अहिल्यानगर :  ज्येष्ठ नेते मधुकर पिचड (Madhukar Pichad) यांची तब्येत अत्यवस्थ असल्याची माहिती समोर येत आहे. मधुकर पिचड यांना आज पहाटेच्या सुमारास ब्रेनस्ट्रोकचा (Brainstroke) झटका बसला आहे.  त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर नाशिकच्या 9 पल्स रूग्णालयात उपचार सुरु आहेत. 


याबाबत अधिक माहिती अशी की, ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांना आज पहाटेच्या सुमारास राजूर येथील राहत्या घरी असताना ब्रेनस्ट्रोकचा झटका बसला. मधुकरराव पिचड यांचे वय 84 आहे. त्यांना उपचारासाठी नाशिकच्या 9 पल्स रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्या प्रकृती स्थित असल्याची माहिती मिळत आहे. त्यांना अर्धांगवायू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. मधुकर पिचड यांचे चिरंजीव वैभव पिचड यांच्यासह त्यांचे कुटुंबीय रुग्णालयात दाखल झाले आहेत. 


काही दिवसांपूर्वी घेतली होती शरद पवारांची भेट 


दरम्यान, मधुकर पिचड आणि त्यांचे चिरंजीव वैभव पिचड यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची सिल्वर ओक येथे भेट घेतली होती. सध्या पिचड कुटुंबीय भाजपमध्ये आहे. पण, महायुतीत अकोले विधानसभेची जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला सुटत असल्यामुळे पिचड कुटुंबीय शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तुतारी हातात घेण्याच्या तयारीत असल्याची बोलले जात आहे. मधुकर पिचड राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य होते, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे. परंतु 2019 मध्ये त्यांनी त्यांचा मुलगा वैभव पिचड यांच्यासह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. 2019 मध्ये किरण लहामटे यांनी वैभव पिचड यांचा पराभव केला. त्यांना अकोले विधानसभेचं तिकीट मिळण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पिचड कुटुंबीयांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटात परतण्याचा निर्णय घेतला आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या


Maharashtra MLA List : विधानसभा निवडणुकीचं बिगुल थोड्यावेळात वाजणार, जाणून घ्या महाराष्ट्रातील 288 विद्यमान आमदार कोण?


ठरलं! रात्रीच आदेश निघाला, सेंट्रल हॉलमध्ये शपथविधीची लगबग सुरु; आचारसंहितेपूर्वीच महायुतीचे 7 नेते होणार आमदार