Akola Crime : अकोला (Akola) जिल्ह्यातील सांगवी येथील प्रेमी युगूलाने (Couple) शनिवारच्या (18 फेब्रुवारी) रात्री विष (Poison) प्राशन केलं. दोघांनीही आधी विष प्राशन केल्यानंतर ते उरळ पोलीस स्टेशनमध्ये गेले. तेथे दोघेही अत्यवस्थ झाल्याने त्यांना पोलिसांनी रुग्णालयात दाखल केलं. मुलीच्या घरातून दोघांच्या प्रेमाला विरोध होता. यातील प्रियकर मुलगा अतुल वायधने हा सांगवी बुद्रुक गावातील होता. तर अल्पवयीन प्रेयसी सांगवी खुर्द गावातील आहे. यात प्रियकर अतुलचा रविवारी (19 फेब्रुवारी) उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर मुलीची प्रकृती गंभीर असून तिच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, पोलीस स्टेशनमधील पीएसआयच्या दबावामुळे भावाने आत्महत्या केल्याचा आरोप मृताच्या भावाने केला आहे.


त्यांच्या प्रेमाला होता घरातून विरोध


अकोला जिल्ह्यातील सांगवी खुर्द येथील अतुल संजय वायधने (वय 23 वर्षे) याचं बाळापूर तालुक्यातील एका गावातील मुलीसोबत प्रेमसंबध होते. ही बाब मुलीच्या कुटुंबाला समजली. त्यामुळे मुलीवर दबाव आणून कुटुंबियांनी अतुल वायधने याच्याविरुद्ध उरळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी ॲट्रॉसिटीनुसार गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली होती. त्यानंतर 31 डिसेंबर 2022 रोजी युवकाने मुलीस पळवून पुण्याला नेले. या प्रकरणातही पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर युवक मुलीला घेऊन 16 फेब्रुवारीला शिवसेना वसाहतीत राहणाऱ्या मावशीकडे आला होता. 19 फेब्रुवारी रोजी मुलीसोबत युवक उरळ पोलीस ठाण्यात हजर होणार होता. परंतु पोलीस ठाण्यात हजर होण्यापूर्वीच दोघांनी विषारी औषध प्राशन केले आणि उरळ येथे आले. प्राथमिक आरोग्य केंद्रासमोरच दोघे कोसळल्याने पोलिसांनी त्यांना तातडीने सर्वोपचार रुग्णालयात भरती केले. उपचारादरम्यान अतुल वायधने याचा मृत्यू झाला तर मुलगी मृत्यूशी झुंज देत आहे. याप्रकरणात उरळ पोलिसांनी आकस्मिक मृत्यू नोंद केली आहे.


उरळ पोलिसांवर मृताच्या कुटुंबियांचा आरोप 


अतुल बायधणे याने उरळ पोलिसांच्या दबावाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप मृतकाच्या नातेवाईकांनी केला आहे. उरळ पोलीस स्टेशनचे पीएसआयवर कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह न उचलण्याचा निर्णय नातेवाईकांनी घेतला. नातेवाईकांनी पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांची भेट घेत, याप्रकरणात कारवाई करण्याची मागणी केली. पोलीस अधीक्षक घुगे यांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी अतुलचा मृतदेह ताब्यात घेतला.


काय आहे मुलीने लिहिलेल्या चिठ्ठीत 


घरच्यांच्या दबावामुळे मी अतुलचा पोलिसांत खोटा रिपोर्ट दिला. माझं अतुलवर खूप प्रेम आहे आणि आम्ही लग्न करणार होतो. एक दिवस आम्ही दोघे बोलत असताना काकांना दिसलो आणि काकांना मला आणि अतुललाही मारहाण केली. जेव्हापासून आमचं प्रेम घरच्यांना माहिती पडलं तेव्हापासून त्यांच्याकडून आम्हाला प्रचंड त्रास झाला. नेहमी सतत टोमणे, माझे बाबा काठीने माझ्या पायावर मारायचे. जेवण सुद्धा द्यायचे नाही. शाळाही बंद केली. शेतात पाठवायचे. शाळेसाठी लागणाऱ्या लेटर वह्यांसाठी घरच्यांना पैशाची मागणी केली पण त्यांना वाटायचं की मी अतुलसाठी पैसे मागते. त्रास असह्य होत होता. मला घरी हे सारं भोगाव लागत होता. यासाठी अतुलला म्हटलं मला येथून घेऊन जा, अन्यथा मी जीव देईन. तेव्हा ते मला 31 डिसेंबर 2022 ला पुण्याला घेऊन गेले. त्यानंतर पोलीस अतुलच्या कुटुंबियांना प्रचंड त्रास देत होते. अतुलच्या मोठ्या भावाला पोलीस म्हणायचे तू त्या दोघांना घेऊन ये नाहीतर तुलाच आत टाकू, अशा धमकी द्यायचे. आता आम्ही दोघेही या गोष्टींना कंटाळलो आहे, त्यामुळे त्यामुळे माझं जीवाचं काही बरं वाईट झालं तर त्याला जबाबदार उरळ पोलीस राहतील. बस आता आमच्या दोघांना जगू द्या, आमचं लग्न लावून द्या एवढीच माझी इच्छा आहे.


काय म्हणतात उरळ पोलीस? 


युवकाने मुलीला पळवून नेल्याप्रकरणात गुन्हा दाखल केला होता. तपासादरम्यान मृतावर कोणताही दबाव पोलिसांनी आणला नाही. पोलिसांनी कारवाईदरम्यान कोणालाही धाकदपटसुद्धा केली नाही. पोलीस कायद्यानुसार कारवाई करत आहेत.


हेही वाचा


Panvel Crime : आदिवासी पाड्यावरील प्रेमीयुगुलाची आत्महत्या, कुटुंबीय लग्नाला नकार देण्याच्या भीतीने आयुष्य संपवलं