Akola News: अकोला जिल्ह्यातील (Akola District) बाळापूर शहरातील मन नदीत दोन लहान मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली आहे. 7 वर्षीय मोहम्मद नब्बान मोहम्मद फहीम आणि 9 वर्षीय दानियाल मोहम्मद फैय्याज अशी या दोन्ही मयत मुलांची नावं आहेत. मृत मुलं ही काल (रविवारी) संध्याकाळी मन नदीकाठी खेळत होती. अचानक त्यांचा तोल जाऊन पाय घसरला आणि नदीत बुडाली असावीत असा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान, या घटनेनंतर बाळापूर शहरात चांगलाच गोंधळ उडाला असून या प्रकरणी बाळापूर पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
घटना नेमकी काय?
अकोला जिल्ह्यातील बाळापूर शहरातून 'मन' नदी वाहते. या नदीच्या काठावर अनेक घरं तसेच वस्त्या आहेत. या परिसरातील अनेक लहान मुलं नदीकाठावर खेळत असतात, नेहमीप्रमाणे म्हणजेच, काल रविवारी संध्याकाळी काही मुलं नदीकाठी खेळत असताना, यातील दोन लहान मुलांचा तोल जाऊन म्हणजेच, पाय घसरल्यानं नदीत बुडाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. याची माहिती स्थानिक नागरिकांना मिळताच त्यांनी नदीकाठी धाव घेतली आणि नदीत उड्या घेतल्या. नदीत शोध-बचाव कार्य सुरू झालं. मात्र तोपर्यंत त्या दोन्ही मुलांचा मृत्यू झाला होता. दोघांचेही मृतदेह नदी बाहेर काढण्यात आले अन् वैद्यकीय तपासणीसाठी अकोल्यातील शासकीय रुग्णालयात रवाना करण्यात आले आहेत.
दरम्यान, 7 वर्षीय मोहम्मद नब्बान मोहम्मद फहीम आणि 9 वर्षीय दानियाल मोहम्मद फैय्याज अशी मृत मुलांची नावं आहेत. आपल्या मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच कुटुंबीयांना मोठा धक्का बसलाय. तसेच, या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी चांगलाच गोंधळ घातला. संबधित प्रशासनाला धारेवर धरलं. कुटुंबीयांसह नागरिकांनी बाळापूर पोलीस स्टेशनला धाव घेतली आणि लागलीच नदीच्या काठावर भिंत उभारण्यासाठी या कायमस्वरूपी प्रश्नावर निर्णय घ्यावा, अशी मागणी पोलिसांकडे केली. सध्यास्थित बाळापूर पोलिसांनी या प्रकरणात आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेची माहिती मिळताच, उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांसह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष महल्ले घटनास्थळी दाखल झाले होते.
नदीच्या काठावर आवार भिंत उभारण्याची मागणी
बाळापूर शहरातील मन नदी काठावर अनेक घर आहेत आणि या नदीला मोठ्या प्रमाणात पाणी असते, त्यामुळे नदी काठावर आवार भिंत उभारण्यात यावी अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात आली आहे. तसेच, या घटनेनंतर पोलीस प्रशासनासह तहसील प्रशासन आणि पाटबंधारे विभागाने संयुक्त बैठक बोलावली आणि नदी काठावर आवार भिंत उभारण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे अहवाल पाठवला. दरम्यान, मन नदीच्या पुलावरही सुरक्षा कठडे नसल्यानं भविष्यात मोठ्या दुर्घटनेला सोमोरं जावं लागू शकतं, तत्पूर्वी इथेही नदीच्या पुलावर सुरक्षा कठडे उभारण्यात यावे, अशी मागणीही केली जात आहे.