अहिल्यानगर : लोकसभा निवडणुकीनंतर (Lok Sabha Election 2024) आता विधानसभा निवडणुकीचे (Maharashtra Assembly Election 2024) वेध लागले आहेत. राज्यात कुठल्याही क्षणी विधानसभेची आचारसंहिता लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दररोज विविध मतदारसंघातून अनेक इच्छुकांची नावे समोर येत आहेत. आता वादग्रस्त सनदी अधिकारी पूजा खेडकरचे (Pooja Khedkar) वडील माजी सनदी अधिकारी दिलीप खेडकर (Dilip Khedkar) यांनी विधानसभा निवडणुकीसाठी शड्डू ठोकला आहे.  


वादग्रस्त सनदी अधिकारी पूजा खेडकरचे वडील माजी सनदी अधिकारी दिलीप खेडकर यांनी पुन्हा एकदा विधानसभा निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी सुरु केली आहे. अहिल्यानगरच्या शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघातून (Shevgaon Pathardi Assembly Constituency) ते निवडणुकीची तयारी करत असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. 


दिलीप खेडकर यांनी ठोकला विधानसभेसाठी शड्डू


याबाबत दिलीप खेडकर यांनी सांगितलं की, लोकसभा निवडणुकीत जरी माझा पराभव झालेला असला तरी प्रस्थापितांना त्यांचा पराभव माझ्यामुळे झाला असल्याचे वाटत आहे. त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीने मला आणि माझ्या कुटुंबियांना त्रास देण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे मला जरी राजकारणातून संपविण्याचा प्रयत्न करण्यात आला असला तरी मी विधानसभेची निवडणूक लढवणार असण्याची घोषणा त्यांनी केली आहे. 


भाजपमधून निवडणूक लढण्यास इच्छुक


तसेच, आगामी विधानसभा निवडणूक भाजपकडून लढवण्यासाठी इच्छुक असल्याचे दिलीप खेडकर यांनी म्हटले आहे. मात्र भाजपने जर उमेदवारी दिली नाही तर इतरही पक्षाकडून आपल्याला ऑफर मिळत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आता दिलीप खेडकर यांना कुठल्या पक्षातून उमेदवारी मिळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 


शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात इच्छुकांची संख्या वाढली 


दरम्यान, अहमदनगरच्या शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये इच्छुक उमेदवारांची संख्या वाढत आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडे यांनी कुठल्याही परिस्थितीत विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी दाखवली आहे. हर्षदा काकडे (Harshada Kakade) यांच्या भूमिकेने भाजपच्या विद्यमान आमदार मोनिका राजळे यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. एकेकाळी भाजपच्या जिल्हा परिषद सदस्य राहिलेल्या हर्षदा काकडे यांना 2014 आणि 2019 या दोन्ही निवडणुकांमध्ये भाजपकडून उमेदवारी मिळाली नाही, मात्र आता मिळेल त्या पक्षाकडून उमेदवारी करायची किंवा अपक्ष निवडणूक लढवायची असा निश्चय त्यांनी केला आहे. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून प्रताप ढाकणे निवडणुकीची तयारी करत आहेत. 


आणखी वाचा


Sujay Vikhe Patil : 'मला संगमनेरमधूनच विधानसभा लढवायला आवडेल', सुजय विखेंनी पुन्हा व्यक्त केली इच्छा, बाळासाहेब थोरातांना आव्हान?