Satyapal Maharaj Kirtan : सकाळीच सत्यपाल महाराजांचं वाहन जिंतूरवरून नागपूरकडे निघालं होतं. वाहनात बसलेल्या सत्यपाल महाराजांच्या चेहऱ्यावर कालच्या कीर्तनाला भरभरून मिळालेल्या प्रतिसाद अन प्रेमाचं समाधान होतं. 11 ऑक्टोबरच्या रात्री जिंतूर तालूक्यातल्या इटोली गावात त्यांचं कीर्तन झालं होतं. नेहमीसारखंच खचाखच भरलेल्या मैदानावर 'सत्यपाल'च्या सप्त खंजेऱ्यातून विचारांची तोफ धडाडली होती. दसऱ्यानंतर इटोली पंचक्रोशीती लोकांनी त्या दिवशी  'सत्यपाल'च्या विचारांचं सोनं खऱ्या अर्थानं लुटलं होतं. तेच कीर्तन आटोपून ते जिंतूरमार्गे नागपुरकडे आपल्या दुसऱ्या कीर्तनासाठी निघाले होते. त्यांचं दुसरं कीर्तन होतं नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालूक्यातल्या मोहगाव सावंगी येथे. गाडी नागपूरच्या दिशेने निघालेली होती. काहीशा थकव्यानं सकाळी बोलता-बोलता गाडीतच महाराजांचा डोळा लागला होता. तितक्यात महाराजांचा फोन खणखणला. फोनवरून बोलणाऱ्या समोरच्या व्यक्तीनं सांगितल, "महाराज!, आपले उकर्डाभाऊ गेलेत!"... फोनवरचे शब्द ऐकून महाराज अक्षरश: थिजून गेलेत, स्तब्ध झालेत. डोळे पाण्यानं डबडबून गेलेत. महाराजांनी अनावर झालेला हूंदका काहीसा आवरला. नागपूरकडे निघालेली गाडी महाराजांनी अकोल्याकडे वळवायला लावली. 


गाडी वेगाने परभणी, हिंगोली, वाशिममार्गे अकोल्याकडे निघाली. गाडीत बसलेले महाराज फक्त शरीरानंच गाडीत होते. त्यांचं मन होतं त्यांचा जीव की प्राण असलेला मोठा भाऊ उकर्डा अन त्याच्या आठवणींभोवती फिरत... अगदी लहानपणापासूनच्या हजारो आठवणींचा पटच झरझर त्यांच्या डोळ्यासमोरून सरकत होता. लहानपणीचा उकर्डा.. त्याचं रूसणं... त्याचं फुगून बसणं... घरची गरिबीची परिस्थिती... घराजवळचं चहाचं हॉटेल... देवळातलं भजन... सुशीला मायची आठवण..भाऊचं लग्नं... बापाची माया...डोक्यावर निंबाचे कट्टे नेणारा.. आयुष्यभर कष्ट उपसणारा आपला भाऊ... आपलेच जुने कपडे घालणारा.. कार्यक्रमात परिचय दिल्यावर उर भरुन आल्यामुळे डोळ्यात आंनदाश्रू आलेला उकर्डा... अख्खा सत्तर वर्षाचा सगळा इतिहासच अगदी काही क्षणांत सत्यपाल महाराजांच्या डोळ्यांसमोरून सरकला होता. प्रत्येक आठवणीनं महाराजांच्या डोळ्यांतील अश्रू थांबता थांबत नव्हते. या आठवणींचा पट डोळ्यांसमोरून जात असतांनाच अकोला आलं. अन महाराजांची गाडी थेट 'दादा'चं पार्थिव ठेवलेल्या रूग्णालयात पोहोचली. अन सत्यपाल महाराजांच्या भावनांचा बांध फुटला. आपल्या सप्त खंजेऱ्यांतून समाजाला 'लढा'यचं बळ देणारे सत्यपाल महाराज भावाच्या आठवणींनी 'रडत' होते. कारण, याच उकर्डानं त्यांना लहानपणी अंगा-खांद्यावर खेळवलं होतं. घरच्या गरिब परिस्थितीमूळे स्वत: शिक्षण न घेता सत्यपालच्या शिक्षणासाठी काबाड-कष्ट झेलले होते. त्याच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून गावात चहा-भज्याचं हॉटेल टाकलं होतं. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी आपल्या सत्यपालला अगदी लेकरासारखं जीवापाड जपलं होतं. 


