Maharashtra: मे महिन्यात शाळांना सुट्ट्या (Summer Vacation) पडल्यामुळे कोकणात (Kokan) सध्या पर्यटक मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. अनेक रिसॉर्ट-समुद्रकिनारे (Resort-Beaches) पर्यटकांनी गजबजले आहेत. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग किनाऱ्यांना पर्यटकांनी सर्वाधिक पसंती दिली आहे. शाळांना पडलेल्या सुट्ट्यांमुळे पालक आपल्या कुटुंबासमवेत समुद्रकिनाऱ्यांवर सफर करण्यासाठी कोकणात दाखल झाले आहेत. मात्र अशातच, दिवेआगर (Diveagar) परिसरात एका छोटया मुलाचा रिसॉर्टच्या स्विमिंग पुलमध्ये (Swimming Pool) पडून दुर्दैवीरीत्या मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ आता समोर आला आहे. अविष्कार येळवंडे असे या चिमुकल्याचे नाव आहे, वडिलांची नजर चुकवून हा चिमुकला स्विमिंग पुलकडे गेला होता, यावेळी ही दुर्घटना घडली.


पर्यटकांनी आपल्यासोबत असलेल्या लहान मुलांकडे लक्ष ठेऊन त्यांची काळजी घेणे आवश्यक आहे. मुलाकडे दुर्लक्ष झाल्याने गुरुवारी, 18 मे रोजी स्विमिंग पुलमध्ये बुडून 4 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.


मे महिन्याच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी पुण्यातील (Pune) खेड-सावरदारी येथील अविनाश येळवंडे यांचे कुटुंब कोकणात दिवेआगरच्या इलाईट रिसॉर्टमध्ये आले होते. आल्या दिवशीच हे कुटुंब दिवेआगर समुद्रावरही फिरून आले होते. त्यामुळे सकाळी वडील आपली गाडी धुण्यासाठी खोलीतून खाली आले होते, यावेळी गाडी धुताना त्यांच्यासोबत खाली आलेला त्यांचा छोटा मुलगा अविष्कार त्यांच्यापासून नजर चुकवून दूर जाऊन रिसॉर्टच्या स्विमिंग पूल परिसरात एकटाच फिरत होता.


मुलगा दिसेनासा झाला हे लक्षात येताच त्याची शोधाशोध सुरू झाली आणि शोधाशोध सुरु झाल्याच्या थोड्याच वेळात त्याच्या वडिलांना स्विमिंग पूलमध्ये तरंगत असलेले धक्कादायक दृश्य दिसले. त्याच बरोबर मुलाला तात्काळ जवळच्या बोर्ली पंचतन येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. आई-वडिलांची नजर चुकवून तो स्विमिंग पूलमध्ये गेला, पूलमध्ये पाय टाकून बसला. त्यातच पाण्यात उतरण्याचा मोह त्याला झाला असावा. स्विमिंग पूल त्याच्या उंचीपेक्षा खूपच जास्त खोल होते, त्यामुळे काही वेळातच तो पाण्यात गटांगळ्या खाऊ लागला.


हात पाय मारून त्याने अनेकदा पुलाच्या कठड्यापर्यंत पोहोचायचा केविलवाणा प्रयत्न केला, पण दुर्दैवाने तो निष्फळ ठरला. त्या निष्पाप जीवाला तिथपर्यंत पोहोचणे शक्य झाले नाही. या दुर्दैवी घटनेचा हृदय पिळवटून टाकणारा व्हिडीओ समोर आल्याने अविष्कार तिथे कसा पोहोचला हे देखील समोर आलं आहे. मात्र अविष्कारची जीव वाचवण्यासाठीची केविलवाणी धडपड पाहून मन सुन्न झाल्याशिवाय राहत नाही. या घटनेने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.


अविष्कार स्विमिंग पूलकडे कसा गेला? कधी पडला? हे अविनाश यांच्याही लक्षात आलं नाही, या सगळ्या घटनेची नोंद दिघी सागरी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे.


पर्यटकांनी आपल्यासोबत असलेल्या लहान-मोठ्या मुलांची काळजी जबाबदारीपूर्वक घेणे आवश्यक आहे, अन्यथा अशा दुर्दैवी घटना घडू शकतात. त्यामुळे पर्यटकांनी काळजी घ्यावी, असं स्पष्ट मत पोलिसांकडून व्यक्त करण्यात आलं आहे. या दुर्देवी घटनेने येळवंडे कुटुंब तसेच परिसरावर शोककळा पसरली आहे.


हेही वाचा:


Sameer Wankhede: समीर वानखेडेंना अटकेपासून 22 मे पर्यंत संरक्षण, सोमवारपर्यंत सीबीआयने उत्तर द्यावं, उच्च न्यायालयाचा आदेश