Akola Latest News update : स्त्री-पुरूष समानतेच्या फार मोठमोठ्या गोष्टी केल्या जातात. 'बेटी बचाव, बेटी पढाओ'चे ढोलही बडवले जातात. महाराष्ट्राची ओळख 'छत्रपती शिवराय- फुले-शाहू-आंबेडकरां'चा 'पुरोगामी महाराष्ट्र' अशी. मात्र, याच महाराष्ट्राच्या पुरोगामित्वावर ओरखडा ओढणारी घटना घडली आहे अकोल्यात. अकोला जिल्हा सर्वोपचार रूग्णालयात आज एका महिला रुग्णाने फाशी घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. गोदावरी नंदकिशोर खिल्लारे असं या मृत महिलेचं नाव आहे. ती वाशिम येथील पंचशीलनगरची रहिवाशी आहे. गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या गोदावरीचा मृतदेह आज सकाळी वार्ड क्रमांक तेवीसच्या शौचालयात दिसून आला. मुलगी झाल्याने सासरच्या मंडळींनी त्रास दिल्याने तिने आत्महत्या केल्याचा आरोप होतो आहे. दरम्यान, कर्मचांऱ्याचा संप सुरू असल्याने तीन दिवसांपासून शौचालयात असलेला तिचा मृतदेह कुणाचाच लक्षात आला नाही. 


विवाहित रूग्ण महिलेच्या आत्महत्येनं खळबळ :


 अकोला जिल्हा सर्वोपचार रूग्णालयात एका महिला रुग्णाच्या आत्महत्येनं आज मोठी खळबळ उडाली. आज सकाळी वार्ड क्रमांक 23 च्या शौचालयातून दुर्गंधी येत असल्याने ही आत्महत्या समोर आली आहे. यातील मृत महिला गोदावरी खिल्लारे ही वाशिमची रहिवाशी आहेय. तिने 3 मार्चला एका मुलीला जन्म दिला. मुलीवर जन्मानंतर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. मुलीच्या जन्मानंतर तिची सासरच्या मंडळीकडून छळवणूक सुरू असल्याने ती दिवसांपासून गायब होती. मृत महिलेला मुलगी झाल्यामुळे सासरच्या मंडळीकडून तिचा मानसिक छळ सुरू असल्याचा आरोप तिच्या माहेरच्या मंडळींनी केला आहे. 



...अन मुलगी झाल्याने तिचा सुरू होता मानसिक छळ : 


     गोदावरी हिचं लग्न पाच वर्षांपूर्वी वाशिमच्या पंचशीलनगरातील नंदकिशोरसोबत झालेलं. गोदावरीनं नर्सिंग डिडिप्लोमाचं शिक्षण पुर्ण केलेलं. लग्नानंतर तब्बल पाच वर्षांनी गोदावरी पहिल्यांदाच गर्भार राहिली. मात्र, घरी सासू आणि पतीचा मुलगा झाला पाहिजे, यासाठीच हट्टहास होता. 3 मार्चला तिने अकोल्याच्या जिल्हा सर्वोपचार रूग्णालयात एका गोंडस मुलीला जन्म दिला. मुलीच्या जन्मानंतर बाळावर अतिदक्षता विभागात उपचार सुरूयेत.  मात्र, यानंतर सुरू झाली तिच्या मानसिक छळाची मालिका. 6 मार्चला तिला रूग्णालयात भेटायला आलेल्या तिच्या पतीने तिच्यासोबत मुलगी झाल्यामुळे वाद घातल्याची माहिती आहे. यानंतर सासू आणि पतीच्या मानसिक छळामूळे ती तीन दिवसांपुर्वी अचानक गायब झाली. पोलिसांमध्ये ती हरवल्याची तक्रार नातेवाईकांनी दिली. आज वार्ड क्रमांक 23 च्या शौचालयातून दुर्गंधी येत असल्याने दार तोडण्यात आलं तेंव्हा गोदावरीचा गळफास घेतलेला मृतदेह आढळला. त्यानंतर रूग्णालयात एकच खळबळ उडाली. 
 


कर्मचांऱ्याच्या संपामुळे तीन दिवसांपासून लक्षात नाही आली आत्महत्या : 


 गोदावरी हिने वार्ड क्रमांक 23 च्या शौचालयाचा दरवाजा आतून बंद करीत तीन दिवसांपूर्वीच आत्महत्या केल्याचं बोललं जातंय. मात्र, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्याने रूग्णालयातील सफाई कर्मचारीही तीन दिवसांपासून संपावर होते. आज शौचालयातून दुर्गंधी येत असल्यानं दरवाजा तोडण्यात आला. त्यानंतर हा आत्महत्येचा प्रकार उघडकीस आला. 



प्रकरणाचा अकोला पोलिसांकडून तपास सुरू :


15 मार्चपासून गोदावरी बेपत्ता असल्याची तक्रार आमच्याकड़ं तिच्या सासुने दिली होती. तेव्हापासून तिचा शोध सुरू होता. दरम्यान आज सकाळी जीएमसी प्रशासनामार्फत माहिती मिळाली की गळफास घेतलेल्या अवस्थेत एका महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. त्यानंतर तिची ओळख समोर आली. सदर गोदावरीने तिच्याच ओढ़नीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याचे सिटी कोतवाली पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कडू म्हणाले