Akola News: 'त्या' दिवशी अकोल्यातील प्रमिलाताई ओक हॉल सभागृह अगदी खचाखच भरलं होतं...सभागृहातील 'ऑर्केस्ट्रा'च्या कार्यक्रमाची तिकीटं आधीच संपलेली होती. मात्र, तिकीटांचा हा 'ऑर्केस्ट्रा' हा कोणताच व्यावसायिक नव्हता...तर, तो 'ऑर्केस्ट्रा' होता पुर्णपणे कौटुंबिक असा. यात आलेले सर्व प्रेक्षक हे अगदी जीवाभावाचे होते, रक्ताच्या नात्यांपलिकडच्या संवेदनेचे होते. हे नातं होतं 'मोलोडीज ऑफ अकोला' या शब्दांभोवती फिरणारे. या तीन शब्दांनी या परिवारातील प्रत्येकाची एकमेकांसोबत नात्यांची घट्ट अशी 'वीण' बांधली होती. 


कार्यक्रमाचं दीपप्रज्वलन झालं... प्रास्ताविक झालं...मात्र, हे सारं अनौपचरिक  होतं. इतर कार्यक्रमांसारखी कोणतंच वरवरचं औपचारिकपण यात नव्हतं. तर यात होता 'या हृदयाला त्या हृदयाशी' जोडणारी निरपेक्ष भावना... तितक्यात सभागृहातील लाईट्सची व्यवस्था बदलली अन साऊंड सिस्टीमही अगदी सज्ज झाली... तितक्यात 'ऑर्केस्ट्रा'तले पहिले गायक विक्रम गोलेच्छा 'स्टेज'वर आलेत. त्यांचं गाणं होतं 'चला जाता हूँ, किसी की धून में'.... या पहिल्याच गाण्यानं सभागृहाची पकड घेतली... अन अख्खं सभागृह एका वेगळ्याच 'धुन'मध्ये हरवून गेलं. कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला. टाळ्या, शिट्ट्या आणि 'वन्स मोअर'च्या फर्माईशीनं अख्खा ओक हॉल दुमदुमून गेला. पुढे मनोज चांडक यांचं 'मेरा जीवन कुछ काम न आया' या गाण्यानं सभागृहाला चांगलंच अंतर्मुख केलं. सध्याच्या वातावरणात प्रत्येकाच्या मनातील खंत अन सल मनोज यांच्या सुरांतून व्यक्त झाली. पुढे वागण्या-बोलण्यातला भारदस्तपणा आवाजातून उमटला तो गजानन शेळके यांच्या 'दिलबर मेरे कबतक मुझे ऐसे तूम तडपाओगे' या गाण्यातून. पुढे एखादा संवेदनशील माणूस रोमँटीक गाणं कसा सुंदर म्हणू शकतो हे दाखवलं प्रा. संजय खडसे यांनी... पुढे अजय सेंगर यांच्या 'पुकारता चला हूँ मैं' या गाण्यानं सभागृहाला साठ-सत्तरच्या दशकात नेलं... या कार्यक्रमात सादर झालेल्या प्रत्येक गाण्यानं कार्यक्रमाची रंगत वाढविली. अगदी रंगलेल्या पानासारखी अन मुरलेल्या लोणच्यासारखी... 


कार्यक्रमाच्या शेवटी सर्व 'मोलोडीज'नी मिळून गायलेल्या 'जिंदगी के सफर मे गुजर जाते है जो मकाम, वो फिर नही आते' या गाण्यानं अगदी भावूक करून टाकलं. कार्यक्रमाच्या शेवटी प्रत्येकानं आनंदानं एकमेकांचा आनंदानं निरोप घेतला. हा कार्यक्रम संपूच नये असं वाटत असतांना परत लवकरच पुढच्या कार्यक्रमाला भेटण्याचं अभिवचन घेत आलेला प्रत्येक जण भविष्यातील सुरांची 'आस' घेऊन घराकडे निघाला. ही जादू होती 'मेलोडीज ऑफ अकोला' या नावानं तयार झालेल्या एका सुरांत बांधल्या गेलेल्या नात्यांपलिकडच्या परिवाराची. आता या 'ऑर्केस्ट्रॉ'तला कुणीच व्यावसायिक गायक नाही. तर यात जुळलेला कुणी आहेय उच्चपदस्थ सरकारी अधिकारी, उपजिल्हाधिकारी, पोलीस उपाधिक्षक, चार्टड अकाऊंटंट, बिल्डर, व्यावसायिक, आर्किटेक्ट, शेतकरी अन गृहीणीही. 


