Akola Latest News Update : अकोला जिल्हा परिषदेच्या चार सभापती पदांच्या चुरसपुर्ण लढतीत वंचितनं चारही ठिकाणी बाजी मारलीय. यात भाजपच्या दोन मतांच्या साथीनं वंचितनं चारही पदांवर झेंडा फडकवला आहे. मात्र, देवेंद्र फडणवीस पालकमंत्री असलेल्या अकोल्यातील जिल्हा परिषदेत भाजपात फुट पडली आहे. आज भाजपच्या पाचपैकी तीन सदस्यांनी महाविकास आघाडीला मतदान केलं. तर दोन सदस्यांनी वंचितला मतदान केलं आहे. या निवडणुकीत वंचितच्या उमेदवारांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा पराभव केला. विशेष म्हणजे वंचितनं चारही महिला उमेदवार दिल्यायेत. वंचित बहूजन आघाडीच्या रिजवाना परवीन या महिला आणि बालकल्याण समितीच्या सभापती झाल्या आहेत. तर समाजकल्याण सभापतीपदी आम्रपाली खंडारे विजयी झाल्यात. तर विषय समितीच्या सभापती पदांवर वंचितच्याच माया नाईक आणि योगिता रोकडे विजयी झाल्यात. यावेळी वंचितच्या विजयी उमेदवारांना 27 मतं मिळालीत. तर महाविकास आघाडीच्या पराभूत उमेदवारांना 26 मतं मिळाली आहे.
महिला आणि बालकल्याण सभापती पदावर वंचितच्या रिजवाना परवीन :
महिला आणि बालकल्याण सभापती पदासाठी वंचित बहूजन आघाडीनं रिजवाना परवीन शेख मुख्तार यांना उमेदवारी दिली होती. तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीच्या सुमन गावंडेंनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यावेळी वंचितच्या रिजवाना परवीन यांना 27 मतं मिळालीत. तर राष्ट्रवादीच्या सुमन गावंडे यांना 26 मतं मिळालीत. या निवडणुकीत वंचितच्या रिजवाना परवीन यांनी राष्ट्रवादीच्या सुमन गावंडेंचा एका मताने पराभव केला.
समाजकल्याण सभापतीपदी 'वंचित'च्या आम्रपाली खंडारे :
समाजकल्याण सभापती पदावर वंचितच्या आम्रपाली खंडारे विजयी झाल्यात. त्यांनी या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून उभे असलेल्या शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या डॉ. प्रशांत अढाऊ यांचा पराभव केला. या निवडणुकीत वंचितला 27 मतं पडलीत. तर शिवसेनेला 25 मतं मिळालीत. शिवसेनेच्या एक महिला सदस्य यावेळी मतदानाला अनुपस्थित होत्या.
दोन्ही विषय समित्यांची सभापतीपदंही वंचितच्याच पारड्यात :
दोन्ही विषय समित्यांवरही वंचितच्या उमेदवारांनीच विजय मिळवलाय. वंचितच्या माया नाईक आणि योगिता रोकडे या दोघींनी या सभापती पदांवर विजय मिळविला. त्यांनी महाविकास आघाडीच्या सम्राट डोंगरदिवे आणि गजानन काकड यांचा पराभव केला आहे. या दोन्ही पदांच्या निवडणुकीत वंचितला 27 मतं मिळालीत. तर महाविकास आघाडीला 26 मतं मिळालीत.
अकोला जिल्हा परिषदेत 'महिला राज' :
आज झालेल्या चारही सभापती पदांसाठी वंचितनं महिलांनाच उमेदवारी दिली होती. या चौघींच्या विजयानंतर जिल्हा परिषदेत 'महिला राज' आलं आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी वंचितच्याच संगिता अढाऊ याआधीच विजयी झाल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या सहा पदाधिकार्यांमध्ये पाच महिला आहेत. फक्त उपाध्यक्ष पदावर सुनिल फाटकर हे एकमेव पुरूष सदस्य आहेत.
फडणवीस पालकमंत्री असलेल्या अकोल्यात जिल्हा परिषदेत भाजपात उभी फूट. : देवेंद्र फडणवीस पालकमंत्री असलेल्या अकोल्यातील जिल्हा परिषदेत भाजपात फुट पडली आहे. आज भाजपच्या पाचपैकी तीन सदस्यांनी महाविकास आघाडीला मतदान केलं. तीन सदस्य 'महाविकास आघाडी'सोबत गेल्यानंतर उरलेल्या दोन सदस्यांना थेट वंचितला मतदान करण्याचे आदेश भाजपकडून देण्यात आलेत. त्यामूळे अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत गैरहजर राहत प्रकाश आंबेडकरांना भाजपच्या अप्रत्यक्ष मदतीनं सत्ता राखता आली होती. आजच्या सभापती पदांच्या निवडणुकीत भाजपनं थेट आंबेडकरांच्या पक्षाला मतदान करत खळबळ उडवून दिली आहे. अकोला जिल्हा परिषदेत आंबेडकरांना मदत करण्याची भूमिका थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली आहे. त्यामूळे भाजपवर जहरी टीका करणार्या आंबेडकरांना फडणवीसांचा 'सॉफ्ट कॉर्नर' भविष्यात काही वेगळं राजकारण रंगणार तर नाही ना?, अशी शंका उपस्थित करणारं आहे.
अधिकृत निकाल 1 नोव्हेंबरला होणार जाहीर :
आजची निवडणुक न्यायालयाच्या आदेशाच्या आधीन राहून घेण्यात आली आहे. कारण, कालच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील पिंपळखुटा मतदारसंघाच्या सदस्या लता पवार यांचं सदस्यत्व जातवैधता प्रमाणपत्र न जोडल्यानं विभागीय आयुक्तांनी रद्द केलं होतं. मात्र, आज उच्च न्यायालयानं या आदेशाला तात्पुरती स्थगिती देत त्यांना मतदान करू देण्याला परवानगी दिली होती. त्यांच्या सदस्यत्वाबाबत 1 नोव्हेंबरला अंतिम सुनावणी झाल्यानंतर आजच्या निवडणुकीचा अधिकृत निकाल जाहीर करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.
असं आहे अकोला जिल्हा परिषदेतील पक्षीय बलाबल :
एकूण जागा : 53
वंचित बहुजन आघाडी : 23
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे : 12
भाजप : 05
काँग्रेस : 04
राष्ट्रवादी : 04
प्रहार : 01
अपक्ष : 04