Maharashtra Akola Accident News: अकोला जिल्ह्यातील (Akola News) पारस गावात मंदिरावर लिबाचं झाड कोसळून 7 जणांचा मृत्यू झाला, तर 20 ते 25 जण जखमी झाले आहेत. बाबूजी महाराज मंदिरात ही दुर्घटना घडली. रविवारी रात्री 9च्या सुमाराला मंदिरात 50 ते 60 भाविक होते. वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू होते. बहुधा या वाऱ्यामुळेच लिंबाचं मोठं झाड शेडवर कोसळलं. पाऊस रात्रभर सुरू असल्यानं मदतकार्यात प्रचंड अडथळे येत होते. तरीही प्रशासन आणि ग्रामस्थांकडून शक्य तितक्या वेगानं मदतकार्य सुरू होतं.
अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालूक्यातलं पारस काल (रविवारी) संध्याकाळी चांगलंच हादरलं. गावातील बाबूजी महाराज मंदिरात रविवारी लगतच्या जिल्ह्यांसह राज्यातून भाविकांची मोठी गर्दी असते. रविवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास मंदिरात आरती झाली. आरतीनंतर सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. यामुळे बाहेर असलेल्या भाविकांनी मंदिरात असलेल्या टिनाच्या शेडवर सहारा घेतला. अन् नेमकं याचवेळी वाऱ्यामुळे मंदिरासमोर असलेलं लिंबाचं झाड शेडवर कोसळलं.
दुर्घटनेबाबत माहिती मिळताच प्रशासनाचं पथक बचावकार्यासाठी घटनास्थळी पोहोचलं. यासोबतच ढिगारा हटवण्यासाठी जेसीबी आणि जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिकाही घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र, जोरदार वारा आणि पाऊस बचाव कार्यात अडथळा ठरत आहे. घटनास्थळी नागरिकांचीही मोठी गर्दी झाली आहे.
पाहा व्हिडीओ : Akola Paras Village : अवकाळीमुळे मंदिरावर झाड कोसळलं, शेडखाली दबून 4 जण दगावले, बचावकार्य सुरू
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 50 ते 60 जण मंदिराच्या शेडखाली होते. ज्यावेळी सोसाट्याचा वारा सुटला, त्यावेळी काही लोकं मंदिराच्या आतमध्ये गेले, तर 15 ते 20 जण मंदिराच्या शेडमध्ये होते. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे लिंबाचं झाडं शेडवर कोसळलं आणि शेड कोसळलं. शेडखाली उभी असलेली लोक शेडखाली अडकले. आतापर्यंत 7 जणांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. अद्याप बचाव कार्य सुरूच आहे. सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
आमदार अमोल मिटकरी यांनी ट्वीट करत दुर्घटनेतील मृतकांच्या नातेवाईकांना मदत जाहीर करण्याची मागणी केली आहे. ट्वीटमध्ये त्यांनी म्हटलंय की, "पारस जि. अकोला येथे बाबूजी महाराज मंदिरात आरती चालू असताना टिन शेड वर झाड कोसळून अनेक भाविक जखमी तसेच चार भाविक मृत्यु मुखी पडल्याची मिळाल्याची, दुःखद बातमी समजली, सरकारने याची गांभीर्याने दखल घेऊन मृतकांच्या नातेवाईकांना तात्काळ भरघोस मदत जाहीर करावी."
अनेक राज्यांमध्ये तापमान 38 ते 40 अंशांवर
देशातील हवामानाबाबत बोलायचं झालं तर, उत्तर भारतातील राज्यांमध्ये तापमानात वाढ झाल्यानं उष्माही वाढला आहे. दक्षिणेकडील अनेक राज्यांमध्ये कमाल तापमान 38 ते 40 अंशांच्या आसपास नोंदवलं जात आहे. उत्तर भारतात कमाल तापमान 36 अंश सेल्सिअसवर पोहोचलं आहे. हवामान खात्यानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत विदर्भ मराठवाडा आणि छत्तीसगड, मध्य प्रदेश, मध्य महाराष्ट्र, तेलंगणा आणि केरळ या राज्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची नोंद झाली आहे.