...अन सत्यपाल महाराजांनी अंत्यसंस्कार बाजूला ठेवत कीर्तनाला जाण्याचा निर्णय :


सत्यपाल महाराजांचे मोठे भाऊ गेल्या एका महिन्यापासून अकोल्याच्या एका खाजगी दवाखान्यात भरती होते. डॉक्टरांसह सर्वांनीच गेल्या महिनाभरापासून त्यांना वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केलेत. परंतू, काल सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. भाऊ गेल्याचा निरोप मिळाल्यावर महाराज आज परभणी वरून अकोला दवाखान्यात अंतिम दर्शनासाठी गेले.भावाच्या पार्थिवाजवळ दोन मिनिटं ते स्तब्ध उभे राहिलेत. एरव्ही आपल्या सत्यपालला पाहिल्यावर त्याला कडकडून मिठी मारणारा भाऊ पहिल्यांदाच शांत पडलेला होता. त्याच्या  पार्थिवाचं दर्शन घेण्याच्या 'त्या' दोन मिनिटात हजारो आठवणी जाग्या झाल्यात. महाराजांनी आसू डोळ्यातच गिळलेत. 


गेल्या पाच-सात वर्षांत सत्यपाल महाराजांनी अनेक कौटूंबिक आघात सोसलेत. आधी पत्नी गेली... नंतर आई गेली... वडील गेले... अलिकडेच बहीण गेली... त्यामुळे त्यांची आसवं आता अक्षरश: आटली आहेत. महाराज उपस्थितांना एवढंच म्हणाले, "आता पुढचं तुम्ही आटपून घ्या. आम्ही चाललो कीर्तनाले". कारण, याच भावानं आणि घरातील लोकांनी घरापेक्षा समाज मोठा असल्याचं त्याचं व्रत अधिक कसोशीनं जपलं होतं. त्यांनी भावाला अखेरचा नमस्कार केला. अन काळजावर दगड ठेवून ते अकोल्यातील दवाखान्याच्या बाहेर पडले. अन त्यांची गाडी कीर्तनासाठी नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालूक्यातल्या मोहगाव सावंगीकडे निघाली. कारण तेथील आयोजकांनी या कार्यक्रमाची मोठी तयारी केली होती. या कीर्तनाला दहा पंधरा हजार लोक त्यांची वाट पहात होते. भावाच्या अंत्यसंस्कारापेक्षा त्यांना नागपूरचा जनसागर खुणावत होता. कारण सत्यपाल महाराजांचे आदर्श आहेत तुकडोजी महाराज, गाडगे महाराज. गाडगेबाबांच्या आयुष्यात आलेला एक प्रसंग आज सत्यपाल महाराजांच्या आयुष्यातही आला होता. एका कीर्तनाच्यावेळी गाडगेबाबांच्या मुलाच्या मृत्यूची माहिती त्यांना कळली. मात्र, त्यांनी मुलाचा मृत्यूचं दु:ख बाजूला ठेवत कीर्तनाला सुरूवात केली. त्यांनी कीर्तनाची सुरूवातच "असे मेले कोट्यान कोटी, काय रडू एकासाठी", असं म्हणत समाजप्रबोधनाचा जागर केला होता.


...अन कीर्तन केलं दिवंगत भावाला समर्पित :


12 ऑक्टोबर 2020... रात्री सातच्या सुमारासची वेळ... नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालूक्यातलं मोहगाव सावंगीतील कीर्तनाचा मंडप नागरिकांच्या गर्दीनं अगदी फूलून गेलेला. अन भाऊ गेल्याचं दु:ख बाजूला सारत महाराजांच्या सप्तखंजेऱ्यांतून विचारांचा रतीब सुरू झाला. महाराजांच्या कीर्तनानं लोकं अगदी भारावून गेलीत, मोहरून गेलीत. नेहमीसारखंच महाराजांनी आजच्या कीर्तनाचं मैदानही जिंकलं होतं. कीर्तन झाल्यावर त्यांनी व्यासपीठावरूनच बसल्या जागी भावाचं स्मरण केलं, त्याला नमस्कार केला. 


आईच्या निधनावेळीही घालून दिला होता 'कृतीशील आदर्श' :


   21 फेब्रूवारी 2020 ला रात्री वर्धा जिल्ह्यातील तरोडा गावातील कीर्तन सुरू असतांना सत्यपाल महाराजांची आई सुशिला गेल्याचा निरोप त्यांना मिळाला होता. त्यांच्या आयुष्याला वळण आणि संस्काराची सावली देणारा 'आई' नावाचा वटवृक्ष उन्मळून पडला होता. एकीकडे कीर्तनासाठी जमलेली अफाट गर्दी आणि दुसरीकडे आई गेल्याचं आभाळभर दु:ख. अनेकांनी महाराजांना कीर्तनाचा कार्यक्रम रद्द करण्याचा सल्ला दिला. ही सत्यपाल महाराजांची कसोटी पाहणारा क्षण होता. महाराजांसोबतचे सर्वच नि:शब्द होते. त्या ठिकाणी स्मशान शांतता पसरली होती. मात्र, त्याचक्षणी सत्यपाल महाराजांनी स्वत:ला सावरलं. "मी कीर्तन रद्द करणार नाही. मी कीर्तन करूनच अकोटला जाणार. आईला कीर्तनातूनच श्रद्धांजली देणार. आईनंच मला समाजसेवेचे संस्कार आणि वारसा दिला". सत्यपाल महाराजांच्या या वैचारिक निग्रहाचं उपस्थितांना मोठं नवल वाटलं अन अभिमानही वाटला. सत्यपाल महाराजांनी कीर्तन पुर्ण केलं. अन देहदानासाठी अकोल्याच्या वैद्यकीय महाविद्यालयातच आईच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं. 


आदर्शवाद' सांगणं अतिशय सोप्प अन सरळ.... मात्र, तो स्वतः जगणं, पाळणं अन त्याची अंमलबजावणी करणं तेवढंच कठीण... म्हणूनच विचारांची दिशा स्पष्ट अन प्रांजळ असणार्‍या सत्यपाल महााजांचं वेगळेपण म्हणूनच कृतिशील आदर्शवादाची शिकवण देणार ठरलंय. महाराजांचा हा कृतिशील आदर्शवाद हा एका चांगल्या विचारांची नांदी ठरणारं आहे.


महाराज!, अलिकडचा काळ समाजासाठीचा 'संक्रमन काळ'. अलिकडच्या काळातील काही घटनांनी समाजमन पार ढवळून गेलेलं. अशा परिस्थितीमूळं सारं आकाशच अंधारून गेलं असं वातावरण आहे. मात्र, तूमच्यासारखे या अंधाऱ्या वाटेवर प्रकाश पेरणारे काही दुवे समाजात आहेत. त्यामूळेच आजही समाजात सकारात्मक विचार, चांगुलपणा टिकून आहे. विचारांचा वारसा जपणारे सत्यपाल महाराज हे नाव अलिकडच्या काळातील गल्लाभरू महाराजांच्या गर्दीत आजही तेजानं अन अभिमानानं आपलं स्वत्व टिकवून आहेत. महाराज!, तुमच्या संघर्ष, विचार आणि संस्कारांना शतश: नमन!. अन तूमच्या कृतिशील आदर्शवादासही मानाचा मुजरा अन सलाम...