Akola Calf Naming Ceremony : प्राणीमात्रांवर प्रेम करणं म्हणजे पुण्याचं काम म्हटलं जात, त्यात आपल्या लाडक्या जनावरांवरील प्रेमापोटी लोक काय करतील आणि काय नाय? याचाही नेम नाही. अकोल्यातील (Akola News) एका डॉक्टराने तर चक्क गायीच्या वासराचं बारसं घातलं आहे. घरी नुकत्याच जन्मलेल्या गायीच्या वासराचा नामकरण सोहळा पार पडला. या नामकरण सोहळ्याची पंचक्रोशीत चर्चा आहे.


अकोल्यातील रघुवीर नगरातील डॉ. गजानन टिकार यांच्या घरी गायीच्या नामकरणाचा सोहळा नुकताच पार पाडला. या सोहळ्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. बारशासाठी निमंत्रण पत्रिका.. रंगीबेरंगी फुग्यांनी सजलेला मंडप...सोबतच पाहुण्यांसाठी बटाटेवडे अन् जिलेबीचा फक्कड बेत केला होता. डॉ. टिकार यांच्या घरच्या लाडक्या गायीने म्हणजे 'नंदिनी'ने 5 मार्च रोजी वासराला जन्म दिला. आनंद  झालेल्या टिकार कुटुंबाने वासराचे बारसे घालत गाव जेवण देखील दिले. टिकार कुटुंबाने वासराचे नाव 'शंभू' ठेवले. 


टिकार कुटुंबियांच्या घरात 'शंभू'च्या रुपाने आनंद


मागच्या वर्षी ऑक्टोबर-डिसेंबर या दीड महिन्यातच डॉ. टिकारांच्या आई-वडिलांचा मृत्यू झाला. या दु:खानंतर पहिल्यांदाच टिकार कुटुंबियांच्या घरात 'शंभू'च्या रुपाने आनंद आला. टिकार यांच्या आई शोभा यांचं 27 ऑक्टोबर 2022 रोजी निधन झालं. तर त्यानंतर दीड महिन्यातच 6 डिसेंबर 2022 रोजी वडील साहेबरावही देवाघरी गेले. डॉ. टिकार हे व्यवसायाने आयुर्वेद तज्ञ आहेत. 'नंदिनी' ही त्यांच्या घरातील सर्वांची लाडकी गाय आहे. 'नंदिनी' ही कर्नाटकात आढळणाऱ्या 'कोंगनुरु' जातीची गाय. याच नंदिनीने नुकत्याच जन्म दिलेल्या वासराने टिकार कुटुंबीयांचं अख्ख भावविश्वच व्यापलं आहे.


नामकरणासाठी थेट माहूरच्या दत्त शिखराचे मुख्य पुजारी हजर


एरवी आपण नवजात बाळाचे नामकरण किंवा बारसं साजरा करत असतो; पण कुणी प्राण्यांच्या पिलांचा नामकरण सोहळा केल्याची घटना अपवादच. 'शंभू'च्या नामकरण सोहळ्याला थेट माहूरच्या दत्त शिखराचे मुख्य पुजारी आले होते. मंत्रोच्चार आणि पाळणागीतं म्हणत बारसंही झालं आहे. बाळाच्या काळात 'कुर्रर्र' म्हणत 'शंभू' नावही ठेवलं गेलं. एवढंच नाही तर लहानग्यांनी 'शंभू'च्या पाळण्याखालच्या घुगऱ्याही खाल्ल्या. या कार्यक्रमाला आलेल्यांनीही या अनोख्या बारशाचं कौतुक केले आहे.


'भूतदया' हा भारतीय संस्कृती आणि परंपरेचा मुलभूत पाया आहे. सध्याच्या परिस्थीतीत टिकार कुटुंबीयांनी 'शंभू'च्या बारशातून आपल्या याच परंपरेची उजळणी समाजाला करुन दिली आहे. गायीवरील प्रेमापोटी असा आगळा-वेगळा सोहळा ठेवण्यात आला होता. 


इतर महत्त्वाच्या बातम्या :