Shirdi News: झटपट दर्शनासह स्वस्तात रूम मिळवून देण्याच्या बहाण्याने साईभक्तांची फसवणूक करणाऱ्या 20 ते 25 दलालांना पोलिसांनी (Police) ताब्यात घेतलं आहे. भाविक शिर्डीत (Shirdi) प्रवेश करताच हे दलाल दुचाकीवरून साईभक्तांच्या वाहनांचा पाठलाग करतात आणि विविध आमिष दाखवून त्यांची फसवणूक करतात. भाविकांनी नकार दिल्यास अनेकदा त्यांना शिवीगाळ केली जाते किंवा धक्काबुक्की झाल्याच्या अनेक घटना देखील घडतात, याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
भाविकांनो, भूलथापांना बळी पडू नका
शिर्डी पोलिसांकडून अनेकदा दलालांवर कारवाई करण्यात येते. मात्र या कारवाईत सातत्य नसल्याने काही दिवसातच पुन्हा भाविकांच्या फसवणुकीचे प्रकार सुरू होतात. आता शिर्डी पोलिसांनी भाविकांची दिशाभूल करून फसवणूक करणाऱ्या दलालांना चाप लावण्यासाठी एका अधिकाऱ्यासह पाच पोलीस कर्मचाऱ्यांचे विशेष पथक तैनात केले आहे. शिर्डीतील दलालांवर अशी कारवाई पुढे देखील सुरूच राहणार असून भाविकांनी भूलथापांना बळी पडू नये, असं आवाहन शिर्डी पोलिसांनी केलं आहे.
अतिरिक्त पैसे आणि बनावट पास देऊन भाविकांची फसवणूक
अहमदनगर जिल्हा देवस्थानांचा जिल्हा म्हणून देखील ओळखला जातो, जिल्ह्यातील काही देवस्थानांत देशभरातून येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. पाथर्डी तालुक्यातील मोहटा गडावर, तसेच शिर्डीसह शनिशिंगणापुरात दलालांचा सुळसुळाट आहे. या दलालांकडून सातत्याने भाविकांची फसवणूक होत असते. या भाविकांची काही हॉटेल एजंट, तसंच पूजा साहित्य विक्रेत्यांकडून लूट होते. शिर्डीत हॉटेलचे एजंट, पूजा साहित्य विक्रेत्यांचे एजंट भाविकांच्या वाहनांना अडवून आपल्याच दुकानाकडे जाण्याचा आग्रह धरतात. त्यानंतर पूजेचे साहित्य खरेदी करण्याचा आग्रह करत आम्ही तुम्हाला झटपट दर्शन करवून देऊ म्हणत अतिरिक्त पैसे आणि बनावट पास देऊन भाविकांची फसवणूक करतात.
बाहेरगावावरून येणाऱ्यांना नियमांची फारशी माहिती नसल्याने फसवणूक
राज्यासह परदेशातील भाविक श्रद्धेपोटी या मंदिरांत दर्शनासाठी गर्दी करत असतात. बाहेरगावावरून येणाऱ्या भाविकांना मंदिर परिसराची आणि तेथील नियमांची फारशी माहिती नसते, याचाच फायदा घेऊन काही एजंट मंडळी देवस्थानांमध्ये येणाऱ्या भाविकांची लूट करतात. भाविक वाहन थांबवण्याच्या मन:स्थितीत नसताना देखील विक्रेते रस्त्यातच वाहनं अडवतात. अपघात टाळण्यासाठी वाहनाची गती कमी केल्यानंतर विक्रेत्यांकडून लगेच पूजा साहित्य खरेदीचा आग्रह धरला जातो. भाविकांनी नकार दिल्यास काही विक्रेते त्यांच्यावर अरेरावीही करतात.
थेट दर्शनासाठी जाणाऱ्यांनाही त्याच रांगेतून मिळतो प्रवेश
श्रद्धा आणि सबुरीची शिकवण संपूर्ण जगाला देणाऱ्या साईंच्या शिर्डीत गेल्या अनेक वर्षांपासून भाविकांची लूट करणाऱ्या काही कमिशन एजंट्सनी धुमाकूळ घातला आहे. झटपट दर्शन देणे, कमी खर्चात हॉटेल सुविधा उपलब्ध करुन देणे, असे सर्व प्रकार सांगून भक्तांची लूट या कमिशन एजंट्सकडून होत असते. परंतु, हे दलाल देत असलेल्या दर्शनाच्या रांगांचे पास बनावट असतात. थेट दर्शनासाठी गेलात तरी तुम्हाला याच रांगेतून प्रवेश मिळतो.
हेही वाचा: