Akola Shiv Sena Politics : अकोल्यात (Akola) शिवसेनेचे (Shiv Sena) जिल्हाप्रमुख विठ्ठल सरप (Vitthal Sarap) यांच्यावर काल (1 मार्च) रात्री हल्ल्याचा प्रयत्न झाला. हल्लेखोरांनी त्यांच्या घरी तोडफोड देखील केली. रात्री 11 वाजता हा प्रकार घडला. हा प्रकार पक्षाचे माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया (Gopikishan Bajoria) यांच्या इशाऱ्यावरुनच झाल्याचा गंभीर आरोप विठ्ठल सरप यांनी केला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून अकोल्यात शिंदे गटात पक्षांतर्गत गंभीर वाद सुरु आहेत. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी विठ्ठल सरप यांचा जवाब नोंदवला आहे.
अकोल्यात बाजोरिया गट विरुद्ध इतर वाद
अकोल्यात शिवसेनेतील वाद विकोपाला गेला आहे. अकोल्यात बाजोरिया गट विरुद्ध इतर हा शिवसेनेतील वाद आता तोडफोड आणि मारहाणीवर गेला आहे. जिल्हा संपर्कप्रमुख पदावरुन काल गोपीकिशन बाजोरिया यांना हटवल्यानंतर बाजोरिया समर्थकांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विठ्ठल सरप यांच्या घरी हैदोस घातला. विठ्ठल सरप यांचं गोरक्षण मार्गावरील सहकारनगर भागात घर आहे. त्यांनी घरी घुसून तोडफोड केली. बाजोरिया गटाविरुद्ध पोलीस तक्रार करण्यासाठी जिल्हाप्रमुख विठ्ठल सरप हे रात्री खदान पोलीस ठाण्यात दाखल झाले होते.
सरप कुटुंबियांचा जबाब नोंदवला, अद्याप गुन्हे दाखल नाहीत
जिल्हाप्रमुख सरप यांच्या निवासस्थानी बाजोरिया समर्थक उपजिल्हाप्रमुख योगेश बुंदेले, प्रकाश पाटील यांच्यासह पाच जणांकडून तोडफोड करण्यात आल्याचा आरोप होत आहे. यावेळी सरप यांनाही धक्काबुक्की झाल्याचा आरोप होत आहे. विठ्ठल सरप यांच्या दिवाणखान्यात बाजोरिया समर्थकांनी तोडफोड केल्याचा आरोप सरप कुटुंबियांनी केला आहे. दरम्यान, या प्रकरणी खदान पोलिसांनी सरप कुटुंबियांचा जबाब नोंदवला आहे. मात्र, यात अद्यापही गुन्हे दाखल झाले नाहीत.
सरप आणि बाजोरिया यांच्यातील वाद
बाळापूर मतदारसंघातील 'शिवसंग्राम'चे नेते संदीप पाटील यांच्या शिंदे गटातील प्रवेशामुळे वाद सुरु झाला. जिल्हाप्रमुख विठ्ठल सरप हे बाळापूर मतदारसंघातील आहेत. त्यांना शह देण्यासाठीच बाजोरियांनी याच मतदारसंघातील संदीप पाटील यांना पक्षात आणल्याचं शल्य विठ्ठल सरप आणि समर्थकांना होतं. त्यातच ठाकरे गटातील जिल्ह्यातील एक बडा नेता सरप गटाच्या पुढाकारातून शिंदे गटात येणार होता. मात्र, तो नेता बाजोरियांचा कट्टर विरोधक असल्याने बाजोरियांनी तो प्रवेश दिला नसल्याचा विरोधी गटाचा आरोप आहे. यातच दोन्ही जिल्हाप्रमुख विठ्ठल सरप आणि अश्विन नवलेंची जिल्हा नियोजन मंडळावरील पालकमंत्र्यांकडून झालेली निवड बाजोरियांनीच रोखून धरल्याचा आरोप बाजोरियाविरोधी गटाने केला होता.
पक्षातील पदाधिकाऱ्यांचे गोपीकिशन बाजोरिया यांच्यावर गंभीर आरोप
दरम्यान, याआधी पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी गोपीकिशन बाजोरिया यांच्यावर गंभीर आरोप केले होते. यासंदर्भात अकोल्यातील बाजोरियांवर नाराज पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचे (शिंदे गट) नेते खासदार प्रतापराव जाधव यांच्याकडे बुलडाणा इथे भेट घेऊन बाजोरियांची लेखी तक्रार केली होती. तक्रारीत बाजोरिया यांचा 'कमिशन एजंट' असा उल्लेख करण्यात आला होता. बाजोरिया यांनी मुख्यमंत्र्यांनी दिलेला 15 कोटी आणि 20 कोटींचा विकासनिधी ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला विकल्याचा गंभीर आरोप या लेखी तक्रारीत करण्यात आला होता.
संबंधित बातमी