अकोला : अकोला शिवसेनेत उभी फुट पडली असून शिवसेनेचे विधान परिषदेतील आमदार विप्लव बाजोरिया, त्यांचे वडील आणि शिवसेनेचे माजी आमदार गोपीकिशन बाजोरियांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. गोपीकिशन बाजोरिया हे शिवसेनेचे विधान परिषदेत तीन टर्म आमदार राहिलेले आहेत. गेल्या नोव्हेंबरमध्ये अकोला स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून चौथ्यांदा मात्र त्यांना भाजपकडून पराभव पत्करावा लागला. आज दोन्ही बाजोरियांसह पक्षातील एकूण 26 पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात हा प्रवेश सोहळा पार पडला आहे.
बाजोरिया यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगेच आपल्या गटाच्या अकोला संपर्कप्रमुखपदी नेमणुक केली आहे. बाजोरियांच्या रूपाने शिंदे गटानं एक महत्वाचा 'मोहरा' अकोल्यातून आपल्या गळाला लावला आहे. बाजोरियांना मानणारे आणखी काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांच्या अकोला दौऱ्यावेळी शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यासाठी लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अकोल्यात येणार आहेत. आता अकोला शिवसेनेत उद्धव ठाकरे समर्थक आमदार नितीन देशमुख आणि शिंदे समर्थक माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया गटांत राजकीय द्वंद्व रंगण्याची चिन्हं आहेत.
बाजोरिया पिता-पुत्रांनी घेतली होती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भेट
18 जुलैला बाजोरिया पिता-पुत्रांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भेट घेतली होती. मुख्यमंत्र्यांच्या भेटीदरम्यान गोपीकिशन बाजोरिया यांच्यासह पुत्र तथा शिवसेनेचे विधान परिषद आमदार विप्लव बाजोरीया, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख विठ्ठल सरफ, माजी नगरसेवक उपस्थित होते. या भेटीनंतरच अकोल्यातील शिवसेनेतील फुटीवर शिक्कामोर्तब झालं होतं. दरम्यान, येत्या महापालिका निवडणुकीत शिंदे गट आणि भाजपची युती करून निवडणूक लढवणार असल्याचे समजते आहे.
आज यांनी घेतला शिंदे गटात प्रवेश
आज दोन्ही बाजोरियांसह पक्षातील एकूण 26 पदाधिकार्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात हा प्रवेश सोहळा पार पडला आहे. प्रमुख प्रवेश घेणाऱ्यांमध्ये आमदार विप्लव बाजोरिया, माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया, युवासेना जिल्हाप्रमुख विठ्ठल सरप, युवासेना उपजिल्हाप्रमुख योगेश बुंदेले, शिवसेना उपशहरप्रमुख योगेश अग्रवाल, नगरसेवक शशी चोपडे, नगरसेवक अश्विन नवले, विकीसिंग बावरी आदी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
अकोला शिवसेनेत नितीन देशमुख-बाजोरिया गटाच्या वादाची किनार
शिवसेनेचे अकोल्याचे माजी जिल्हाप्रमुख श्रीरंग पिंजरकर यांनी अनेकदा विद्यमान शिवसेना जिल्हाप्रमुख तथा बाळापुर मतदारसंघाचे शिवसेना आमदार नितिन देशमुख यांच्यावर आरोप केले होते. अकोल्यात शिवसेना संपवण्यासाठी देशमुख हे भाजपला नेहमीचं मदत करतात, याबाबत अनेक तक्रारी पक्ष प्रमुखांकडे केल्या. मात्र त्यावर अद्याप तोडगा निघाला नसल्याचे त्यांनी म्हटलं होतं. अकोला शिवसेनेतील वादाला विधान परिषद निवडणुकीतील पक्षाच्या लाजिरवाण्या पराभवाची किनार आहे, आमदार नितीन देशमुखांच्या दगाफटक्यांनीच तीनदा आमदार राहिलेल्या गोपीकिशन बाजोरियांचा पराभव झाल्याचा बाजोरिया गटाचा आरोप होता.
आमदार देशमुख भाजपशी संधान साधत जिल्ह्यात शिवसेना पक्ष संपविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा बाजोरिया गटाचा आरोप होता. माजी सहसंपर्कप्रमुख श्रीरंग पिंजरकर यांनी थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना पत्र दिलं होतं. यात हे आरोप करण्यात आले होते. अन् या पत्रात थेट पक्षाचे आमदार आणि माजी जिल्हाप्रमुख नितीन देशमुखांवर गंभीर आरोप लावले होते. पत्रात पिंजरकरांनी आमदार देशमुखांवर खंडणीखोरीचे गंभीर आरोप लावले होते. मात्र, आमदार नितीन देशमुखांनी सहसंपर्कप्रमुखांचे आरोप फेटाळलून लावले होते.
अकोल्यातील शिवसेनेतील हे आरोप-प्रत्यारोप फार गंभीर होते. दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने अकोला जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर झाल्या. विशेष बाब म्हणजे थेट शिवसेना पक्षप्रमुखांना पत्र लिहून आमदार नितीन देशमुखांवर गंभीर आरोप करणारे श्रीरंग पिंजरकर यांना सहसंपर्क प्रमुख पदावरून हटवले होते. यामुळेच तेव्हापासून बाजोरिया गटांमध्ये पक्ष प्रमुख ठाकरेंवर नाराजी असल्याचे बोलले जाते.