Ratnagiri News रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर (Mumbai Goa Highway) असलेल्या जगबुडी पूल आणि भोस्ते घाट अपघातांसाठी ब्लॅक स्पॉट ठरला आहे. कारण काल, शनिवारच्या रात्री या महामार्गावर दोन वेगवेगळ्या ठिकाणी भीषण अपघातांच्या (Accident) घटना घडल्या आहेत. हे दोन्ही अपघात कंटेनरचे असून यात दोघे गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. सध्या त्यांचावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून मुंबई-गोवा महामार्गावरील ब्लॅक स्पॉट ठरलेल्या जागांवर अपघातांची मालिका सुरू असून आजपर्यंत अनेक अपघात त्याच त्याच ठिकाणी होत आहेत. परिणामी, या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाने ठोस उपाय योजना करव्या, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. 


एकाच रात्री दोन भीषण अपघात, दोन जण गंभीर


मुंबई-गोवा महामार्गावरती  शनिवारी मध्यरात्री दोन ब्लॅक स्पॉट असणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड मधील भोस्ते घाट आणि भरणे नाका येथील जगबुडी नदीच्या पुलावर दोन भीषण अपघात झाले. हे दोन्ही अपघात कंटेनरचे होते.  या दोन्ही कंटेनरचा दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. यात एक अपघात हा भरणे नाका येथील जगबुडी नदीच्या पुलावर मुंबईहून गोव्याच्या दिशेने येणाऱ्या भरधाव कंटेनर पुलाच्या संरक्षण कठड्याला टक्कर लागल्याने अपघात झाला.


या अपघातात कंटेनर नदीमध्ये पडताना थोडक्यात बचावला. या अपघातात कंटेनरचा चालक जखमी झाला. हा अपघात इतका भीषण होता की यात महामार्गावरील जगबुडी नदीच्या पुलाची संरक्षण भिंत काही प्रमाणात तुटली आहे. हा अपघात शनिवारी मध्यरात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास झाला.  


ब्लॅक स्पॉटवर अपघातांची मालिका सुरूच 


दरम्यान, याच सुमारास खेड मध्येच या पुलापासून काही अंतरावर असणार्‍या आणि  ब्लॅक स्पॉट मध्ये नोंद असलेल्या भोस्ते घाटात देखील कंटेनर महामार्गाच्या दुभाजकाला जाऊन धडकला. या अपघातात देखील चालक जखमी झाला आहे. ही घटना देखील शनिवारी मध्यरात्री साडेदहा ते अकरा वाजताच्या सुमारास घडली. मुंबई गोवा महामार्गावरील ब्लॅक स्पॉटवर अपघातांची मालिका सतत सुरू असून आजपर्यंत अनेक अपघात त्याच त्या ठिकाणी होत आहेत. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाने ठोस उपाय योजना करून अशा अपघातांची मालिका थांबवावी, अशी मागणी आता नागरिकांमध्ये जोर धरू लागली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या