Akola Latest News Update : अकोला जिल्हा परिषदेच्या चार सभापती पदांची शनिवारी निवडणूक होत आहे. भाजपच्या पाच सदस्यांपैकी तीन सदस्य महाविकास आघाडीकडे गेल्याची विश्वसनीय माहिती 'एबीपी माझा'च्या विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे. 15 दिवसांपुर्वी झालेल्या अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपचे 5 सदस्य अनुपस्थित राहिल्यामूळे वंचितला सत्तेची 'लॉटरी' लागली होती. अध्यक्ष-उपाध्यक्षाच्या निवडणुकीतील पराभवाची परतफेड करण्यासाठी 'महाविकास आघाडी'ने व्युहरचना आखली आहे. महाविकास आघाडीत शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, प्रहार आणि दोन अपक्षांचा समावेश आहे. 53 सदस्यांच्या अकोला जिल्हा परिषदेत वंचितकडे दोन अपक्षांसह 25 सदस्य आहेत. तर महाविकास आघाडीकडे 23 सदस्य आहेत. भाजपचे तीन सदस्य मतदानापर्यंत फुटले तर महाविकास आघाडीकडे 26 सदस्यांचं संख्याबळ होण्याची शक्यता आहे.
भाजपच्या अनुपस्थितीने अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत वंचितचा विजय :
अकोला जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडणूकीत प्रकाश आंबेडकर यांची सत्ता कायम राहिली होती. त्यानंतर आता जिल्हा परिषदेच्या चार सभापतीपदासाठी निवडणूक प्रक्रिया उद्या 29 ऑक्टोबरला होत आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी वंचित बहुजन आघाडीसह विरोधी गटातील महाविकास आघाडीकडून मोर्चेबांधणीला वेग आला आहे. दरम्यान, भाजपचे तीन जिल्हा परिषद सदस्य महाविकास आघाडीच्या संपर्कात असल्याचं समजते आहे. तर गुरूवारीच दोन अपक्षांसह सत्ताधारी वंचित बहुजन आघाडीचे 25 सदस्य अज्ञातस्थळी रवाना झालेत. दूसरीकड़ं महाविकास आघाडीमध्ये उमेदवारांच्या नावावर एकमत होत नसल्याची परिस्थिती आहे. यावर तोडगा काढण्यासाठी आज महाविकास आघाडीची बैठक झाली. मात्र, उमेदवारांच्या नावांवर उद्या सकाळी शिक्कामोर्तब करण्याचं या बैठकीत ठरविण्यात आलं.
जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदांवर सत्ताधारी वंचित बहुजन आघाडीने विजय मिळविला होता. अध्यक्षपदी संगीता अढाऊ आणि उपाध्यक्षपदी सुनील फाटकर यांची निवड करण्यात आली होती. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण आणि महिला व बालकल्याण समितीसह विविध विषय समित्यांच्या चार सभापतीपदांची निवडणूक उद्या 29 ऑक्टोबर रोजी होणार आहे. जिल्हा परिषदेची विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेत चार सभापतीपदांची निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या संपुर्ण राजकीय घडामोडींमूळे उद्या चार सभापतीपदांच्या निवडणुकीत नेमका कुणाचा गुलाल उधळला जाणार याची उत्सुकता जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात आहे.
भाजपचे तीन सदस्य 'महाविकास आघाडी'च्या संपर्कात :
यापूर्वी झालेल्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीपासून भाजपचो पाच सदस्य अनुपस्थित राहिले होते. त्यामुळे 'वंचित'चा विजय झाल्याने सत्ता कायम राहली. महाविकास आघाडीच्या उमेदवारांना 23 तर 'वंचित'च्या उमेदवारांना 25 मते मिळाली होती. आता सभापतीपदांच्या निवडणुकीत भाजप कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष आहे. 'एबीपी माझा'च्या सूत्रांनुसार भाजपचे तीन सदस्य आता महाविकास आघाडीच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. बार्शीटाकळी आणि अकोट तालूक्यातून निवडून आलेल्या सदस्यांचा यात समावेश आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस हेच अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. खुद्द फडणवीस पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यात भाजपचे तीन सदस्य महाविकास आघाडीच्या संपर्कात असल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान, भाजपच्या तिन्ही सदस्यांना परत आणण्यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून मोठया हालचाली सुरू आहेत.
सत्ताधारी वंचितचे सदस्य अज्ञातस्थळी रवाना :
सत्ताधारी वंचित बहुजन आघाडी निवडणुकीत आवश्यक असलेल्या सत्ताधारी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा परिषदेतील 25 सदस्य गुरूवारी अकोल्यातून अमरावती जिल्ह्यातील थंड हवेच्या ठिकाणी आहेत. दरम्यान, गेल्या दोन दशकांपेक्षा जास्त कालावधीपासून जिल्हा परिषदेवर वंचित बहुजन आघाडी सत्ता आहे. स्पष्ट बहुमत नसतांनाही रणनीती आखत जिल्हा परिषदेवर झेंडा फडकवण्यात वंचितला आतापर्यंत यश मिळालं आहे.
महाविकास आघाडीची बैठकील निर्णयाकडे लक्ष :
जिल्हा परिषद सभापतीच्या निवडणूकीसाठी महाविकास आघाडीमध्ये एकमत होत नसल्याचे चित्र आहे. दरम्यान, आज रात्रीच्या बैठकीनंतर महाविकास आघाडीची पुढील काय भूमिका असणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले आहे.
असं आहे अकोला जिल्हा परिषदेतील पक्षीय बलाबल :
एकूण जागा : 53
वंचित बहुजन आघाडी : 23
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे : 12
भाजप : 05
काँग्रेस : 04
राष्ट्रवादी : 04
प्रहार : 01
अपक्ष : 04