Akola Rain : राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस (Heavy Rain) कोसळताना दिसत आहे. या पावसामुळं काही भागात जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या अकोल्यातही (Akola Rain) मुसळधार पाऊस सुरु आहे. अकोल्यातील अकोट तालुक्यात पठार नदीच्या पाण्यात अचानकपणे पहाटेपासून वाढ झाली आहे. त्यामुळं अकोल्यातील पनोरी आणि जणोरी गावाचा संपर्क तुटला आहे. 


मुसळधार पावसामुळं पठार नदीला पूर आला आहे. यामुळं अकोल्यातील पनोरी आणि जणोरी गावाचा संपर्क तुटला आहे. अकोल्यातील अकोट तालुक्यातल्या पठार नदीच्या पाण्यात अचानकपणे पहाटेपासून वाढ झाली आहे. पणोरी आणि जणोरी गावाच्या रस्त्यावरील पठार नदीवर पुलाचं बांधकाम सुरु आहे, म्हणून गावकऱ्यांना पर्यायी वाहतूकीसाठी पर्यायी रस्त्या बांधला होता. पण सातपुडा पर्वतरांगात सुरु असलेल्या पावसामुळं पठार नदीला पूर आला आहे. हा पर्यायी रस्ता वाहून गेला आहे. सद्यस्थितीत दोन्ही गावांचा संपर्क तुटला असून गावकऱ्यांचा नदीतून जीवघेणा प्रवास सुरू आहे. 


अनेक भागात अतिवृष्टीचा इशारा


राज्यातील काही जिल्ह्यांना हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशाराही दिला आहे. यामध्ये कोकणातील जिल्ह्यांचा समावेश आहे. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी बाळगावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. दरम्यान, मुंबई, ठाणे, भिवंडी, नवी मुंबईसह लगतच्या भागात पावसाची रिमझिम सुरु आहे. मुंबईच्या तुलनेत मुंबई महानगर प्रदेशात पावसाचा जोर अधिक आहे. मुंबई शहर आणि उपनगरात कुठे तरी एखादी सर पडत असली तरी ढगाळ हवामान कायम आहे. आज सिंधुदुर्ग जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर रत्नागिरी, सातारा, कोल्हापूरला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर सोमवार, मंगळवार आणि बुधवारी रायगडरत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, पुणे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.


पेरणीच्या कामांना वेग


दरम्यान, ज्या भागात चांगला पाऊस झाला आहे, त्या भागात पेरणीच्या कामांना वेग आला आहे. ठिकठिकाणी शेतकरी पेरणी करताना दिसत आहे. मात्र, काही ठिकाणी अद्यापही पेरणीसाठी चांगल्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे. दरम्यान, चांगला पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करु असा सल्ला कृषी विभागाच्या वतीनं दिला आहे. साधारणत: 100 मिलीमिटर पावसाची नोंद झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करु नये असं आवाहन कृषी विभागाच्या वतीनं करण्यात आलं आहे.


महत्वाच्या बातम्या:


सावधान! आज राज्यात मुसळधार पावसाचा इशारा, कुठं रेड तर कुठं ऑरेंज अलर्ट जारी