अकोला : अकोला-पूर्णा पॅसेंजर रेल्वे  (Akola Purna Passenger) आणि भाजप खासदार संजय धोत्रेंचं घर बाँबने उडवणार अशी धमकी देणाऱ्या तरूणाला अकोला पोलिसांनी अटक केली आहे. धमकी देणारा अकोला जिल्ह्यातील बाभूळगाव जहाँगीरचा रहिवाशी आहे. अकोला पोलिसांनी त्याला मुंबईतील नालासोपाऱ्यातून आज सकाळी अटक केली आहे. नितीन गोटूकले असं तरूणाचं नाव आहे. नितीन सध्या नाशिकला राहतो आहे. धमकी देणारा तरूण मनोरूग्ण आणि नशेखोर असल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली आहे. 


'बाँब'च्या निनावी फोनने अकोल्यात खळबळ 
मंगळवारी 26 जुलैला अकोला रेल्वे पोलिसांना अकोला-पूर्णा सुपरफास्ट पॅसेंजर (रेल्वे क्रमांक 17683) या रेल्वेत बॉम्ब ठेवल्याचा आणि अकोल्याचे भाजपचे खासदार संजय धोत्रे यांचे निवासस्थान बॉम्ब उडवून देण्याऱ्या धमकीचा फोन मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूमला आला. त्यानंतर अकोला पोलिसांचे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक, विशेष पथक, श्वान पथक, बॉम्ब पथक, जीआरपी, आरपीएफ पथकासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी अकोला रेल्वे स्थानकावर हजेरी लावली. अन् रेल्वे स्थानकावरून प्लॅटफॉर्म क्रमांक पाचवर उभ्या असलेल्या अकोला-पूर्णा सुपरफास्ट पॅसेंजरची तपासणी सुरु केली. या दरम्यान, रेल्वेच्या प्रवाशांची कसून चौकशीसह तपासणी झाली. या घटनेने परवा अकोला पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली होती. मंगळवारी रात्री 10 वाजतापासून रेल्वेची तपासणी सुरु झाली अन् तब्बल अर्धा तास ही शोध मोहीम चालली. श्वान पथकाद्वारेही या तपासणीला सुरुवात झाली. बघता बघता सर्व रेल्वेच्या डब्यांची तपासणी झाली. 


या दरम्यान रेल्वेमध्ये बसलेल्या प्रवाशांचे फोटो काढण्यात आले. झडतीदरम्यान डब्यांमध्ये कोणतीही संशयास्पद वस्तू, संशयास्पद व्यक्ती आढळून आली नाही. त्यानंतर रेल्वे आपल्या मार्गाने रवाना झाली. या दरम्यान धमकी देण्यात आलेला फोन फसवणूक करण्यासाठी आल्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. तरी अकोला जीआरपी पोलीस ठाण्याच्या प्रमुख अर्चना गाढवे आणि मुंबई पोलिसांनी या बॉम्ब कॉलचा तपास सुरु केला होता. 


अकोला पोलिसांची झाली धावपळ 
दरम्यान, अकोल्याचे भाजपचे खासदारांचं घरंही बॉम्बने उडवून देण्यात आल्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर त्यांचं घर असलेल्या रामनगर परिसराची तपासणी करण्यात आली होती. परवा रात्री त्यांच्या रामनगरस्थित निवासस्थानी पोलीस बंदोबस वाढवण्यात आला होता. तर रेल्वे पोलिसांनीही त्यांच्या निवासस्थानी भेटी दिल्या होत्या. परवाच्या या घटनेमुळे अकोला पोलिसांची प्रचंड धावपळ झाली होती.


अफवा पसरविणाऱ्या तरुणाला अटक  
सार्वजनिक शांतता बिघडविण्याच्या उद्देशाने जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्याची अफवा फसरवल्यामुळे अज्ञात व्यक्तीविरुध्द अकोल्यातील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी विजय पंडीत यांनी लेखी तक्रार दिली. त्यानुसार 182, 505, (अ) (ब) भादंवि प्रमाण अदखलपात्र गुन्हा नोंद करून नितीन दिलीप गोटुकले याला अटक केली आहे. अकोला पोलिसांनी त्याला मूंबईतील नालासोपाऱ्यातून आज सकाळी अटक केली आहे. त्याला आज गुरुवारी त्याला न्यायालयात हजर केले आहे.