अकोला: राज्यभरात तूर खरेदी गाजलीय ती गडबड आणि गोंधळामुळे. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा येथे नाफेडनं कहरच केला आहे. येथील खरेदी केंद्रावर चक्क मृत शेतकऱ्याच्या नावाने तूर खरेदी झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.
तालुक्यातील वाकोडी येथील मयत शेतकरी बळीराम सदाशिव येवले यांच्या नावानं ही तूर खरेदी दाखवण्यात आली आहे. बळीराम येवले यांचे 3 ऑगस्ट 2014 ला निधन झालं आहे. मात्र, 22 एप्रिल रोजी त्यांच्या नावावर 14 क्विंटल तुरीचे मोजमाप करण्यात आले.
बळीराम यांच्या नावानं एखाद्या व्यापाऱ्यांनं आपली तूर येथे विकल्याची शक्यता आहे.
दरम्यान, राज्यभरात तूर खरेदी यंत्रणेला हाताशी धरून व्यापाऱ्यांनी आपलं उखळ तर पांढरं केलं नाही ना?, हा प्रश्न यातून निर्माण होतोय.
तेल्हारा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सुरु असलेल्या नाफेडच्या केंद्रावर अनेक गैरप्रकार होत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांच्या होत्या. या तक्रारीवर याप्रकारामुळे शिक्कामोर्तब झालं.
तेल्हारा येथील नाफेडच्या तूर खरेदी केंद्रावर येथील कर्मचाऱ्यांनी मनमानी करीत व्यापाऱ्यांची चांदी केल्याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये आहे. यातूनच तूर खरेदी बंद होण्याच्या शेवटच्या दिवसांमध्ये बाजार समितीने जवळच्या शेतकऱ्यांना पुरवणी टोकन दिली. यामुळे आधी आलेले शेतकरी तूर मोजणीपासून वंचित राहिलेले आहेत.
नाफेडमध्ये तूर आणताना कृषी उत्पन्न बाजार समिती प्रवेशपत्रिका भरून घेते. त्यामध्ये शेतकऱ्याचे नाव, गट क्रमांक, दाखला दिनांक अशी माहिती भरली जाते. परंतु बळीराम येवले यांचे टोकन क्रमांक 594 वरून पुरवणी टोकन म्हणून 189 क्रमाकांचे टोकन देण्यात आले.
या पावतीवर किती माल आणला, त्याची माहिती नाही. वाहनाचा क्रमांक एमएच 28 असा अर्धवट आहे. त्या माहितीवरच तुरीचे मोजमाप करण्यात आले, तसेच 794 क्रमांकाच्या एकाच टोकनवरून चार पुरवणी टोकन वितरीत करण्यात आले आहेत.
त्यामुळे तेल्हारा येथील तूर खरेदी केंद्रावरील हा प्रकार शेतकऱ्यांच्या नावावर यंत्रणेला हाताशी धरुन व्यापाऱ्यांची चांदी करणारं रॅकेट ठिकठिकाणी कार्यरत असल्याच्या चर्चेला बळ मिळतंय. तेल्हाऱ्यातील या प्रकारावर काय कारवाई आणि चौकशी होणार यासंदर्भात कुणाकडूनच माहिती मिळू शकली नाही.
मुख्यमंत्र्यांनी 22 एप्रिलपर्यंत आलेली तूर खरेदी करणार असल्याचं जाहीर केलं असलं तरी अकोल्यातील पाचही खरेदी केंद्रांवर अद्याप तूर खरेदीला सुरुवात झालेली नाही. जिल्ह्यात अद्यापही खरेदी केंद्रांवर 1 लाख क्विंटल तूर पडून आहे. त्यामुळे तूर खरेदी नेमके कधी होणार या विचारानं शेतकरी हवालदिल झाला आहे.