Akola News Updates : अकोला-पूर्णा सुपरफास्ट पॅसेंजर रेल्वे (Akola Purna Passenger) आणि अकोल्याचे भाजपचे खासदाराचं (BJP MP Sanjay Dhotre) घर बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती मुंबईच्या पोलीस नियंत्रण कक्षाने (Mumbai Police) अकोला पोलिसांना (Akola Police) दिली. अकोला-पूर्णा सुपरफास्ट पॅसेंजरमध्ये बॉम्ब ठेवल्याचा फोन येताच अकोला पोलीस दलात खळबळ उडाली. रेल्वे पोलिसांसह अकोला पोलिसांनी काल मंगळवारी रात्री 10 वाजून 40 मिनिटांपर्यत संपूर्ण रेल्वेची तपासणी केली. यासोबतच रेल्वेतील प्रवाशांची तपासणी झाली. तर खासदार संजय धोत्रेंच्या रामनगर भागातील निवासस्थानी बंदोबस्त वाढविण्यात आला.
'बाँबच्या निनावी फोनने अकोल्यात खळबळ :
काल 26 जुलैला अकोला रेल्वे पोलिसांना अकोला-पूर्णा सुपरफास्ट पॅसेंजर (रेल्वे क्रमांक 17683) या रेल्वेत बॉम्ब ठेवल्याचा आणि अकोल्याचे भाजपचे खासदार यांचे निवासस्थान बॉम्ब उडवून देण्याची धमकीचा कॉल मुंबई पोलीसांच्या कंट्रोल रूमला आला. त्यानंतर अकोला पोलिसांचे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक, विशेष पथक, श्वान पथक, बॉम्ब पथक, जीआरपी, आरपीएफ पथकासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी अकोला रेल्वे स्थानकावर हजेरी लावली. अन् रेल्वे स्थानकावरून प्लॅटफॉर्म क्रमांक पाचवर उभी असलेली अकोला-पूर्णा सुपरफास्ट पॅसेंजरची तपासणी सुरु केली. या दरम्यान, रेल्वेच्या प्रवाशांची कसून चौकशीसह तपासणी झाली. या घटनेने काल अकोला पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली होती. काल मंगळवारी रात्री 10 वाजतापासून रेल्वेची तपासणी सुरु झाली अन् तब्बल अर्धा तास ही शोध मोहीम चालली. श्वान पथकाद्वारेही या तपासणीला सुरुवात झाली. बघता बघता सर्व रेल्वेच्या डब्यांची तपासणी झाली.
पोलिसांना नाही आढळले काहीच आक्षेपार्ह :
यादरम्यान रेल्वेमध्ये बसलेल्या प्रवाशांचे फोटो काढण्यात आले. झडतीदरम्यान डब्यांमध्ये कोणतीही संशयास्पद वस्तू, संशयास्पद व्यक्ती आढळून आली नाही. त्यानंतर रेल्वे आपल्या मार्गाने रवाना झाली. यादरम्यान धमकी देण्यात आलेला फोन फसवणूक करण्यासाठी आल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तरी अकोला जीआरपी पोलीस ठाण्याचे प्रमुख अर्चना गडवे आणि मुंबई पोलिसांद्वारे या बॉम्ब कॉलचा तपास सुरु आहे.
अकोला पोलिसांची झाली धावपळ :
दरम्यान, अकोल्याचे भाजपचे खासदार यांचं घरंही बॉम्बने उडवून देण्यात आल्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्या घराशेजारील परिसराची तपासणी झाली. रात्री त्यांच्या रामनगरस्थित निवासस्थानी पोलीस बंदोबस वाढवण्यात आला होता. तर रेल्वे पोलिसांनीही त्यांच्या निवासस्थानी भेटी दिल्या. आता अकोला-पूर्णा सुपरफास्ट पॅसेंजर रेल्वेमध्ये बॉम्ब अन् खासदारांचं घर उडून देण्यात येईल, या संदर्भात कुणी फोनवर माहीती दिली अन् फोन कुठून आला, याचा तपासही पोलीस करीत आहे. परंतु कालच्या या घटनेमुळे अकोला पोलिसांची प्रचंड धावपळ झाली.