'मेलोडीज ऑफ अकोला'ची जन्मकथा 


मेलोडीज ऑफ अकोला' या गृपमधील सर्वचजण एकमेकांच्या ओळखीचे किंवा मित्रही. शहरातील अनेक कार्यक्रम अन समारंभात ते एकत्र यायचे. मात्र, हे भेटणं अगदी सहज अन न ठरवलेलं. भेटल्यानंतर ही प्रत्येक क्षेत्रात मोठी असलेली माणसं आपल्या व्यवसायातील ताण-तणावाचे अनुभव एकमेकांना सांगायची. त्यात ते स्वत:साठी वेळ काढत नसल्याचे किंवा वेळ मिळत नसल्याचे सामायिक कारण होते. हिच गोष्ट लक्षात घेत अकोल्यातील ख्यातनाम व्यावसायिक आणि 'चार्टड अकाऊंटंट' मनोज चांडक यांच्या मनात एक भन्नाट संकल्पना आली. या सर्व लोकांना महिन्यातून एकदा तरी कोणत्याही कारणाशिवाय एकत्र आणायचं. मस्त गप्पा करायच्या, गाणे म्हणायचे अन जगण्याचा आनंद लुटायचा. अशा चार-पाच भेटी झाल्यात. या सर्व भेटीत या सर्वांना एका 'सुरा'त बांधलं ते संगीत अन गाण्यानं. अगदी लाजणारे अनेकजण आता बिनधास्त गायला लागलेत. अन यातूनच जन्म झाला तो 'मेलोडीज ऑफ अकोला' या सुरांच्या एका नव्या परिवाराचा. तो दिवस होता 26 जानेवारी 2020 चा.. येथून सुरू झालेला हा प्रवास आता चांगलाच 'सुरेल' बनला आहे. अन तो तब्बल 35 एकाहून एक सरस गायक असलेल्या कलाकारांच्या 'ऑर्केस्ट्रा' पर्यंत आला आहे. 


'कोरोना'ही थांबवू शकला नाही 'मेलोडीज'चे सुर 


'मेलोडीज ऑफ अकोला'ची स्थापना 26 जानेवारी 2020 ला झाली. अन स्थापनेनंतरच एक मोठं संकट 'मेलोडीज' परिवारासमोर उभं राहिलं. हे संकट होतं कोरोनाचं. मार्च 2020 मध्ये अकोल्यात लॉकडाऊन लागलं अन सर्वांच्या फिरणे अन गाठीभेटीवर बंधनं आलीत. हा सुरू झालेला प्रवास लगेच संपतो की काय?, अशी परिस्थिती निर्माण झाली. मात्र, यावर उपाय सापडला तो 'ऑनलाईन' भेटींचा अन गाण्याच्या मैफलीचा...संपुर्ण कोरोना काळात आठवड्यातून एकदा 'मेलोडीज' परिवाराचं 'ऑनलाईन' मैफिल रंगवायला लागली. कोरोनाचं दु:ख सुरांच्या आनंदात पार कुठल्या कुठे पळून गेलं. याच माध्यमातून एकमेकांना मदतही या परिवारातील लोक करू लागलेत. कोरोना काळात मानसं दुर गेली असली तरी सुरांनी या नव्या परिवाराला संगीताच्या एका घट्ट बंधारा बांधलं. 


'मेलोडीज'नं जपला सामाजिक वसा 


हा परिवार पुढे फक्त गाण्यांपुरता अन 'गेट टुगेदर'पुरताच मर्यादीत राहिला नाही. तर 'मेलोडीज'नं संवेदनेशी नात सांगत अनेक सामाजिक उपक्रमातून आपली सामाजिक बांधिलकी पार पाडली. कोरोना काळात "मेलोडीज'नं 500 गरिबांना अन्नाचे पॅकेट्स वाटलेत. थंडीच्या काळात अकोल्यात फुटपाथवर झोपणाऱ्या गरिबांना स्वेटर, ब्लँकेट वाटलेत. यासोबतच निसर्ग संवर्धनाचा संदेश देत वृक्षारोपणाचे कार्यक्रम घेतलेत. यासोबतच अनेकदा कोणताही गवगवा न करता अनेक सामाजिक उपक्रम हा परिवार सातत्याने राबवत असतो. 


सुरांनी बांधलीत रक्तापलिकडची नाती 


'मेलोडीज ऑफ अकोला' हा आज एक परिवार झाला आहे. फक्त वेळ निघून जावा म्हणून भेटणारी ही माणसं नाहीत. तर एका ध्येयानं प्रेरीत होत त्याला आनंदाचा अन सुरांचा मुलामा चढविणारी ही किमयागार माणसं आहेत. आता यातील प्रत्येकजण एकमेकांशी एका शब्दांपलिकडच्या नात्यांत बांधले गेले आहेत. अलीकडेच या परिवाराचे संस्थापक असलेल्या 'सीए'  मनोज चांडक यांच्या आई-वडिलांचा वाढदिवस अन पोलीस उपाधिक्षक गजानन शेळके यांच्या आई-वडिलांच्या लग्नाचा 50 वा वाढदिवस 'मेलोडीज'नं अगदी घरगुती वातावरणात अगदी दणक्यात साजरा केला. या कार्यक्रमातील आपुलकी अन प्रेम पाहून दोघांच्याही आई-वडीलांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्यात. उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे यांच्या पत्नी आणि गायिका नीता खडसे या परिवारातील प्रत्येकाच्या हक्काची 'बहीण' झाल्यात. प्रत्येक आयोजनात सर्वजण अगदी परिवार अन मित्रांसोबत सहभागी होत असतो. येथील प्रत्येकजण एकमेकांच्या सुख, दु:खात सहभागी होत असतो.