चार महिण्यात हाती येणारे हे पिक असून यासाठी पाच ते सहा वेळा पाणी द्यावे लागते. कापणी आणि काढणीच्यावेळी पीक उपटून काढले जावून यानंतर ते वाळवून मळणीद्वारे बियाणे वेगळे करावे लागते. दुसरीकडे चिया बियाणे लागवडीतून एक एकरातून सरासरी 5 ते 7 प्रति क्विंटल उत्पादन घेता येऊ शकते, असेही मार्गे सांगतात.




चियासह इतर पिकांचीही लागवड 


या चारही शेतकऱ्यांनी चिया शेती होत असलेल्या मध्य प्रदेशातील निमच येथे भेट दिली आहे. नोव्हेंबर 2022 मध्ये चौघांनीही या पिकाची लागवड केली आहे. चार महिन्याचं हे पिक आता काढणीच्या अवस्थेत आले आहे. या चारही शेतकऱ्यांनी या पिकासोबतच इतरही पिकं घेतली आहेत. गजानन मार्गेंनी आपल्या शेतात चियासह खरबूज, मिरची, कापूस, गहू, हरभरा, तीळ अशा पिकांची लागवड केली आहे. 


चिया पिकाला मध्य प्रदेशातील निमच, राजस्थान आणि नवी दिल्ली या मोठ्या बाजारपेठा आहेत. चिया शेती ही अतिशय किफायतशीर आहे. या पिकाला एकरी लागवड आणि संगोपनाचा खर्च हा पाच हजारांपर्यंत आहे. एकरी पाच ते सात क्विंटलचं उत्पन्न यातून मिळते. क्विंटलमागे 15 ते 20 हजार रुपये भाव लक्षात घेता यातून एकरामागे किमान एक लाख रुपयापर्यंत नफा अपेक्षीत आहे. 


चिया शेतीचं अर्थशास्त्र


एकरी लागवडीसाठी लागणारा खर्च : 5 हजार रुपये
संभाव्य सरासरी एकरी उत्पन्न : 5 ते 7 क्विंटल
संभाव्य सरासरी बाजारभाव : 15 ते 20 हजार रुपये प्रती क्विंटल
खर्च वजा जाता निव्वळ नफा : 75 हजार ते 1 लाख प्रति एकर


'चिया'सोबतच आंतरपीकांचीही शेतकऱ्यांना मदत


गजानन मार्गे यांनी चिया शेतीतही आंतरपीक म्हणून मोसंबीचं पिक घेतले आहे. याशिवाय उर्वरित शेतीत खरबूज, मिरची, कापूस, गहु, हरभरा, तीळ सारखे पिकेही घेतले आहेत. दरम्यान मागील दोन दिवसात त्यांना खरबूज पिकातून 20 क्विंटलचं उत्पादन झालं आहे. दरम्यान गजानन लक्ष्मणराव मार्गे यांना तीन मुले असून तिघेही उच्चशिक्षण घेत आहेत. अन् शेती व्यवसायातून त्यांनी अधिक दोन एकर शेती विकत घेतली आहे.


अन्य तिघांनीही केली चिया'ची लागवड


बार्शीटाकळी तालुक्यातीलच बैरखेड गावात उदय पाटील ठाकरे यांनी आपल्या 2 एकर शेतात, तर भेंडीगाजी गावातील रवी मानतकर पाटील यांनी दोन एकर आणि पिंजर येथील ओमप्रकाश वानखडे पाटील यांनीही 1 एकरांत चिया लागवड केली आहे. 


पारंपारिक शेती आणि पीकपद्धतींच्या मळलेल्या वाटा सोडत नव्या पायवाटा शोधणं गरजेचं आहे. चिया शेती याच नव्या पायवाटेवरील शेतकरी उत्कर्षाचा नवा राजमार्ग ठरु शकतो.


महत्त्वाचे बातम्या:


Agri Innovation: आधुनिक तंत्रज्ञानाला सरकारी मदतीची जोड, वर्षाकाठी शेतकरी करतोय 10 लाखांची कमाई