Akola News : आपल्या पिकांचं नुकसान होऊ नये म्हणून शेतकरी (Farmers) रात्रीच्या अंधारात जीवाची पर्वा न करता पाणी द्यायला जातात. अनेकदा ही गोष्ट शेतकऱ्यांच्या जीवावरही बेतल्याच्या घटना घडल्या आहेत. असाच काहीसा प्रकार अकोला (Akola) जिल्ह्यात घडला आहे. शनिवारी पहाटे पाच वाजता एका शेतकऱ्याचा विजेचा धक्का (Electric Shock) लागून शेतातच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अकोला जिल्ह्यातील भौरत गावात ही घटना घडली असून, राजेश वासुदेव चांदुरकर (वय 42) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
राजेश चांदुरकर दोन कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे
राजेश चांदुरकर हे आपल्या शेतात गव्हाच्या पिकाला पाणी देण्यासाठी गेले होते. शेतातील मोटर सुरू करण्यासाठी गेले असताना अचानक विद्युत बोर्डमध्ये बिघाड झाला अन् ही दुःखद घटना घडली. दरम्यान, मृत शेतकरी राजेश चांदुरकर हे आई-वडिलांसह दोन कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे. कारण त्यांच्या लहान भावाचं कोरोनामुळं निधन झालं होतं. त्यांच्या कुटुंबालाही ते सांभाळत होते. आता घरातील दोघेही कर्ता व्यक्ती गेल्यानं चांदुरकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
नेमकं काय घडलं?
नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, अकोला जिल्ह्यातील भौरत गावात राजेश वासुदेव चांदुरकर (वय 42) यांचं कुटुंब वास्तव्यास आहेत. त्यांच्याकडे सहा एकर शेती असून त्यामध्ये गहू आणि हरभरा पीक आहे. दरम्यान रब्बी हंगामातील गव्हाला सध्या पाणी देणे सुरु आहे. राजेश हे नियमितप्रमाणे पहाटे पाच वाजता शेतात गेले होते. गव्हाला पाणी देण्यासाठी पाण्याची मोटर पंप सुरू केली. परंतू मोटर सुरू झाली नाही, मोटर का सुरू झाली नाही हे पाहण्यासाठी राजेशराव विद्युत बोर्डाजवळ गेले. विद्युत बोर्ड पाहणी करत असताना अचानक त्यामध्ये तांत्रिक बिघाड झाला अन् त्यांना जोरदार विजेचा शॉक लागला. या दुख:द घटनेत राजेश चांदुरकर यांचा जागीच मृत्यू झाला. याची माहिती गावकऱ्यांसह कुटुंबियांना समजतात त्यांनीही शेतात धाव घेतली. याशिवाय डाबकी रोड पोलिसही घटनास्थळी दाखल झाले होते. याप्रकरणी डाबकी रोड पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
कोरोना काळात राजेश यांच्या भावाचं झालं होतं निधन
राजेश चांदुरकर यांचे लहान भाऊ देविदास चांदुरकर यांचे कोरोना काळात निधन झाले होते. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी, एक मुलगा, एक मुलगी यांची जबाबदारी घरातीलच मोठा भाऊ राजेश याच्या खांद्यावर आली होती. तेव्हापासून आई-वडिल, स्वतःसह लहान भावाचं कुटुंब राजेश हे सांभाळायचे. आता चांदुरकर कुटुंबातील प्रमुख कर्ता व्यक्ती राजेश गेल्याने अख्ख कुटुंबावर मोठं संकट उभं झालं. कारण घरातील दोन्ही प्रमुख व्यक्तींना गमावावे लागले. आता राजेश यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुली, एक मुलगा अन् लहान भावाचं कुटुंब आहे.
महत्त्वाच्या बातम्या: