अकोला : जिल्ह्यातील पातुर तालुक्यातल्या चान्नी फाट्यावरील एका नदीच्या पुलावरील अपघाताची घटना ताजी असतानाचा आणखी एक भीषण अपघाताची (Accident) घटना पातूर तालुक्यात घडली आहे. भरधाव येणाऱ्या ट्रक आणि कारचा भीषण अपघात होऊन तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. आज दुपारी 2 वाजताच्या सुमारास ही अपघाताची घटना घडली. या घटनेनंतर स्थानिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मतदकार्य सुरू केले होते. त्यानंतर, पोलिसांनीही (Police) घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला आहे. जखमींना तत्काळ शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येत आहे. 


अकोल्या जिल्ह्यातल्या अकोला-पातुर रस्त्यावर ट्रक आणि कारचा आज दोनच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघात 3 जण गंभीर जखमी झाले असून जखमींना तातडीने स्थानिक नागरिकांच्या मदतीने अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी रवाना करण्यात आलं आहे. अकोला जिल्ह्यातील पातुर-अकोला रस्त्यावरील चिखलगाव गावाजवळ हा अपघात झाला. जनावरांचं कुटार वाहून नेणारा ट्रक राँग साईंडनं आल्यामुळे समोरुन येत असलेल्या कारला जोराची धडक बसली. ट्रक व कारच्या भीषण धडकेत कारमधील तिघे जण जखमी झाले आहेत.


अपघातानंतर ट्रक रस्त्यावर पलटी झाला असून कारचा अक्षरश: चुराडा झाल्याचे दिसून येत आहे. या घटनेची माहिती मिळताच पातुर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि अपघाती वाहनांना बाजूला करून वाहतुकीचा मार्ग सुरळीत करण्याचे काम सुरू केले. एमएच 30 डीबी 7626 क्रमाकांची निळ्या रंगाची कार या अपघातात पूर्णपणे उध्वस्त झाली आहे. 


चान्नी फाट्यावरील पुलावरही ट्रक व कारचा अपघात


अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यातल्या चान्नी फाट्यावरील एका नदीच्या पुलावरून दोन्ही वाहनं जात असताना भीषण अपघात झाला, शनिवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली होती. नदीवरील पूल छोटा असल्यामुळे ट्रक चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि ट्रक कारवर पलटी झाला. अरुंद रस्त्यावरुन ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नातून ट्रकचालकाचे नियंत्रण सुटले अन् शेजारुन जात असलेल्या कारवर हा तांदळाच्या पोत्यांनी भरलेला ट्रक कोसळला. या अपघातात ट्रक खाली कार दबल्या गेल्यानं कारमधील प्रवासी वाहनात अडकले होते. मात्र, स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत, त्यांना सुखरूपपणे बाहेर काढले. सुदैवानं या अपघातात कोणालाही मोठी दुखापत झाली नसून कारमधील 4 जण किरकोळ जखमी झाले आहेत. चान्नी फाट्यावरील अरुंद पुलावरच ट्रक कोसळल्याने ट्रकमधील तांदुळाचे पोते पुलाखाली पडले आहेत. तर, ट्रक शेजारुन जाणारी कार ट्रकच्या ओझ्याखाली दबल्याने तिचे मोठे नुकसान झालं आहे. 


 हेही वाचा


Mumbai Goa Highway Accident : जगबुडी पूल आणि भोस्ते घाट ठरतोय अपघातांचा ब्लॅक स्पॉट; एकाच रात्री दोन भीषण अपघात, दोन जण गंभीर