Sanjay Raut : आदर्श घोटाळा केलेल्या अशोक चव्हाणांना भाजपने घेतले.  70 हजार कोटींचा घोटाळा केलेले अजित पवार आज भाजप सोबत आहेत. आता घोषणा बदला, 50 खोके 'शिंदे को ठोके' असे म्हणा. भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालणारे सरकार उलटवून टाकायचे आहे आणि रामराज्य आणायचे आहे, असा घणाघात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. सोनई येथे ठाकरे गटाच्या संवाद मेळाव्यात ते बोलत होते.

  


संजय राऊत म्हणाले की, उध्दव साहेबांचे स्वागत प्रचंड झाले. गाडी पुढे जात नव्हती. आपण खाली उतरला मला वाटले लोक तुम्हाला खांद्यावर घेऊन डोक्यावर घेतात की काय? हे खरं आहे जनतेने एकट्या तुम्हाला डोक्यावर घेतले, बाकी सगळे गेले. राज्यातील रामायणात आपण जिंकणार कारण आपण सर्व हुनमान आहोत. प्रत्येक शिवसैनिक हुनमान आहे. 


आमचे सरकार आल्यावरही ईडी राहील


जे शिवसेनेच्या तिकिटावर वर्षोनुवर्षे निवडून आलेत. ते सोडून गेले, गद्दारी केली, हा शंकर आमच्यासोबत लक्ष्मणासारखा उभा आहे. काल अशोक चव्हाण सोडून गेले, का गेले, आमचे सरकार आल्यावर ही ईडी राहील. अशोक चव्हाण चांगला माणूस पण तो गेला, त्याचे वडील ही मुख्यमंत्री होते. तरीही गेले पक्षाने सर्व दिले तरी गेले. आदर्श घोटाळा सर्वात मोठा घोटाळा, असा आरोप भाजपने केला. तरीही त्यांना पक्षात घेतले. 


आता घोषणा बदला '50 खोके शिंदे को ठोके'


कारगिलमधील शहीद कुटुंबियांना घर देणार. तिथे मोठी इमारत बांधली, पण एकही शहिद कुटुंबियांना घर नाही, हा आदर्श घोटाळा आहे. 70 हजार कोटींचा घोटाळा केलेले अजित पवार आज भाजप सोबत आहेत. आता घोषणा बदला, '50 खोके शिंदे को ठोके' असे म्हणताच एकच हशा पिकला. 


शिवसेनेच्या पाठिंब्याशिवाय सरकार येणार नाही


भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालणारे सरकार उलटवून टाकायचे आहे आणि रामराज्य आणायचे आहे. मोदी सांगतात ते नाही. ते गुंडांचे राज्य आहे, चोरांचे राज्य आहे. आज दिल्लीत शेतकरी जात आहेत, पण सीमेवर सैनिक उभे केले, हे सैन्य तुम्ही लढाखच्या सीमेवर उभे केले असते तर चीन आपल्या सीमेत घुसले नसते, डरपोक आहेत. 400 पार म्हणतात आणि 200 पार जाणार नाहीत. शिवसेनेच्या पाठिंब्याशिवाय सरकार येणार नाहीत. उद्धव यांना राज्याचे नाही तर देशाचे नेतृत्व करण्यासाठी खुणावत आहेत, असे ते यावेळी म्हणाले.