Amol Mitkari, Akola : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांना अकोला पोलीस अधिक्षकांच्या नावाने धमकी देण्यात आली आहे. घरावर दगडफेक आणि गाडी फोडणार असल्याची धमकी या व्यक्तीने दिली आहे. नरेश राऊत (Naresh Raut)नामक युवकाने ही धमकी दिली आहे. दोन दिवसांपूर्वी आमदार अमोल मिटकरी यांचे अकोल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांच्याशी फोनवरचे कथित संभाषण झालं. पोलिसांचा अपमान केला,असा आरोप करत युवकाकडून आमदार मिटकरींना धमकी देण्यात आली आहे.
आमदार अमोल मिटकर पोलीस ठाण्यात दाखल
आमदार अमोल मिटकरी अकोला शहरातील खदान पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले आहेत. मिटकरी यांनी संबंधित युवकावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. शिवाय धमकी देताना युवकाने आपल्याला तुमच्या घरावर आणि गाडीवर हल्ला करण्यासाठी दहा हजार रुपये मिळाले, असल्याचा दावा युवकाने केला आहे. या प्रकरणाची संपूर्ण माहिती आमदार मिटकरींकडून जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांना देण्यात आली आहे.
अमोल मिटकरींचे पोलिसांवर गंभीर आरोप
अमोल मिटकरी यांनी अकोला पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. ही धमकी पोलिसांच्या आशीर्वादाने देण्यात आली. त्यामुळेच दोषी युवकावर कारवाई करण्यात येत नाही. खदान पोलिसांनी आपल्याला अतिशय अपमानास्पद वागणूक दिल्याचा आमदार अमोल मिटकरी यांचा आरोप मिटकरी यांनी केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या प्रकरणी माहिती देणार असल्याचेही मिटकरी यांनी म्हटले आहे.
पोलीस अधिक्षकांच्या संवादावरुन मिटकरींचे स्पष्टीकरण
मी जिल्हा पोलीस अधीक्षक यांचावर दबाव आणण्याचा कुठलाही प्रयत्न केलेला नाही. उलट मी त्यांना विनंती केली आहे. अकोल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह हे चुकीच्या पद्धतीने काम करीत असल्याने मी त्यांची लेखी तक्रार मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे केली. अकोला शहरात वाढती गुन्हेगारी आणि अपराध यावर अंकुश लावण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी कठोर कारवाई करून जिल्ह्याचा कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवावा अशी, मागणी देखील एक लोक प्रतिनिधी म्हणून आम्ही केली आहे, असे स्पष्टीकरण अमोल मिटकरी यांनी दिले होते. अमोल मिटकरी यांचा पोलिस अधिक्षकांसोबतचा संवाद व्हायरल झाला होता. त्यानंतर त्यांनी स्पष्टीकरण दिले होते.
इतर महत्वाच्या बातम्या
सराईत गुन्हेगाराची आमदार अमोल मिटकरी यांच्याकडून पाठराखण?, पोलीस अधीक्षकांसोबतच्या संवादाची ऑडिओ क्लिप वायरल