अकोला: अकोला जिल्ह्यात बाळासाहेबांच्या शिवसेनेतील म्हणजेच  शिंदे गटातील पक्षांतर्गत वाद आता विकोपाला गेला आहे. पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पक्षाचे संपर्कप्रमुख आणि माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया (Gopikishan Bajoria) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यासंदर्भात अकोल्यातील बाजोरियांवर नाराज पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटाचे नेते खासदार प्रतापराव जाधव यांच्याकडे बुलडाणा येथे भेट घेतली. यावेळी या पदाधिकाऱ्यांनी बाजोरियांची लेखी तक्रार जाधव यांच्याकडे केली आहे. बाजोरियांच्या तक्रारीत 'कमिशन एजंट' असा गंभीर उल्लेख करण्यात आला. बाजोरिया यांनी मुख्यमंत्र्यांनी दिलेला 15 कोटी आणि 20 कोटींचा विकासनिधी ठाकरे गट आणि राष्ट्रवादीला विकल्याचा गंभीर आरोप या पत्रात करण्यात आला आहे. 


पत्रात संपर्कप्रमुख आणि माजी आमदार गोपीकिशन बाजोरियांवर 'कमीशनखोरी'चा गंभीर आरोप 


शिंदे गटाचे अकोला जिल्हा संपर्क प्रमुख आणि माजी आमदार गोपीकिशन बाजोरीया यांच्यावर विकास निधीचा गैरवापर करण्यात येत असल्याचा आरोप नाराज पदाधिकाऱ्यांनी पत्रात केला आहे. विरोधी गटातील ठाकरे गट, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या लोकांकडून कमिशन घेऊन त्यांच्या कामांना निधी दिल्याचा नाराज गटाचा आरोप आहे. पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता त्यांची कामे रद्द करण्यात आली. त्यांची पडीक मालमत्ता लोकांनी विकत घ्यावी यासाठी विकासनिधी वापरल्याचा आरोप पत्रात केला आहे. बाजोरियांच्या प्रकल्पांमध्ये नाल्यांची कामे टाकण्यात आली. याची भनकही पदाधिकाऱ्यांना लागू दिली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. हे सर्व प्रकार बाजोरीया यांच्यामार्फत सुरू असून ते स्वार्थासाठी कोणत्या थराला गेले आहेत, हे लक्षात येते असंही तक्रारीत म्हटलं आहे. विकास निधीची मलाई खाण्यातच बाजोरिया गुंग असल्याचा गंभीर आरोप पत्रात करण्यात आला आहे.




निधीच्या 'खिरापती'वरून शिंदे गटात 'कुरापती'  


 राज्यात जून 2022 मध्ये उद्धव ठाकरेंचं सरकार उलथवत शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आलं. नवीन सत्ता स्थापन झाल्यानंतर शिंदे गटातकडून अकोला जिल्ह्यात राजकीय पेरणी झाली होती. शिवसेनेच्या 26 पेक्षा जास्त आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी माजी आमदार गोपीकिशन बाजोरियांच्या नेतृत्वात शिंदे गटात प्रवेश केला होता. आगामी महापालिका, नगर पालिका निवडणुका लक्षात घेऊन पदाधिकारी निधी खेचून आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र आता निधीवरूनच शिंदे गटात वाद सुरू झाला आहे. आधी मिळालेले 15 कोटी आणि त्यानंतर मिळालेले 20 कोटी याच्या वाटपावरून बाजोरिया आणि नाराज गटात भांडणं सुरू झालीत. आता याच 35 कोटींवरून अकोल्यात शिंदे गट फुटीच्या उंबरठ्यावर उभा आहे. 


बाजोरियांवर गंभीर आरोप करणाऱ्या पत्रावर 'या' पदाधिकाऱ्यांच्या सह्या 


मुख्यमंत्री आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेचे मुख्यनेते एकनाथ शिंदे यांना 11  फेब्रुवारी रोजी हे पत्र पाठविण्यात आले. यासंदर्भात अकोल्यातील बाजोरियांवर नाराज पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटाचे नेते खासदार प्रतापराव जाधव यांच्याकडे बुलडाणा येथे भेट घेत हे पत्र सोपविले आहे. या पत्रावर बाळासाहेबांच्या शिवसेनेचे अकोला जिल्हाप्रमुख अश्विन नवले, महानगराध्यक्ष योगेश अग्रवाल, युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष निखिल ठाकूर, नितीन मानकर, अकोला पश्चिम शहरप्रमुख मुरलीधर सटाले, उपजिल्हाप्रमुख शशिकांत चोपडे, ललित वानखडे, वैद्यकीय आघाडी प्रमुख गजू मोर, बार्शीटाकळी तालूकाप्रमुख उमेश कोकाटे आणि अकोट तालूकाप्रमुख प्रकाश पाटील अशा 13 पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरी असलेले पत्र पाठविण्यात आले आहे. त्यामुळे हा वाद वेळीच मिटवण्याचे आव्हान नेत्यांपुढे उभे ठाकले आहे. 


या 'दोन' घटनांपासून सुरू झाला शिंदे गटात वाद


शिंदे गटातील वाद या निधीच्या 'खिरापती'मुळे विकोपाला गेलेत. मात्र, त्याआधी याची सुरूवात झाली ती बाळापूर मतदारसंघातील 'शिवसंग्राम'चे नेते संदीप पाटील यांच्या शिंदे गटातील प्रवेशामुळे. पक्षाच्या दोन जिल्हाप्रमुखांपैकी विठ्ठल सरप हे बाळापूर मतदारसंघातील आहेत. त्यांना शह देण्यासाठीच बाजोरियांनी याच मतदारसंघातील संदीप पाटलांना पक्षात आणलं गेल्याचं शल्य जिल्हाप्रमुख विठ्ठल सरप आणि समर्थकांना होतं. त्यातच ठाकरे गटातील जिल्ह्यातील एक बडा नेता सरप गटाच्या पुढाकारातून शिंदे गटात येणार होता. मात्र, तो नेता बाजोरियांचा कट्टर विरोधक असल्याने बाजोरियांनी तो प्रवेश दिला नसल्याचा विरोधी गटाचा आरोप आहे. यातच दोन्ही जिल्हाप्रमुख विठ्ठल सरप आणि अश्विन नवलेंची जिल्हा नियोजन मंडळावरील पालकमंत्र्यांकडून झालेली निवड बाजोरियांनीच रोखून धरल्याचा बाजोरिया विरोधी गटाचा आरोप आहे. याच वादाला निधीची फोडणी बसल्यानं पक्ष आता फुटीच्या उंबरठ्यावर आहे. 




आरोप सिद्ध झाले तर राजकारणातून 'संन्यास' घेऊ : गोपीकिशन बाजोरिया


माझ्यावर लागलेल हे आरोप राजकीय द्वेषातून झाले आहेत. काही नवीन चेहऱ्यांना पक्षात आणल्यामुळे या पदाधिकाऱ्यांना ते रूचलं नाही. त्यातूनच हे सर्व तथ्यहीन आरोप आपल्यावर लावण्यात आले आहेत. त्यात काहीही तथ्य नाही. यातील एकही आरोप सिद्ध झाल्यास राजकारणातून संन्यास घेऊ, असं या आरोपांवर स्पष्टीकरण देतांना गोपीकिशन बाजोरिया म्हणालेत.